जागतिक मातृदिनानिमित्ताने सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरिजा प्रभूने आईबद्दल खास गोष्टी शेअर केल्या आहेत.
आईच्या पाठिंब्यामुळेच सर्व शक्य
“प्रत्येकाच्याच आयुष्यात आईला मोलाचं स्थान असतं. अगदी जन्मापासूनच आपण आईकडून बऱ्याच गोष्टी शिकत असतो. त्यामुळे आज मी जे काही आहे त्याचं संपूर्ण श्रेय आईला देईन. माझ्या कुटुंबात अभिनय क्षेत्रातलं कुणीच नाही. मला आणि माझ्या कुटुंबाला हे जग नवं होतं. पण तरीही आईच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मी या क्षेत्रात येऊ शकले. तिने फक्त पाठिंबाच नाही तर मला आत्मविश्वासही दिला जो कायम माझ्यासोबत असेल. अगदी ऑडिशनपासून ते माझ्या शूटिंग वेळापत्रकाच्या सर्व वेळा तीने काटेकोरपणे पाळल्या आहेत. आईच्या सपोर्टमुळेच मी या क्षेत्रात येऊ शकले.
म्हणून मला गौरी ही व्यक्तिरेखा जवळची वाटते
पुढे गिरिजाने तिच्या गौरी या व्यक्तीरेखेता आईशी असलेला संबध सांगितला. ती म्हणाली, “प्रत्येक आईला आपल्या लेकराच्या मनात काय चाललं आहे याची पूर्ण जाणीव असते. माझी आई देखिल अगदी तशीच आहे. बऱ्याचदा मी न बोलताही माझ्या मनातल्या खूप गोष्टी तिला कळतात. आईच्या स्वभावाविषयी सांगायचं तर समोरची व्यक्ती आपल्याशी कशीही वागली तरी आपण चांगलंच वागावं हा संस्कार तिने लहानपणापासूनच माझ्या मनावर बिंबवला आहे. प्रेमाने जग जिंकता येतं ही तिची शिकवण मला प्रत्येक क्षणी उपयोगी पडते. योगायोग असा की स्टार प्रवाहवरच्या सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत मी गौरी ही व्यक्तिरेखा साकारते आहे. अतिशय साधी आणि प्रेमळ अशी ही व्यक्तिरेखा आहे. माझ्या आईचं नावही गौरी आहे. आणि गौरीमधले गुणही आईशी मिळते जुळते आहेत त्यामुळे गौरी ही व्यक्तिरेखा मला खुप जवळची वाटते. आणि मला गौरीच्या रुपात पाहून आईही सुखावते. मी हे क्षेत्र निवडल्याचा तिला खूप अभिमान आहे.”
View this post on Instagram
पहा फोटो : Mother’s Day Special : 2021 मध्ये ‘या’ अभिनेत्री झाल्या आई
माझ्या आईचं बालपण गावाकडे गेलं. तिचं लग्नही खूप लवकर झालं. त्यामुळे तिला फार शिकता आलं नाही. पण तिचा उत्साह खूप दांडगा आहे. तिला कुकिंगची आवड आहे. त्यामुळे युट्युबवर पाहून ती वेगवेगळे पदार्थ बनवते. लॉकडाऊनच्या काळात तर आईने मला हवी असलेली प्रत्येक गोष्ट बनवून दिली. माझी आई अन्नपूर्णाच आहे असं म्हणायला हवं.