कर्नाटकात शैक्षणिक संस्थामध्ये मुलींनी हिजाब घातल्याचा मुद्दा अजूनही चर्चेत आहे. न्यायालयाचा निर्णय आलेला असला तरी वाद संपलेला नाही. मिस युनिव्हर्स २०२१ ठरलेल्या हरनाझ कौर संधूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने हिजाब घातलेल्या मुलींच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. हरनाझ एका कार्यक्रमात सहभागी झाली होती ज्यामध्ये एका पत्रकाराने तिला हिजाबबद्दल प्रश्न विचारला होता. पत्रकाराने विचारले असता कार्यक्रमाच्या सूत्रधाराने पत्रकाराला राजकीय प्रश्न विचारण्यास मनाई केली, मात्र हरनाझने त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले.
हरनाजझे हिजाबच्या वादावर नाराजी व्यक्त केली. समाजात प्रत्येक वेळी मुलींना लक्ष्य केले जाते, असे तिचे मत आहे. “तुम्ही नेहमी मुलींना का टार्गेट करता? तुम्ही अजूनही मला लक्ष्य करत आहात. उदाहरणार्थ, हिजाबच्या मुद्द्यावरूनही मुलींना लक्ष्य केले जात आहे. त्यांना (मुलींना) त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्या, त्यांना त्यांच्या स्थानी पोहोचू द्या, त्यांचे पंख कापू नका नका, तुम्हाला कापायचे असतील तर तुमचे पंख छाटा,” असे हरनाझने म्हटले. हरनाझचा हा व्हिडिओ १७ मार्चचा आहे.
मिस युनिवर्स २०२१’चा खिताब भारताच्या हरनाझ सिंधूने जिंकला होता. २१ वर्षीय हरनाझला १२ डिसेंबर रोजी इस्रायलच्या इलात येथील युनिव्हर्स डोममध्ये मिस युनिव्हर्सचा मुकुट देण्यात आला होता. तब्बल २१ वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा खिताब मिळाला होता. तिच्या आधी २१ वर्षांपूर्वी लारा दत्ताने २००० साली मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला होता.
या वर्षाच्या सुरुवातीला, कर्नाटकातील उडुपी येथील एका सरकारी महाविद्यालयात, हिजाब परिधान केल्याबद्दल सहा मुलींना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला होता. तेव्हापासून हिजाबचा संपूर्ण वाद सुरू झाला. या प्रकरणी नुकताच कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल दिला. विद्यार्थी शैक्षणिक संस्थांमध्ये ड्रेस कोडचे उल्लंघन करू शकत नाहीत. तसेच हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नाही असेही कर्नाटक हायकोर्टाने म्हटले.