एचआयव्हीबाधित लहान मुलांना, त्यांचा कोणताही अपराध नसताना समाजातील काही घटकांकडून विचित्र वागणूक मिळते. यात त्या मुलाचा काहीच दोष नसतो, पण मग समाज त्या मुलांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणार का? अशा काही घटकांवर ‘आम्ही चमकते तारे’ हा चित्रपट भाष्य करतो. पण अत्यंत सक्षम असलेला हा विषय नेमका मांडणीत थोडासा मागे पडतो.
विद्येचे आणि कदाचित समाजसेवेचेही माहेरघर असलेल्या पुण्यात ‘मानव्य’ नावाची संस्था आहे. विजयाताई लवाटे यांनी १९९७मध्ये ही संस्था खास एचआयव्हीबाधित मुलांचा किमान मृत्यू सुकर व्हावा, म्हणून स्थापन केली होती. या संस्थेचे सध्याचे संचालक शिरीष लवाटे यांना भेटण्याचा योग काही दिवसांपूर्वी आला. त्यांच्याशी बोलताना एचआयव्हीबाधित मुलांची दु:ख ऐकून अक्षरश: गलबलायला झालं होतं. ‘आम्ही चमकते तारे’ हा चित्रपट बघताना ‘मानव्य’ची आठवण आल्याखेरीज राहिली नाही.
स्वत:चा कोणताही दोष नसताना केवळ इतरांच्या, कधीकधी आपल्या आईवडिलांच्या हलगर्जीपणामुळे एचआयव्हीबाधित झालेल्या लहान मुलांना समाजाकडून मिळणारी वागणूक, ही साधारणपणे ‘आम्ही चमकते तारे’ या चित्रपटाची वन लाइन स्टोरी म्हणावी लागेल. मग या एका ओळीला चित्रपट स्वरूपात आणण्यासाठी अनंत सुतार यांनी लिहिलेल्या कथेचा विस्तार दीपक चौधरी यांनी केला. त्यावर प्रकाश जाधव आणि दीपक चौधरी यांनी पटकथेची मांडणी केली व अनंत सुतार, अशोक मानकर आणि महेंद्र पंडित यांनी संवाद लिहिले.
समीर महाजन आणि सोनाली महाजन (प्रसाद ओक आणि निशा परुळेकर) या दोघांच्या लग्नाला पाच वर्षे लोटली, तरी त्यांना मूलबाळ नाही. त्यामुळे ते दोघं समीरचा मित्र डॉ. विनय (योगेश महाजन) याच्याकडे तपासणीसाठी जातात. त्यात सोनालीच्या गर्भाशयाची वाढ न झाल्याने या दोघांना मूल होऊ शकत नाही, हे स्पष्ट होते. मग ते दोघे डॉ. विनयच्या नातेवाइकांपैकीच एकाचं अनाथ बाळ दत्तक घेतात. ते बाळ म्हणजे सचिन महाजन (इंद्रजित मोरे). लहानपणापासून चांगल्या संस्कारांत वाढलेला सचिन शाळेतही सर्वाचाच लाडका असतो. शाळेतला शिपाई गणपतमामा (भरत जाधव) याचा तर त्याच्यावर विशेष जीव जडतो. अचानक एक दिवस त्याला चक्कर येते आणि तो गाता गाता पडतो. असं त्याच्याबरोबर दुसऱ्यांदा होतं आणि त्याची संपूर्ण तपासणी केली जाते. त्या वेळी असं लक्षात येतं की, सचिन हा एचआयव्हीबाधित आहे.
त्याचे आईवडील ही गोष्ट त्याच्यापासून आणि इतरांपासूनही लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात, मात्र शाळेत झालेल्या आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून ही बाब मुख्याध्यापिकांना (रिमा लागू) कळते. त्या सचिनच्या पालकांना बोलावून त्यांच्याशी बोलून, घाबरण्याचे काही कारण नसल्याचा दिलासा देतात. ही गोष्ट कोणालाही कळणार नाही, याचीही खात्री देतात. मात्र अल्पावधीतच ही गोष्ट षट्कर्णी होते. मुलं सचिनशी खेळेनाशी होतात. त्या मुलांचे पालकही सचिनला शाळेतून काढून टाकण्याची मागणी करतात. संचालक मंडळ त्याला काढून टाकण्याचा निर्णय घेतं.
पुढे सचिन खास एचआयव्हीबाधित मुलांसाठी असलेल्या बालविकास मंदिर या शाळेत जातो. तेथे आपल्यासारख्याच इतर मुलांमध्ये रमतो. यथावकाश एका गायन स्पर्धेत तो त्याच्याच जुन्या शाळेत जाऊन ती स्पर्धा जिंकतो आणि एका चांगल्या संदेशाद्वारे हा चित्रपट संपतो.
कथा चांगली असली, कथाविस्तारही चांगला असला, तरी या कथेत काही अनावश्यक गोष्टी घुसवण्यात आल्यासारख्या वाटतात. चित्रपटाच्या सुरुवातीला हा चित्रपट दत्तकविधान वगैरेबद्दल आहे की काय, अशी शंका येते. मात्र विषयाची ओळख चांगल्या पद्धतीने केली आहे. या कथेतील अनावश्यक पात्रं म्हणजे समीरचे आईवडील (आनंद अभ्यंकर आणि मानसी मगहीकर). या दोघांना चित्रपटात काही वावच नाही. केवळ समीर आणि सोनाली हे किती महान आहेत, हे त्यांच्या तोंडून वदवून घेण्यासाठी ते चित्रपटात येतात. त्याशिवाय दत्तक वगैरे भानगडही अनावश्यक वाटते. त्याऐवजी लहानपणी सचिनला एखादा अपघात होतो आणि त्या वेळी त्याला दिलेल्या रक्तामार्फत त्याला एचआयव्हीची लागण होते, असंही दाखवता आलं असतं. किंबहुना समीर सचिनच्या मुख्याध्यापिकांना अशीच कथा रचून सांगतो. केवळ समीर आणि सोनालीचे ‘चारित्र्य’ जपण्यासाठी दत्तक वगैरे रचल्यासारखं वाटतं.
त्याचप्रमाणे संवाद काही ठिकाणी खूपच बाळबोध आणि प्रेक्षकांनाही अंदाज बांधता येतील, असे झाले आहेत. लहानग्या सचिनच्या तोंडी न पेलवणारी आणि त्याच्या वयाला न शोभणारी वाक्य टाकली आहेत. चित्रपटाचा शेवट तर ‘तारे जमींपर’चा शेवट डोळ्यासमोर ठेवून त्याबरहुकूम केला आहे. त्याचप्रमाणे शेवटी वापरलेलं संगीतही ‘द साउंड ऑफ म्युझिक’ या महान चित्रपटातील ‘दीज आर फ्यू ऑफ माय फेव्हरिट थिंग्ज’ या गाण्याच्या सुरांशी तंतोतंत जुळतं. त्याचप्रमाणे काही वेळा चित्रपट संध्याकाळच्या प्रकाशात किंवा रात्रीच्या प्रकाशात चित्रित केल्याचं स्पष्टपणे कळतं.
हे काही दोष वगळले, तर चित्रपट खरंच चांगला जमला आहे. मुख्य म्हणजे चित्रपटाचा विषय याआधी न हाताळला गेलेला आहे. त्याचप्रमाणे गाणीही खूप चांगली झाली आहेत. श्रीरंग आरस यांनी संगीत आणि पाश्र्वसंगीत चांगलं दिलं आहे. दिग्दर्शकाने फार चमक दाखवली नसली, तरी त्याची पकडही सुटलेली नाही. समोर उभ्या राहणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला चित्रपटात उत्तर मिळतं. खूप छोटय़ाछोटय़ा गोष्टींद्वारे चित्रपट खूप मोठय़ा गोष्टींवर प्रकाश टाकतो.
चित्रपटाचं आणखी एक बलस्थान म्हणजे काही कलाकारांनी केलेली उत्तम कामं. स्वत: इंद्रजित मोरे याने लहानग्या सचिनचं काम उत्तम वठवलं आहे. आपल्या वयाच्या मानाने तो खूपच समजूतदारपणे कॅमेरासमोर उभा राहिला आहे. प्रसाद ओक काही ठिकाणी अभिनयाच्या बाबतीत एकसुरी वाटतो, पण त्याचा वावर खूपच आश्वासकही आहे. निशा परुळेकरने मात्र चित्रपटभर दु:खी बेअरिंग वागवलं आहे. ही बाई कधीच हसत नाही आणि हसली, तरी रडल्यासारखीच वाटते.
अनेक ठिकाणी तर ती आधीच रडं डोळ्यात घेऊन आल्यासारखी वाटते. भरत जाधव याची भूमिका खरंतर मकरंद अनासपुरेच्या पठडीतील आहे. पण त्यानेही ही गणपतमामाची भूमिका मन लावून केल्यासारखी वाटते. आनंद अभ्यंकर यांनीही आजोबांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. त्यांच्याकडून अशा आणखी चांगल्या भूमिका बघायला मिळणार नाहीत, ही खंत सगळ्यांनाच राहील. अरुण नलावडे (बालविकास मंदिर शाळेचे मुख्य) आणि किशोरी आंबिये यांनीही आपला ठसा उमटवला आहे. रिमा लागू या मुख्याध्यापिकेच्या भूमिकेत शोभतात. किंबहुना, त्या कोणत्याही भूमिकेत चांगल्याच वाटतात, हे त्यांच्या अभिनयाचे सामथ्र्य आहे. या विषयासारख्या गंभीर विषयावर याहीपेक्षा चांगला चित्रपट बनला असता, हे खरं. पण तरीही ‘आम्ही चमकते तारे’ हा चित्रपट आश्वासक आहे. सरत्या वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एक चांगला विषय हाताळला गेला, हेच या चित्रपटाचं यश म्हणावं लागेल.