एखाद्या संकल्पनेवरचा चित्रपट लोकप्रिय होतो किंवा एखाद्या चित्रपटातील एखादीच व्यक्तिरेखा लोकप्रिय होते. तेव्हा ती संकल्पना किंवा ती व्यक्तिेरखा घेऊन कथा पुढे नेली जाते. हॉलिवूडमध्ये यालाच चित्रपटांचे ‘सिक्वल’ म्हणतात. लोकांना जोपर्यंत ते सिक्वल्स आवडतात तोपर्यंत तो सिलसिला सुरू राहतो. मात्र, त्या व्यक्तिरेखेचा, संकल्पनेचा अवाका संपला की लोकांना पुन्हा मुळ कथेकडे घेऊन जायचे, ही हॉलिवूडची सध्याची प्रचलित पध्दत आहे, ज्याला ‘प्रिक्वल’ असे म्हटले जाते. ‘एक्समेन’, ‘प्लॅनेट ऑफ द एप्स’ यांचे सिक्वल्स आणि प्रिक्वल्सही अशाप्रकारे गाजले. हॉलिवूडच्या लाटेवर स्वार झालेल्या बॉलीवूडच्या नामी दिग्दर्शकांनी सिक्वलची परंपरा उचलली पण, प्रिक्वलला हात लावला नव्हता. मात्र, ‘दबंग’ची लोकप्रियता पुढे घेऊन जाण्यासाठी चुलबुल पांडेची कुळकथा सांगणारा प्रिक्वल काढायचे सलमान खानने ठरवले आहे.
सिक्वल्स आणि रिमेक या दोन प्रकारातले चित्रपट सध्या बॉलीवूडमध्ये बॉक्सऑफिसवर कमाल करत आहेत. मात्र, सिक्वल्सची मर्यादा संपली की काय करायचे हा प्रश्न प्रिक्वल या प्रकाराने सोडवला आहे. सलमानचा ‘दबंग’ चुलबुल पांडे इतका लोकप्रिय झाला की खानबंधूंनी आत्तापर्यंत काढलेल्या चित्रपटांनी एकत्रित जेवढा नफा कमावला नसेल तेवढा या एका चित्रपटाने मिळवला. सलमानलाही या चित्रपटाने कोटय़वधी रुपये मिळवून देणारा कलाकार म्हणून लौकिक मिळवून दिला, हे स्वत: सलमानने कबूल के ले आहे. डिसेंबरमध्ये या चित्रपटाचा सिक्वल प्रदर्शित होत आहे. मात्र, सिक्वलसाठी ‘दबंग’ची कथा पुढे नेताना आपल्यासमोर अनेक आव्हाने होती. व्यक्तिरेखा त्याच असल्या तरी संदर्भ बदलले होते. त्यामुळे हा सिक्वलही लोकांना तितकाच आवडला तर ‘दबंग’चा तिसरा भाग हा प्रिक्वल स्वरूपात काढणार असल्याचे सलमानने सांगितले.
‘दबंग’ चित्रपटाला एवढी लोकप्रियता मिळेल असे वाटले नव्हते. पण, चुलबुल पांडेची ही व्यक्तिरेखा लोकांना आपल्यातलीच एक वाटू लागली आहे. त्यामुळे सिक्वलवर पांडेजींचा अवतार संपवणे कलाकार म्हणून सलमानला आणि निर्माता म्हणून अरबाझलाही पटणारे नाही. हॉलिवुडमध्ये जसे प्रिक्वल निघतात त्याचप्रकारे तिसऱ्या भागात मला चुलबुल पांडे कसा घडला त्याची गोष्ट सांगायची आहे. हिंदीत हा प्रकार नवीन आहे. शिवाय, चुलबुल जर लोकांना इतका आवडला असेल तर त्याची कथा ऐकायला लोकांना नक्की आवडेल, असा विश्वास अरबाझ खानला वाटतो आहे. मात्र, त्यासाठी ‘दबंग २’ लोकांना आवडला तरच आपण पुढचे पाऊल उचलणार असल्याचे या खानबंधूंनी स्पष्ट केले आहे. पांडेजींनी जर प्रेक्षकांची मने या दुसऱ्या चित्रपटातही जिंकून घेतली तर पहिला प्रिक्वल बनवणाऱ्या चुलबुल पांडेची हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातही नोंद होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा