तो २७ वर्षांचा तरूण होता. लखनौच्या ‘आयआयएम’मध्ये शिकत असतानाचा सळसळत्या उत्साहाचा, बुध्दीमान असा मंजूनाथ शण्मुगम. तो जितका अभ्यासू होता तितकाच तो संगीतप्रेमी होता. नेहमी ओठात गाणे असणारा मंजूनाथ मित्रांच्या गळ्यातला ताईत होता. रितसर पदवी घेऊन ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन’मध्ये सेल्स अधिकारी म्हणून नियुक्त झालेला मंजूनाथ आपल्या कामातही तितकाच सच्चा होता. त्यामुळे उत्तर प्रदेशातील लाखिमपूरमधील पेट्रोल भेसळ करणाऱ्या पंपांना ताळे ठोकण्याचा निर्णय घेतल्यानंतर कामावर असतानाच २००५ साली त्याची हत्या करण्यात आली. त्याआधी दोन वर्षांपूर्वी अशाचप्रकारे भ्रष्टाचाराविरुध्द लढा देणाऱ्या सत्येंद्रनाथ दुबे या अभियंत्याचीही हत्या करण्यात आली होती. अशाप्रकारे हुशार आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या तरूणांना बलिदानच द्यावे लागणार का?, असा सवाल मंजूनाथची कथा रुपेरी पडद्यावर आणणाऱ्या दिग्दर्शक संदीप वर्मा यांनी केला आहे. मंजूनाथ शण्मुगमची कथा. त्याचा ‘आयआयएम’पासून ते ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन’ पर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर त्याची झालेली दुर्दैवी हत्या, त्याच्या हत्येनंतर त्याच्या मित्रांनी, सहकाऱ्यांनी ‘मंजूनाथ शण्मुगम ट्रस्ट’च्या माध्यमातून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी उभारलेला लढा संदीप वर्मा यांनी ‘मंजूनाथ’ या चित्रपटात मांडला आहे. आत्तापर्यंत ‘भाग मिल्खा भाग’, ‘मद्रास कॅफे’ सारख्या वेगळ्या पण व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती आणि वितरण सांभाळणाऱ्या ‘व्हायकॉम १८’ने या चित्रपटासाठी पुढाकार घेतला आहे. सत्येंद्रनाथ दुबे, मंजूनाथ शण्मुगमसारख्या भ्रष्टाचाराच्याविरोधात वैयक्तिक स्तरावर लढा देणाऱ्या सामान्य तरूणांच्या असामान्य कर्तृत्वाची गोष्ट ही लोकांसमोर आलीच पाहिजे, असे मत संदीप वर्मा यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना व्यक्त केले. तर सिनेमा व्यवसायात असल्यानेच केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर चित्रपट हे प्रभावी समाजमाध्यम आहे हे लक्षात घेऊन अशा वेगळ्या चित्रपटांची निर्मिती ही आपली जबाबदारीच असल्याचे ‘व्हायकॉम १८’चे सीओओ अजित अंधारे यांनी सांगितले.
खरेतर, ‘मंजूनाथ शण्मुगम ट्रस्ट’ने केवळ काही पोस्टर रचनांचे काम संदीप वर्माकडे दिले होते. पण, त्यानिमित्ताने मंजूनाथच्या वास्तवापर्यंत पोहोचलेल्या वर्मानी त्यावर चित्रपट करायचा निर्णय घेतला. या चित्रपटासाठी तब्बल तीन वर्ष मंजूनाथचे काम, त्याचे शिक्षण, घटनाक्रम या सगळ्याबद्दल संशोधन आणि अभ्यास करून मग पटकथा लिहिण्यात आल्याची माहिती वर्मा यांनी दिली. या चित्रपटाचे चित्रिकरण हे ‘आयआयएम’ आणि जिथे मंजूनाथ काम करत होता, जिथे त्याची हत्या करण्यात आली अशा वास्तव ठिकाणीच करण्यात आली. मात्र, मंजूनाथ प्रकरणानंतरची परिस्थिती लक्षात घेऊन वेगळ्याच नावाने चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आले असेही वर्मा यांनी यावेळी बोलताना सांगितले. मंजूनाथ एक कर्तव्यदक्ष अधिकारी होता. आपण जो निर्णय घेतो आहोत तो खरा असला तरी त्याचे परिणाम काय होणार हे माहित असूनही त्याने धैर्याने तो निर्णय घेतला. आज व्यवस्थेतच भ्रष्टाचार आहे असे म्हणणारे आपण निदान या चित्रपट पाहिल्यानंतर तरी ‘मंजूनाथ’सारखा निर्णय आपण कधी घेऊ शकतो का?, याबद्दल आत्मपरीक्षण करू शकलो तर हा चित्रपट यशस्वी झाला असे वाटेल, अशी भावना अजित अंधारे यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा