‘स्थळ’ सांगून आलं की मुलीच्या घरात उडणारी धांदल, पाहुण्यांची ऊठबस करताना पार हात-पाय धुण्यासाठी नवीन साबण, नवीन नॅपकिन, पाहुण्यांसह त्यांच्याबरोबर मुलगी पाहण्यासाठी आलेल्या इतर जबाबदार (?) माणसांची बिनकामाची फौज पाहता त्यांच्यासाठी स्वयंपाकघरात नाश्ता-चहा करत रांधणाऱ्या चार बायका, इतक्या सगळ्यांसमोर एका स्टुलावर मुलीला बसवून तिला विचारले जाणारे तेच तेच प्रश्न आणि सगळं भरपेट खाऊन, निरीक्षण करून झाल्यावर ‘नंतर कळवतो’ म्हणत पदरी टाकलेला नकार… हे चित्र खूप जुनं नाही. मुंबईसारख्या शहरात या सगळ्यांची जागा विवाह मंडळं, मॅचमेकिंगच्या संकेतस्थळांनी घेतलेली असली तरी लग्न जुळवणं आणि त्यासाठी मुलगी पाहणं या व्यवस्थेतील मूळ मुद्दे आजही जैसे थेच आहेत. इंटरनेटने जोडल्या गेलेल्या गावांमध्ये तर ते आजही तितकेच भीषण आहेत आणि मुलींच्या, पर्यायाने तिच्या कुटुंबीयांचा असह्य कोंडमारा करणारे आहेत, याची बोचरी जाणीव ‘स्थळ’ हा चित्रपट पाहताना होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकदा मराठी चित्रपटांसंदर्भात बोलताना ग्रामीण आणि शहरी भागातले चित्रपट अशी ठळक वर्गवारी केली जाते. मराठी माणूस कर्तृत्वाने कुठच्या कुठे पोहोचला आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे, सामाजिक स्थिती बदललेली आहे. पण हे चित्र अगदी मुंबई-पुण्यासारख्या शहरातही एकसारखंच आहे असं म्हणणं खरोखर धार्ष्ट्याचं ठरेल. त्यामुळे जयंत दिगंबर सोमलकर यांच्या ‘स्थळ’ या चित्रपटात ग्रामीण भागातील मुलीची दिसणारी ससेहोलपट हे आजचं वास्तव आहे आणि ते फक्त गावांपुरतीच मर्यादित नाही. शहरातील राहणीमानानुसार आणि शिक्षणाच्या बाबतीत मिळणाऱ्या सोयीसुविधा हे लक्षात घेता ग्रामीण भागातील मुलींना स्वत:च्या कुटुंबीयांशिवाय खरोखरच खमका आधार मिळत नाही. आणि ज्या घरात मुलींवर किमान तिच्या शिक्षणाबाबतीत विश्वासच दाखवला जात नसेल तिथे तर परिस्थिती अगदी असहाय, हतबल अशीच आहे. डोंगरगावातील सविताची कथा ‘स्थळ’ चित्रपटात पाहायला मिळते. सविता बी.ए.च्या तिसऱ्या वर्षात शिकते आहे, शिवाय एमपीएससीच्या परीक्षेची तयारीही करते आहे. वर्णाने काळीसावळी असलेल्या सविताचं स्थळ बघायला अनेकजण येतात, प्रत्येकवेळी घरात तीच परिस्थिती, तोच उसना आशावाद चेहऱ्यावर बाळगून वावरणारी घरची माणसं दिसतात. सविता मात्र निर्विकार चेहऱ्याने वावरत असली तरी तिच्या मनात या सगळ्या परिस्थितीबद्दलचा राग धुमसतो आहे. आपल्या परीने आई-वडिलांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न ती करते. लग्न होईल, आधी शिक्षण तरी पूर्ण करू द्या म्हणणाऱ्या सविताचा आवाज तिच्या आई-वडिलांपर्यंत, भावापर्यंत पोहोचतच नाही. सतत स्थळ पाहायला येणाऱ्यांना सामोरं जाऊन कंटाळलेल्या सवितासाठी तिचं महाविद्यालयीन विश्व, शिक्षण आणि तिच्याकडे बऱ्यापैकी आकर्षित होणारे खापणे सर हाच काय तो छोटा आनंदाचा कोपरा आहे. मात्र, याच लग्नाच्या बाजारात त्या आनंदाच्याही ठिकऱ्या उडतात. सुशिक्षित – अशिक्षित यातलं अंतरच मिटवून टाकणारा हा धागा आहे. महाविद्यालयात दिले जाणारे स्त्री सशक्तीकरणाचे धडे हे फक्त पाठ्यपुस्तकापुरतेच मर्यादित आहेत, हे भयाण सत्य पचवणाऱ्या सविताची अस्वस्थता, तिची घुसमट या सगळ्याची कथा म्हणजे ‘स्थळ’.

एकही नामवंत कलाकाराचा चेहरा नाही, चित्रपटात चकचकीतपणा नाही आणि तरीही केवळ विषयाच्या आणि कलावंतांच्या नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर दिग्दर्शक जयंत सोमलकर यांनी प्रेक्षकांना चित्रपटाशी बांधून ठेवलं आहे. चित्रपटात संवादही मोजकेच आहेत. गाव, गावातली घरं, घराबाहेर चकाट्या पिटणारे बेरोजगार तरुण, शिक्षणात फार रस न घेता घरच्याच शेती वा व्यवसायात स्वत:ला जोडून घेणारे तरुण, इंटरनेट – मोबाइल कृपेने खुली झालेली स्वप्निल दुनिया आणि वास्तवात स्वप्नांचे कोलमडणारे इमले या सगळ्या बारीकसारीक तपशिलांची कथेच्या ओघात पखरण करत लेखक – दिग्दर्शकाने वास्तवाची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे एका अर्थाने मुख्य कथा सविताची असली तरी तिचा भाऊ, मैत्रिणी, आई-वडील, शिक्षक या सगळ्यांचा दृष्टिकोन, त्यांच्या जगण्याचं वास्तव दिग्दर्शकाने समोर ठेवलं आहे. गावागावांमध्ये पोहोचलेला आधुनिकपणा कुठपर्यंत? तो त्यांच्या विचारांमध्ये, सामाजिक- आर्थिक परिस्थितीमध्ये कमी आणि ‘आय लव्ह डोंगरगाव’ नावाची पाटी लावलेल्या सेल्फी स्थळापुरताच मर्यादित आहे. तरुणांच्या हातात आलेला मोबाइल हीच आधुनिकता… बाकी कापसाचा ऐनवेळी पडणारा हमीभाव, शिक्षणाचा अभाव, त्यातल्या त्यात काहींनी शिक्षणाच्या जोरावर सरकारी नोकऱ्या पकडल्या आहेत, पण मग अशा तरुण उमेदवारासाठी मुलगी सुंदर, देखणी, शेतीच्या, घरच्या कामात मदत करणारी आणि लाखोंनी हुंडा देणारीच हवी. ज्या मुलींच्या बापांना हे जमलं त्यांच्यापुरती आयुष्याची कोडी सुटली. बाकी आपल्या परीने आत्महत्येपासून कुढत जगत राहण्यापर्यंत मार्ग चोखाळत राहतात. अशा परिस्थितीत सविताला तिच्या अस्वस्थतेचं उत्तर तरी कसं सापडावं? परंतु, खरोखरच आत्मीयतेने आणि मर्यादित आर्थिक क्षमतेतही प्रभावी पद्धतीने केलेले ‘स्थळ’सारखे चित्रपट महत्त्वाचे आहेत ते नाकारता कामा नयेत.

स्थळ

दिग्दर्शक : जयंत दिगंबर सोमलकर

कलाकार : नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग धवस, संदीप सोमलकर, संदीप पारखी, स्वाती उलमाले, गौरी बदकी, मानसी पवार.