आयुष्यातील परिवर्तनाचा काळ
१९९३ मध्ये, शकुंतलाबाईंनी अकलूज, सोलापूर येथे राज्य सरकारने आयोजित केलेली प्रतिष्ठित लावणी स्पर्धा जिंकली. १९९६ मध्ये मात्र त्यांनी घुंगरू काही काळ दूर केले आणि त्या आई होण्यासाठी घरी परतल्या. त्यानंतर त्या सोलापुरात त्यांच्या बहिणीच्या पार्टीत सामील झाल्या, परंतु त्यांनी १९९७ मध्ये ते काम सोडले. त्यानंतर परत संगीतबारी थिएटरमध्ये गेल्या नाहीत. त्याऐवजी घरी राहून संगीतबारी संस्कृतीवर आधारित नाटकांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मधु कांबीकर यांच्यासोबत सखी माझी लावणी (१९९८) या नाटकाचे १०० प्रयोग केले. २००२ साली त्यांनी संगीत नाटक अकादमी-विजेते केशवराव बडगे यांच्यासोबत, रंगी रंगाला लोकरंग हा गाजलेला चित्रपट केला. शाहिर सगन भाऊ, पठ्ठे बापूराव आणि राम जोशी यांच्या जुन्या संगीतबारी गाण्यांकडे त्या सहज ओढल्या गेल्या. तसेच त्यांनी त्यांची आई, यमुनाबाई वायकर आणि रोशनबाई सातारकर यांसारख्या नर्तिकांच्या नाजुक अदाकारीचा सन्मान केला.
भूषण कोरगावकरांनी आपल्या संगीतबारी या मराठी पुस्तकात नमूद केले आहे की, त्यांनी एकदा शकूबाईंची (शकुंतलाबाईंची) तुझा रा नाही होनार कल्याण (तुझं काही भलं होणार नाही) ही लावणी ऐकली होती. या लावणीत प्रतारणा करणाऱ्या नायकाला नायिका शिव्याशाप देत आहे. ही लावणी शकूबाईंनी इतक्या ताकदीने सादर केली, ज्यामुळे प्रेक्षकांमधील ज्या पुरुषांनी स्त्रीचा विश्वासघात केला नाही, त्या पुरुषांनाही अपराधीपणा वाटू लागला होता. शकुंतलाबाईंना १९९९ सालामध्ये दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने आयोजित केलेल्या ‘भारतरंग’ महोत्सवात सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते आणि २००३ मध्ये कैरो, इजिप्त येथे आयसीसीआरने आयोजित केलेल्या फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये भाग घेतला होता. या वेगवगेळ्या कार्यक्रमातून त्यांना अनेक पारितोषिके मिळाली होती. त्यापैकी अनेक पारितोषिके त्यांच्या घराच्या टेरेसवर ड्रममध्ये ठेवली आहेत.
आणखी वाचा : व्यथा नर्तिकेच्या आयुष्याची … कथा घुंगरांच्या सामर्थ्याची ! (भाग १)
लावणीचे बदलते स्वरूप
या आधुनिक काळात गौतमी पाटील सारख्या नर्तकांनी लावणीचा एक वेगळा प्रकार आता लोकप्रिय केला आहे, मागच्याच वर्षी तिने केलेल्या अश्लील चाळ्यांच्या व्हिडिओने खळबळ उडाली होती. परंतु शकुंतलाबाई तिच्यावर इतरांसारखी टीका करत नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘गौतमी घुंगरूसुद्धा घालत नाही परंतु हा तिचा स्वतःचा प्रश्न आहे, तिचाही एक चाहता वर्ग आहे. आजही संगीतबारी थिएटरमध्ये संध्याकाळचे कार्यक्रम होतात, परंतु नृत्याचा दर्जा घसरला आहे. पुण्यातील गणेश पेठेतील ९० वर्षीय आर्यभूषण तमाशा थिएटर या महत्त्वाच्या संगीतबारीच्या जागेला शकुंतला भेट देतात तेव्हा, तरुण नर्तकी त्यांच्या फोनमधून वरही पाहत नाहीत, नवीन मुली कष्टाची पर्वा करत नाहीत. त्यांना व्यावसायिक किंवा ‘बॅनर’ शोमध्ये झटपट पैसे मिळवण्यात अधिक रस असतो, याची खंत शकुंतलाबाई व्यक्त करतात. तसेच प्रेक्षकांच्या बाबतीत व्यक्त होताना त्या म्हणतात, नवीन प्रेक्षकांनाही खऱ्या लावणीची जाण नाही. प्रेक्षकांनी नर्तकींशी गैरवर्तन केल्याची उदाहरणे आहेत. अनेक प्रसंगी पोलिसांना पाचारण करावे लागते.
आणखी वाचा : व्यथा नर्तिकेच्या आयुष्याची … अन् विश्वासघात करणाऱ्या पुरुषांनाही अपराधीपणा वाटू लागला ! (भाग २)
त्या म्हणतात, मूळ संगीतबारी लावणी जिवंत ठेवणारे आता फार कमी आहेत, त्यातील मुंबईचे लेखक, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते कोरगावकर आहेत. कोरगावकर यांनी लावणीके रंग, लव्ह आणि लावणी या दोन नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. मार्च, २०२३ मध्ये लावणी के रंग हे नाट्य भारतातील सर्वात मोठ्या स्पर्धेसाठी निवडले गेले होते. या नाटकातील भूमिकेसाठी शकुंतलाबाईंना महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर हे पारितोषिक मिळाले होते. दिल्लीत एका दिमाखदार समारंभात त्यांना हे पारितोषिक देण्यात आले होते. तो क्षण शकुंतला बाईंसाठी भारावून टाकणारा होता.