डोळ्यांवर पट्टी बांधून चालत राहावे आणि कालांतराने पट्टी उघडल्यानंतर एव्हरेस्ट सर केल्याची जाणीव मला ‘व्हेंटिलेटर’ पूर्ण झाल्यानंतर झाली. ११६ कलाकारांचा ताफा, रुग्णालयात २२ दिवसांचे चित्रीकरण सांभाळून हा चित्रपट केव्हा पूर्ण झाला हे माझेच मला कळले नाही. हम चलते रहे और कारवां बनता चला गया याप्रमाणे चित्रपटाची कथा लिहिण्यापासून अभिनेत्यांची निवड करेपर्यंतचा प्रवास खूप रोमांचकारी होता. अगदी संहिता लिहिण्यापासून ते बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचे मराठी चित्रपटसृष्टीत निर्माती म्हणून पदार्पण, सुमारे दोन दशकांनंतर आशुतोष गोवारीकर यांनी चित्रपटात अभिनेत्याच्या भूमिकेत झळकणे आणि झी मीडियाने या चित्रपटाची धुरा सांभाळणे या सर्व गोष्टी सर्वाच्या सकारात्मकतेतून जुळून आल्या. लेखक आणि दिग्दर्शक अशी दुहेरी बाजू सांभाळायची असल्यामुळे थोडा ताण होताच. मात्र संहिता लिहीत असताना तातडीने भूमिकेसाठी कलाकार निवडण्याची जबाबदारी माझा भाऊ रोहन मापुसकर याने उचलली. त्यामुळे कथा पूर्ण झाल्यानंतर कलाकारांची शोधाशोध करावी लागली नाही. कथा लिहिताना ज्या कलाकारांची निवड करण्यात आली अगदी ९९ टक्केतेच कलाकार मूळ चित्रपटात पाहायला मिळतात. मात्र चित्रपटातील ‘राजा’ची भूमिका लिहिताना माझ्या डोक्यात कुठल्याच अभिनेत्याचा विचार नव्हता. मी आशुतोष गोवारीकरांनी अभिनय केलेले खूप कमी चित्रपट पाहिले आहेत, असे असले तरी ऑस्कपर्यंत झेप घेणाऱ्या या मराठी दिग्दर्शकापासून मी प्रभावीत आहे. त्यामुळे कथा लिहीत असताना एके ठिकाणी आशुतोष या भूमिकेसाठी योग्य असल्याची जाणीव झाली आणि हळूहळू ‘राजा’ या पात्राचे ‘गोवारीकरण’ होत गेले. आशुतोषला चित्रपटात काम करण्याबाबत विचारणा केल्यानंतर त्याच्याकडून होकार आला आणि माझ्या मराठी चित्रपटाच्या पदार्पणाचे पहिले पाऊल यशस्वी ठरले. मराठी चित्रपटसृष्टीत काम करण्याचा हा पहिला अनुभव खूप भारावून टाकणारा होता. मराठी कलाकार चांगली कलाकृती तयार व्हावी यासाठी जीव ओतून काम करतात, मी तर म्हणेन ते चित्रपट जगतात. िहदीत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटांना साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर मी माझा ‘फेरारी की सवारी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. िहदी आणि मराठी चित्रपटांची जातकूळ वेगळी असली तरी मराठी कलाकारांनी जो जिव्हाळा दिला, तो िहदी चित्रपटसृष्टीत अभावाने मिळतो. त्यातच ‘व्हेंटिलेटर’ ही कथा लिहिताना मजा आली. मुळात जी कथा तुम्हाला दिग्दíशत करायची आहे त्याचे लेखनही तुम्ही केले तर संहितेत वेगवेगळे पलू हाताळले जाऊ शकतात. आपल्याकडे दर्जेदार संहिता मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक दिग्दर्शक स्वत: संहिता लिहिणेच योग्य समजतात आणि मला आता लिहिण्यातही आनंद मिळत आहे. यापुढेही मराठीसाठी अनेक चित्रपट लिहिण्याची इच्छा आहे. ‘व्हेंटिलेटर’ ही कथा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी संबंधित आहे. ‘व्हेंटिलेटर’ ही कथा लिहिण्याबरोबरच याचे दिग्दर्शन करणे अधिक आव्हानात्मक होते. ‘बीटविन द लाइन्स’प्रमाणे कथेच्या संवादामध्ये अनेक विचार, भावना दडलेल्या आहेत. मात्र प्रत्येक अभिनेत्याला ते स्पष्ट करून सांगणे शक्य नव्हते. मात्र या चित्रपटातील प्रत्येक अभिनेत्याकडे अफाट सर्जनशीलता आहे. त्यामुळे मी सांगण्यापूर्वीच मला अभिनयाची वेगवेगळी रूपे पाहावयास मिळाली.
‘मी भूमिका जगतो’
मला ‘सुपरस्टार’ व्हायचे नाही. ‘व्हेंटिलेटर’मध्ये मी साकारलेल्या ‘प्रसन्ना’ या भूमिकेसाठी माझ्या वाटय़ाला खूप कमी प्रसंग आहेत. चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार किंवा हिरोची भूमिका या चित्रपटात नाही. मात्र मुळात मला हिरो व्हायचेच नाही. जेथे माझ्यातील अभिनेत्याला वाव मिळू शकतो अशाच भूमिका साकारणे मी पसंत करतो. ‘दुनियादारी’ या चित्रपटातही माझ्या वाटय़ाला खूप कमी प्रसंग होते, मात्र मी साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. भूमिकेची लांबी रुंदी महत्त्वाची नसते. माझ्या मनातील भावना त्या भूमिकेच्या वृत्ती आणि गरजेनुसार मी व्यक्त करतो. जर खलनायकाची भूमिका असेल तर माझ्यातील राग, क्रोध, आक्रोश त्या भूमिकेतून व्यक्त होतो. मला आयुष्यात माझ्यातील अभिनेत्याला जिवंत ठेवता येईल अशाच भूमिका आणि कलाकृतीत काम करायचे आहे. त्यामुळे हिरो किंवा सुपटस्टारची चौकट मी केव्हाच ओलांडली आहे. मुळात मी भूमिका जगतो. ती भूमिका माझ्यात भिनते आणि चांगल्या अभिनेत्यासाठी हे गरजेचे आहे. ‘व्हेंटिलेटर’ची संकल्पना खूप दर्जेदार आहे. राजेश मापुसकर यांनी हा विषय सोप्या भाषेत आमच्यापर्यंत पोहोचवला.
जितेंद्र जोशी
‘समृद्ध करणारा चित्रपट’
अनेक वर्षांनंतर मराठी चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा चित्रपट आणल्याबद्दल प्रथम मला आशुतोष, राजेश आणि प्रियांका चोप्रा यांचे आभार मानायचे आहेत. मराठी चित्रपटसृष्टीचे दालन या चित्रपटामुळे विस्तारले असून ‘व्हेंटिलेटर’ने लोकांच्या मनातील हळव्या कोपऱ्याला हात घातला आहे. वडील आणि मुलगा यांच्या नातेसंबंधातील जिव्हाळ्याचे मात्र कधीही न उलगडलेले धागे या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आहेत. ‘व्हेंटिलेटर’ प्रदर्शित झाल्यानंतर येणाऱ्या प्रतिक्रिया मन हेलावून टाकणाऱ्या आहेत. या चित्रपटाने प्रेक्षकांना रडवले आणि त्याच वेळी समृद्धही केले आहे.
खूप चांगल्या गोष्टी एकत्र येऊन, त्याची भट्टी चांगली जमून त्यातून एक उत्तम मराठी चित्रपटनिर्मिती होणे ही दुर्मीळच गोष्ट आहे. त्यामुळे वर्षभरात येणाऱ्या शंभर मराठी चित्रपटांमध्ये आवर्जून पाहण्यासारखे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच असतात. ‘व्हेंटिलेटर’ हा त्या दुर्मीळ चित्रपटांमधला एक आहे. हिंदी चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्राची निर्मिती, हिंदीतच दिग्दर्शनाचा श्रीगणेशा करणाऱ्या दिग्दर्शक राजेश मापुसकर यांचा पहिला मराठी चित्रपट आणि हिंदीत ‘ऑस्कर’पर्यंत दिग्दर्शक म्हणून धडक मारणाऱ्या आशुतोष गोवारीकर यांचा अभिनेता म्हणून पाहण्याची संधी देणारा हा चित्रपट. या चित्रपटाच्या निमित्ताने स्वत: आशुतोष गोवारीकरांनी ‘व्हेंटिलेटर’मध्ये अभिनेता म्हणून काम करण्याचा अनुभव ते ‘मोहेंजोदारो’चे अपयश, ऐतिहासिक चित्रपट करण्यामागची भावना या साऱ्याविषयी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात येऊन मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्याबरोबर दिग्दर्शक राजेश मापुसकर, अभिनेता जितेंद्र जोशी, ‘झी स्टुडिओ’चे निखिल साने यांनीही ‘व्हेंटिलेटर’मागचा त्यांचा अनुभव, प्रवास याविषयीच्या भावना व्यक्त केल्या..
निखिल साने
राजेश म्हापूसकर
(शब्दांकन- रेश्मा राईकवार, मीनल गांगुर्डे)