‘लहानपणी आपण ‘स्टॅच्यू.. स्टॅच्यू’ खेळत असू. आपण ‘स्टॅच्यू’ म्हटलं की समोरचे पुतळ्यासारखे तिथल्या तिथे थिजून जात आणि आपल्याला आपण कसे इतरांना एका हुकमाने पुतळे बनवले याचा आसुरी आनंद होत असे. आज हीच परिस्थिती आहे. स्वातंत्र्याचाच आपण ‘पुतळा’ केलाय. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी!’

आज देशात जी अस्वस्थ, बेचैन करणारी परिस्थिती सर्वसामान्य माणूस अनुभवतो आहे, त्याचं वर्णन वरील उद्गारांतून व्यक्त झालेलं आहे. अरविंद जगताप लिखित- दिग्दर्शित ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’तील हे भरतवाक्य! तुकाराम ‘माणूस’ नावाच्या सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्याच्या तोंडचं.

train accident man saved a life of another man who was standing on a railway track Viral video
बापरे! रेल्वे रुळावर उभा होता अन् मागून आली ट्रेन, पुढे जे झालं ते पाहून उडेल थरकाप, पाहा VIDEO
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?
Terrifying Railway accident of railway employee due to train driver at barauni junction in bihar video viral
बापरे! चालकाच्या चुकीमुळे घडला मोठा अनर्थ, ट्रेन सुरू करताच झाला रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडल? पाहा VIDEO
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
indian railway video TT police man fight viral video
“तुम्हाला सगळचं फ्री पाहिजे का…” भर ट्रेनमध्ये टीटीने पोलिसाला फटकारले; VIDEO पाहून युजर्सचा संताप

आज सर्वत्र ‘फील गुड’चं वातावरण हजारो कोटींच्या जाहिरातबाजीतून सरकार निर्माण करू पाहत आहे. रोज नवनव्या योजनांच्या घोषणा केल्या जात आहेत. काल केलेल्या घोषणेचं काय झालं, हा प्रश्नही लोकांनी विचारू नये म्हणून हे बम्बार्डिग होत आहे. मागच्या सरकारच्या योजना ‘नव्या बाटलीत जुनीच दारू’ भरून पेश केल्या जात आहेत. या सगळ्या माऱ्यामुळे सर्वसामान्य जन संभ्रमित झाले आहेत. खरं काय आणि आभास काय, याचा थांगपत्ताच त्यांना लागेनासा झाला आहे. दुसरीकडे वेमुला प्रकरण, गोरक्षण कायद्याचा अतिरेक, काश्मीर पेटलेले, शेतकऱ्यांची अस्मानी आणि सरकारी सुलतानीने झालेली भीषण अवस्था व त्यातून होणाऱ्या आत्महत्या, नोटाबंदीसारख्या आर्थिक अंदाधुंदी निर्माण करणाऱ्या निर्णयाचं फलित काय याचा अद्याप न लागलेला थांगपत्ता, या निर्णयाने देशाची झालेली विकासातील पीछेहाट, या काळात बँकांच्या रांगांमध्ये गेलेले शे-सव्वाशे बळी, त्याचबरोबर असंघटित क्षेत्रातील मजुरांवर आलेली देशोधडीची पाळी, देशात वाढत चाललेली असहिष्णुता, अघोषित आणीबाणीसदृश परिस्थिती.. आणि यासंबंधी आवाज उठविणाऱ्यांना सरसकट देशद्रोही ठरविण्याची वाढलेली प्रवृत्ती.. या सगळ्याचा निचरा कसा होणार? विचारस्वातंत्र्याची होणारी ही मुस्कटदाबी संवेदनशील माणसांना निश्चितच भयकंपित करणारी आहे.

या पाश्र्वभूमीवर ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ हे नाटक रंगभूमीवर आले आहे. अगदी थेटपणे नाही, तरी आजच्या परिस्थितीकडे तिरकस शैलीत ते निर्देश करते, यात शंका नाही. ‘अद्वैत थिएटर्स’ने वर्तमानावर भाष्य करू पाहणारे हे नाटक रंगमंचावर आणण्याचे धाडस केले आहे. यातली सर्व पात्रे ही प्रातिनिधिक आहेत. ती त्या त्या समाजघटकाचं, त्यांच्या वृत्ती-प्रवृत्तींचं प्रतिनिधित्व करतात. यातला तुकाराम हा सर्वसामान्यांचं प्रतीक आहे. याखेरीज इतिहासराव (इतिहास संशोधक), गाईड (देव आणि सामान्य माणसांतला दुवा), इन्स्पेक्टर (व्यवस्था – सिस्टम), हवालदार (जातीचा चतुर वापर करणारा माणूस), नेता (मागास जातीतील नेत्याचा पंटर), व्यापारी (सर्वाना गोड गोड बोलून झुलवणारा आणि आपल्याला हवं ते घडवून आणणारा सूत्रधार), सी.आय.डी. मीरा सोनवणे (पारदर्शी वैचारिकतेची प्रतीक), पत्रकार विकास जाधव (डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या डोळ्यांत पाणी आलं म्हणून आत्महत्या केलेली व्यक्ती) अशी अन्य पात्रं नाटकात आहेत. ती समाजातील विविध वर्गाचं, त्यांच्या विचारांचं, त्यांच्या उक्ती आणि कृतीतील विसंगतीचं, लबाडी, धूर्तपणा, व्यवहारी वर्तनाचं प्रतिनिधित्व करतात. नाटकाला रूढार्थानं कथानक नाही.

तुकाराम हा माणूस स्वर्गात गेल्याचा भास निर्माण करण्यात येतो. प्रत्यक्षात त्याला स्वर्गात देव, अप्सरा, यक्ष वगैरे कुणीच आढळत नाहीत. तिथेही पृथ्वीसारखीच अनागोंदी असल्याचं त्याच्या निदर्शनास येतं. त्याला स्वर्गात एक गाईड भेटतो. तो देवाचा दलाल म्हणून काम करतो. स्वर्गाचा कारभार कुणी एक व्यापारी चालवत असतो. इतक्यात बातमी येते की, डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या डोळ्यांतून अश्रू येत आहेत. या घटनेची शहानिशा करण्यासाठी स्वर्गातील गाईडला पृथ्वीवर पाठविण्यात येतं. त्याच्यासोबत तुकारामही पृथ्वीवर परत येतो. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडालेली असते. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असतात. त्यात आंबेडकरांचे अनुयायी म्हणवणारे आणखी आगीत तेल ओततात. कुणीच सारासार विचार करण्याच्या मन:स्थितीत उरत नाही. जो-तो यातून आपल्याला काय लाभ उठवता येईल याच्या फिकिरीत! भ्रष्ट व्यवस्था हातावर हात ठेवून तमाशा बघत बसलेली. अशा स्फोटक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी डॉ. आंबेडकरांना देवत्व बहाल करण्याचा तोडगा देव काढू इच्छितात, जेणेकरून एकाच दगडात अनेक पक्षी धारातीर्थी पडणार असतात. प्रत्येक जण याचं भांडवल करून आपापला ‘अजेंडा’ राबवू पाहतो. त्यातून जो संघर्ष उभा राहतो, तो म्हणजे हे नाटक.. ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’!

यानिमित्ताने नाटकात इतिहासलेखन, आरक्षण, उच्चवर्णीय आणि दलित राजकारण, व्यवस्थेचा बथ्थडपणा व भ्रष्टता आणि स्वतंत्र विचारांच्या लोकांची होणारी कोंडी या सगळ्याची हडसून खडसून चर्चा होते. आरोप-प्रत्यारोपांतून प्रत्येकाचा दांभिकपणा उघड होतो. चर्चानाटय़ातून समोर येणारे वास्तव असे या नाटकाचे स्वरूप आहे.

लेखक-दिग्दर्शक अरविंद जगताप यांनी संहिता आणि प्रयोग सादरीकरणात एपिसोडिक पद्धतीचा वापर केला आहे. लेखक-दिग्दर्शक एकच असल्याने संहितेतील त्रुटी व उणिवा तसेच रिक्त जागा प्रयोगात तशाच कायम राहिल्या आहेत. उदा. सुरुवातीच्या डाव्या आणि उजव्यातील सवाल-जबाब! तो चटकदार असला तरी त्याचा उर्वरित नाटकाशी काय संबंध, असा प्रश्न पडतो. त्याचप्रमाणे आणखी दोन प्रसंगांचा उल्लेख करता येईल. डॉ. आंबेडकरांची महती सांगण्यासाठी रचलेला हा प्रसंग अत्यंत बाळबोध आहे. आंबेडकरांनी हे केलं आणि आंबेडकरांनी ते केलं, हे इतक्या शालेय पद्धतीने सांगण्याने त्यातले गांभीर्य हरवले आहे. तसेच तुकारामाने इतिहासरावांसह सर्वाच्या आजारावर एकापाठोपाठ सांगितलेले उपाय हाही बाळबोधपणाचाच प्रकार होय. विकास जाधवचे पार्थिव समोर पडलेले असताना उपस्थितांची होणारी राजकीय चर्चा महत्त्वाची असली तरी त्यात मध्येच विकास जाधव उठून काही तरी बोलण्याचा प्रयत्न करतो, त्या वेळी त्याला दरडावून निमूटपणे पडून राहायला सांगितले जाते, त्यात उपहासापेक्षा सवंगता जास्त जाणवते. मात्र, शेवटी विकास जाधवचं मढं उठून (सामाजिक परिस्थितीबद्दल!) जे काही भेदक भाष्य करतं ते मात्र सुन्न करणारं आहे. अरविंद जगताप यांना आजच्या प्रदूषित, भ्रष्ट व्यवस्थेबद्दल सामाजिक – राजकीय दांभिकतेबद्दल या नाटकाद्वारे कोरडे ओढायचे आहेत आणि ते योग्यच आहेत. ते काही धारदार संवादांतून व्यक्तही होतात. रेडियमवाल्या मुखवटय़ांचा आणि सोशल मीडियाचा केलेला वापर उत्तमच आहे. कलाकारांची केलेली निवडही अचूक. मात्र, नाटकातील त्रुटी अन्य कुणा जाणकार, सजग आणि सामाजिक- राजकीय भान असलेल्या दिग्दर्शकाने यथार्थपणे हाताळल्या असत्या असं राहून राहून वाटतं. त्याचप्रमाणे त्यांनी संभाजी भगत आणि भीमराव पांचाळे यांच्या रचनांचा केलेला वापरही योग्य आहे. मात्र संभाजी भगतांच्या गाण्यांचे ध्वनिमुद्रण सदोष असल्याने त्यातला आशय नेमकेपणाने पोहोचत नाही.

सुमित पाटील यांनी सांकेतिक नेपथ्य योजले आहे. संगीत संभाजी भगत यांचे आहे. शीतल तळपदे यांनी मुखवटय़ांच्या हालचालीमध्ये योजलेली प्रकाशयोजना दृश्यांत्मकतेत भर घालणारी आहे. पूजा भंडारे यांच्या वेशभूषेने पात्रांना त्यांची पाश्र्वभूमी पुरविली आहे.

हे नाटक आणि त्यातला आशय अधिक धारदार केला आहे तो यातल्या कलाकारांनी! सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या तुकारामाच्या भूमिकेत दिलीप घारे यांनी वेळोवेळी केलेली टीकाटिप्पणी अचूक टायमिंगमुळे भेदकपणे पोहोचते. जयंत शेवतेकर यांनी पक्षपाती इतिहास संशोधकाच्या कोलांटउडय़ा आणि शाब्दिक कसरतींसह इतिहासरावांचा  रोखठोकपणामागचा दांभिक चेहरा यथातथ्य उभा केला आहे. त्यांची चॅनलला बाइट देताना ‘ऑफ द रेकॉर्ड’ आणि ‘ऑन द रेकॉर्ड’ मतांमधली तफावत खूप काही व्यक्त करते. शैलेश कोरडे (इन्स्पेक्टर) आणि महेंद्र खिल्लारे (हवालदार) यांची एकमेकांच्या जाती जाणून घेण्यासाठी होणारी शाब्दिक जुगलबंदी लाजवाब! त्यांच्या भ्रष्टतेची कथनी आणि करणीमधील विसंगती वर्तन-व्यवहारांतून व देहबोलीतून साक्षात समूर्त होते. प्रेमानंद लोंढे यांनी आक्रस्ताळी दलित नेता आणि त्याची विचारहीनता यथार्थपणे साकारली आहे. मुक्तेश्वर खोले यांनी धूर्त, मुत्सद्दी आणि कावेबाज सूत्रधार व्यापारी स्वच्छ वाणी आणि संवादोच्चारणातील विशिष्ट ढबीतून प्रत्ययकारीतेनं उभा केला आहे. ‘चोरावर मोर’ हे तत्त्व त्यांच्या चालण्या- बोलण्यातूनही व्यक्त होते. रमाकांत भालेराव यांचा स्वर्गातला गाईड समोरच्याला काय दाखवायचं आणि काय दाखवायचं नाही, याची पुरेपूर खूणगाठ बांधणारा आहे. एखादी गोष्ट अंगाशी येतेय असं वाटलं की, खुबीने दुसऱ्या विषयाकडे वळण्याचं त्यांचं कसब दाद देण्याजोगंच. स्पष्ट विचार आणि पारदर्शी भूमिकेची वाहक सी.आय.डी. इन्स्पेक्टर मीरा सोनवणे त्याच तडफेनं साकारली आहे नम्रता सुमिराज यांनी! कुणाचीही भीडभाड न ठेवता विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे हे पात्र! त्यांची होणारी कोंडी ही प्रातिनिधिकच म्हणायला हवी. श्रुती कुलकर्णी यांनी चॅनेल रिपोर्टरचा खोचक  प्रश्न विचारण्याचा वसा योग्यरीत्या निभावला आहे. विकास जाधव झालेल्या नितीन धोंगडे यांनी सामान्यांची तगमग आणि व्यथा मुखर केली आहे. राहुल काकडे, उमेश चाबूकस्वार, कपिल जोगदंड आणि अनिल मोरे यांनीही सुयोग्य साथ केली आहे.

वर्तमानावर भाष्य करणारं ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ हे नाटक ही आजच्या काळाची निकड होती आणि आहे!