मितेश रतिश जोशी
त्याला सध्या आपण ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘तुझेच गीत गात आहे’ या मालिकेत पाहत आहोत. त्याआधी त्याची ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ ते ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेपर्यंत तसेच प्रायोगिक – व्यावसायिक नाटक – चित्रपटांमधून झालेली घोडदौडही प्रेक्षकांनी अनुभवली आहे. मराठीनंतर आता त्याने ‘झी ५’ या ओटीटी वाहिनीवरील ‘दुरंगा’ या वेबमालिकेच्या माध्यमातून हिंदीत पदार्पण केले आहे. इथेही तो एका वेगळय़ा, रंजक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आला आहे. हिंदीत पदार्पण करण्यासाठी मी कायमच उत्सुक होतो, असं म्हणणाऱ्या अभिजीत खांडकेकरशी त्याच्या या नव्याकोऱ्या हिंदी वेबमालिकेच्या निमित्ताने केलेली बातचीत..

‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर गेल्याच आठवडय़ात ‘दुरंगा’ ही वेबमालिका प्रदर्शित झाली. ही नवी मालिका कोरियन मालिका ‘फ्लॉवर ऑफ इव्हील’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. ‘रोझ ऑडिओ व्हिज्युअल्स’ची निर्मिती असलेली ही नऊ भागांची रोमँटिक थ्रिलर मालिका असून अभिजीतबरोबर गुलशन देवय्या, द्रष्टी धामी, बरखा सेनगुप्ता, राजेश खट्टर, दिव्या सेठ, झाकीर हुसेन यांच्यासारखी नामवंत कलाकार मंडळी या मालिकेत सहकलाकाराच्या भूमिकेत आहेत. अभिनयाचे कोणतेही तांत्रिक शिक्षण नसतानादेखील केवळ एक आवड आणि अनुभवातून मोठं होत अभिजीतने हिंदीत पदार्पण केले आहे. आपल्याकडे ‘के ड्रामा’ या नावाने ओटीटी माध्यमांवरील कोरियन वेबमालिका ओळखल्या जातात. भारतीय प्रेक्षक कायमच अशा वेबमालिकांना भरभरून प्रतिसाद देतो, कारण त्यांच्या संवेदना भारतीय प्रेक्षक कायमच आपल्या संवेदनांशी जोडून घेऊ शकतो. ‘दुरंगा’ या वेबमालिकेच्या कथेचा आवाका सांगताना अभिजीत म्हणाला, ‘क्राइम ब्रँचमध्ये मोठय़ा पदावर काम करणाऱ्या एका पोलीस महिलेला तिच्या पतीबद्दल शंका वाटत असते. तिला आपला पती फार मोठा खुनी असावा, असं वाटतं. मग तो खरंच खुनी आहे की नाही? की त्याच्या नावाचा वापर केला जातो आहे? की तोच दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये वावरतो आहे, असे अनेक प्रश्न तिला पडतात. या प्रश्नांभोवती फिरणारी ही वेबमालिका आहे.’ या वेबमालिकेत अभिजीतने गुन्हेगारीविषयक पत्रकारिता करणाऱ्या तरुणाची भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेविषयी बोलताना, हिंदीत कायमच बडय़ा कलाकारांना मुख्य भूमिका दिल्या जातात आणि इतर कलाकारांना साहाय्यक भूमिका मिळतात, असं सर्वसाधारण चित्र असतं; पण मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की, या वेबमालिकेत माझ्या व्यक्तिरेखेला समान न्याय मिळाला आहे. कथा फुलवण्यामागे वेबमालिकेतील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्त्वाचा आहे. यामध्ये माझीसुद्धा महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे, असं तो सांगतो. या व्यक्तिरेखेचं नाव विकास सरोदे असून तो व्लॉगर आहे. विकास हा धडपडय़ा पत्रकार असून त्याला लहानपणापासूनच गुन्हेविषयक गोष्टींबद्दल आकर्षण आहे. त्यामुळे तो सतत वेगवेगळय़ा गुन्हे प्रकरणांचा अभ्यास करत असतो. अशाच एका खुनाच्या केसचा अभ्यास करताना त्याच्या लक्षात येतं की, फार वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने कोणाचा तरी खून झाला होता. हे ज्या वेळी त्याला लक्षात येतं तिथूनच या वेबमालिकेची खऱ्या अर्थाने सुरुवात होते. ही वेबमालिका पाहताना निश्चितच प्रेक्षकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही, असं अभिजीत खात्रीने सांगतो.

tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Thoda Tuza Ani Thoda Maza fame Sameer Paranjape propose to Shivani surve on aata hou de dhingana season 3
Video: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधील तेजसने सोलापुरी भाषेत मानसीला केलं प्रपोज, म्हणाला, “बार्शी तिथं सरशी…”
suraj chavan shares reel video on riteish deshmukh ved song
रितेश देशमुखच्या सुपरहिट मराठी गाण्यावर सूरजचा जबरदस्त अंदाज! Video पाहून नेटकरी म्हणाले, “लय भारी…”
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Video of little girl singing Yeh Raaten Yeh Mausam
“हा गोंडस आवाज तिचा नाही”? ‘ये रातें, ये मोसम’ गाणे गाणाऱ्या चिमुकलीचा Viral Video पाहून नेटकऱ्यांचा दावा, काय आहे सत्य?
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Viral Indonesian Siblings Render The Most Adorable Version Of Dhoom Track Dilbara
गिटार वाजवत मोठ्या भावाने गायले गाणे, छोट्याने किंचाळत…., इंडोनेशिअन भावाडांनी जिंकले नेटकऱ्यांचे मन, पाहा Viral Video

या कथेचा आवाका बघता भूमिकेसाठी काही विशेष मेहनत घ्यावी लागली का? याबद्दल बोलताना त्याच्या महाविद्यालयीन आयुष्यातल्या काही घटनाही अभिजीत सांगतो. ‘नाशिकला कॉलेजमध्ये असताना मी अभ्यास सांभाळून एका स्थानिक वृत्तवाहिनीसाठी पत्रकार म्हणून काम करत होतो. स्थानिक स्टिंग ऑपरेशनमध्ये कायम सहभागी व्हायचो. त्यामुळे विकाससारखे पत्रकार कसे भामटेगिरी करू शकतात, याची कल्पना मला आधीपासून होतीच. त्यामुळे ही भूमिका साकारताना मला कायम माझे जुने दिवस आठवायचे. तेव्हा पत्रकार म्हणून केलेलं काम आता भूमिका करताना उपयोगी पडतं आहे,’ असं तो म्हणतो.

या वेबमालिकेच्या निमित्ताने अभिजीतने पहिल्यांदाच गुलशन देवय्या, द्रष्टी धामीसारख्या नावाजलेल्या हिंदी कलाकारांबरोबर काम केलं आहे. हे कलाकार म्हणून समोर येतच नाहीत. ते तुम्हाला पहिल्यांदा माणूस म्हणून भेटतात आणि तीच त्यांची खरी खासियत आहे, असं तो सांगतो. या कलाकारांभोवती फक्त प्रसिद्धीचं वलय आहे असं वाटतच नाही, पण ते वलय त्यांच्याभोवती आहे. ते उत्तम नट आहेत. त्यामुळे खरं काम तर त्यांनीच केलं आहे. त्यांच्या क्रियेला प्रतिक्रिया देणं हेच माझं काम होतं आणि माझ्या क्रियेला त्यांनी प्रतिक्रिया देणं हे माझं भाग्य होतं. गुलशनने माझी बाजू घेऊन दिग्दर्शकाला माझा दृष्टिकोन पटवून देणं हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होतं, असं सांगणाऱ्या अभिजीतने यानिमित्ताने हिंदीतल्या उत्तम कलाकारांबरोबर काम करता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. कलाकारांची एवढी तगडी फळी, तेवढय़ाच ताकदीची पटकथा, उत्तम सेट्स आणि इतका संवेदनशील – हळवा विषयङ्घ या सगळय़ाची फोडणी दिल्यावरचा अनुभव सुंदरच असतो. ‘दुरंगा’मधून हाच अनुभव प्रेक्षकांना मिळेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

अभिजीतची पत्नी सुखदाही कधी पृथ्वी थिएटरची हिंदी नाटकं गाजवत, ‘बाजीराव मस्तानी’सारख्या हिंदी चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिकेतून वा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ या हिंदी मालिकेतून घराघरांत पोहोचली आहे. अभिजीतने मराठी तर सुखदाने हिंदी सृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. ‘मी आणि सुखदा आम्ही एकाच क्षेत्रात काम करत असल्याने कायमच अनुभवी व्यक्तींचं मार्गदर्शन घेत असतो. माझ्या हिंदी भाषेत माझ्या मराठी भाषेने नको डोकवायला ही माझी कायम धारणा होती. सुखदा सातत्याने हिंदीत काम करत असल्याने तिचा हिंदीतल्या व उर्दूतल्या चपखल शब्दांचा अभ्यास चांगला आहे. त्यामुळे ती वेळोवेळी माझे चुकीचे शब्द दुरुस्त करायची आणि मीसुद्धा विद्यार्थ्यांच्या भूमिकेत जाऊन तिच्याकडून शिकत होतो,’ असंही अभिजीतने सांगितलं.

टाळेबंदीच्या आधी केलेली आणि टाळेबंदीमध्ये केलेली अभिजीतची कामं हळूहळू प्रेक्षकांपुढे येत आहेत. पुढच्या काही महिन्यांत त्याचे दोन नवीन मराठी चित्रपटही प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तशी बोलणी सुरू असल्याचेही त्याने सांगितलं. अभिजीतची भूमिका असलेला, टाळेबंदीच्या आधी चित्रित झालेला ‘बालभारती’ नावाचा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहे. ‘झिंग चिक झिंग’ या चित्रपटाचे नितीन नंदन यांचाच हा पुढचा चित्रपट असून यामध्ये सिद्धार्थ जाधव, नंदिता पाटकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असल्याचे अभिजीतने सांगितलं. ‘दुरंगा’चा दुसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहितीही त्याने दिली. व्यावसायिक नाटकांमध्ये काम करण्याचीसुद्धा अभिजीतची इच्छा आहे. तीसुद्धा लवकरच पूर्ण व्हावी, अशी मनोकामनाही तो व्यक्त करतो.

हिंदी ही एक अशी भाषा आहे जिच्या माध्यमातून कलाकार केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर इतर देशांमध्येसुद्धा घराघरांत पोहोचतो. त्यामुळे मला कायमच हिंदीत एक चांगली भूमिका करण्याची इच्छा होती. याचा अर्थ असा नाही की मला मराठीत काम करण्याची इच्छा नाही, पण प्रत्येकालाच आयुष्यात पुढच्या टप्प्यापर्यंत पोहोचायचं असतं. आम्हा कलाकारांसाठी एका भाषेतून दुसऱ्या भाषेत, दुसऱ्यातून तिसऱ्या भाषेत काम करायला मिळणं हे एका प्रकारे अभिनय क्षेत्रात पुढे जाण्यासारखं आहे. माझी पत्नी सुखदा ही हिंदीत सातत्याने काम करते आहे. तिला व तिच्यासारख्या अनेक हिंदी कलाकारांना देशभरातच नव्हे तर जगभरातून मिळणारे प्रेम मी पाहत आलो आहे. हे प्रेम ‘दुरंगा’मधील भूमिकेच्या निमित्ताने मलाही समाजमाध्यमांवरून मिळायला सुरुवात झाली आहे, याचा आनंद वाटतो. – अभिजीत खांडकेकर