मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकृतींना टीकाटिप्पणींचा सामना करावा लागतो. चित्रपट असो किंवा मालिका, संबंधित कलाकृतीच्या कथानक व कलाकारांबद्दल समाजमाध्यमांवर चर्चा होत असताना विविध प्रश्न उपस्थित करत प्रेक्षकांकडून टीकास्त्रही सोडले जाते. मात्र, ‘प्रेक्षकांनी टीका केल्यानंतर कलाकृतीशी संबंधितांना कळते की आपण कुठे चुकत आहोत आणि त्यानंतर आम्ही कलाकृतीतील चुकीची गोष्ट संपूर्ण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. प्रेक्षकांचे प्रेम आणि आपुलकीमुळेच कोणतीही मालिका सर्वोत्तम ठरते. या प्रेमापोटी प्रेक्षकांनी टीका केली किंवा सूचना केल्या; तर यामध्ये काहीही वावगे नाही, तो प्रेक्षकांचा हक्कच आहे. टीका झाल्याशिवाय कोणतीही कलाकृती होऊ शकत नाही’, असे स्पष्ट मत दिग्दर्शक व ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे यांनी व्यक्त केले. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या मालिकेचे २ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारण होणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत सतीश राजवाडे बोलत होते. निवेदिता सराफ व मंगेश कदम या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. हरीश दुधाडे, प्रतीक्षा जाधव हे कलाकारही आहेत. आयुष्याच्या संध्यापर्वात मुलांच्या संसारापायी घरातच अडकलेल्या एका जोडप्याची कथा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या मालिकेत गुंफलेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>नव्या मालिकांची नांदी! ‘झी मराठी’वर सुरू होणार ‘ही’ थ्रिलर मालिका; जबरदस्त VFX ने वेधलं लक्ष, पाहा पहिली झलक

‘आपला मुलगा चुकल्यानंतर आई मुलाला ओरडून व समजावून त्याच्यावर संस्कार करत असते. त्याप्रमाणेच, प्रेक्षकांनी मालिका पाहताना केवळ चांगल्या गोष्टी दाखवून चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे, हे अत्यंत चुकीचे आहे.

‘प्रेक्षकांच्या टीकेतून आम्ही शिकत असतो. त्यामुळे प्रेक्षकांची टीका ही आम्ही सकारात्मकरीत्या घेत असतो’ असे राजवाडे यांनी सांगितले. ‘मालिकेमध्ये अनेक पात्रे असतात, घरातील प्रत्येकजण एखाद्या पात्राशी आणि त्याच्या प्रवासाशी जोडला जातो, त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात संबंधित पात्रांविषयी अनेक अपेक्षा असतात. जेव्हा प्रचंड आवडणाऱ्या मालिकेमध्ये संबंधित पात्र व कथा प्रेक्षकांच्या मनाप्रमाणे जात नसते, तेव्हा संबंधित मालिका चुकीच्या पद्धतीने जाऊ नये, असे प्रेक्षकांना मनोमन वाटते. प्रेक्षक टीका करत असतो, पण मालिका सोडून जात नाही. कारण त्यांना शेवटी आपल्या मनासारखेच होणार हे माहीत असते. प्रेक्षकांना जे हवे ते देण्यासाठी आमचा संपूर्ण चमू अहोरात्र प्रयत्न करीत असतो’, असेही राजवाडे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Statement by satish rajwade business head of star pravah regarding the artwork entertainment news amy