सिनेमा, सौजन्य – कोकणी माणसाला त्याचा गाव, त्याची जमीन आणि त्यातही त्याची वाडी म्हणजे जीव की प्राण.. अशा वाडीवर घाला येणार असेल तर तो काय करील, हे मांडणारा ‘नारबाची वाडी’ हा सिनेमा येतो आहे आणि त्यात नारबाच्या भूमिकेचं सोनं केलं आहे दिलीप प्रभावळकर यांनी. त्यानिमित्त-
कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी.. हे गाणं काय किंवा कोकणातली माणसं फणसासारखी असतात, वरून काटेरी पण आतून गऱ्यासारखी गोड असं त्यांचं वर्णन केलं जातं. कोकणातला रसरशीत निसर्ग, आंबा-फणसाची झाडं आणि अस्सल कोकणी नारबाच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर. मराठी सिनेमात वेगवेगळे विषय अतिशय ‘फ्रेश लूक’मध्ये चित्रण करून उत्तम अभिनयाच्या साथीने सादर करणाऱ्या कल्पक दिग्दर्शकांच्या प्रभावळीत आदित्य सरपोतदार हे नाव ‘नारबाची वाडी’ या चित्रपटाच्या प्रोमोज् आणि ट्रेलर्सवरून चर्चिलं जात आहे.
कोकणातील निसर्गसौंदर्य, माडाची बनं, पोफळीच्या बागा, आंब्याचा मोहोर हे सारं आणि तिथल्या अस्सल तऱ्हेवाईक माणसांचे नमुने.. ‘व्यक्ती आणि वल्ली’ पुस्तकातील अंतू बर्वा मराठीच्या रुपेरी पडद्यावर साकारणारे दिलीप प्रभावळकर ‘नारबाची वाडी’ या आगामी मराठी सिनेमातून नारबा म्हणून रसिकांसमोर येणार आहेत. ‘नारबाची वाडी’ ही खरं तर १९४० सालापासून ते १९७० सालापर्यंतचा ३० वर्षांचा प्रदीर्घ कालखंड दाखविणार आहे.
मराठी चित्रपटाचे बंगाली कनेक्शन
मराठी आणि बंगाली साहित्य, नाटक आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रांना समृद्ध परंपरा आहे. मराठी आणि बंगाली साहित्यकृतींवर आधारित चित्रपटांचीही मोठी परंपरा आहे. ‘नारबाची वाडी’ या चित्रपटाद्वारे बंगाली नाटकाचा गाभा घेऊन मराठी संस्कृतीचा साज चढविण्याची किमया पटकथा-संवाद लेखक गुरू ठाकूर यांनी केली आहे. मराठी चित्रपटाचे बंगाली कनेक्शन स्पष्ट करायचे म्हणजे सुप्रसिद्ध दिग्दर्शक बासू चटर्जी यांच्या कन्या रूपाली गुहा आणि त्यांचे पती कल्याण गुहा यांच्या ‘फिल्म फार्म’ या संस्थेतर्फे ‘नारबाची वाडी’ या पहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘शज्जानो बागान’ या बंगाली नाटकाची संहिता मराठीच्या रुपेरी पडद्यावर साकारण्याचे स्वप्न गुहा दाम्पत्याने मनाशी धरले. सगळ्यात आधी मराठी दिग्दर्शकाचा शोध घेताना चार-पाच दिग्दर्शकांशी त्यांनी भेट घेतली आणि ‘उलाढाल’चे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार नारबाच्या वाडीत दाखल झाले. बंगाली नाटक, बंगाली संस्कृतीला धरून असलेले त्यातले वातावरण याचे रूपडे बदलून मराठी संस्कृतीचा साज चढविण्यासाठी सरपोतदारांनी गुरू ठाकूर यांना पाचारण केले. मूळचे कुडाळमधील असल्यामुळे नारबाची वाडी साकारण्यासाठी गुरू ठाकूर आणि आदित्य सरपोतदार यांनी अनेक लोकेशन्स शोधली आणि अखेर कुडाळपासून ३०-३५ किलोमीटर आतमध्ये असणाऱ्या मुणगी गावात त्यांना नारबाची वाडी सापडली. टीव्हीवर गाजलेले ‘शिऱ्या’ आणि ‘आबा’ म्हणजे अभिनेता विकास कदम आणि दिलीप प्रभावळकर रसिकांसमोर या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा नातू आणि आजोबांच्या भूमिकेत येणार आहेत. दरोडय़ाचा प्रसंग असो की समूहाची काही दृश्यं असोत मुणगी परिसरातील स्थानिक लोकांचाही चित्रपटात सहभाग असून त्यांच्याकडूनही दिग्दर्शकाने काम करवून घेतले आहे. स्थानिक गावकऱ्यांच्या सहाकार्यातून चित्रपट तयार झाला आहे, हा एक चांगला योगायोग होता.
नारबाने त्यांच्या हाताने लावलेल्या असंख्य झाडांची वाडी आता रसरशीत फळांनी डवरली आहे. नारबा त्या झाडांशी गप्पा करतात, त्यात रमतात. पण आपल्या या वाडीवर खोताचा डोळा आहे हे समजताच मरेपर्यंत तरी ही वाडी आपली राहावी यासाठी ते झटतात. त्याची ही गोष्ट म्हणजे ‘नारबाची वाडी’ असं एका वाक्यात कथानक सांगता येईल. पण लेखक-दिग्दर्शक आणि निर्माते यांनी रंगवलेली ही ‘नारबाची वाडी’ महानगरीय जीवनशैलीत वाढणाऱ्या प्रेक्षकांनाही नक्कीच काहीतरी देऊन जाईल, हळवं करून जाईल, असा विश्वास दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी व्यक्त केला.
या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक योग जुळून आले आहेत. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’नंतर आबा आणि शिऱ्या म्हणजे विकास कदम प्रथमच एकत्र आले आहेत, तेही आजोबा-नातू याच भूमिकेत. पण यातले आजोबा-नातू खूप वेगळेच आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘शज्जानो बागान’ या मनोज मित्रा लिखित बंगाली नाटकावर आधारित हा चित्रपट आहे. बंगालची समृद्ध नाटय़-चित्रपट संस्कृती माहीत असलेले निर्माते कल्याण गुहा, रुपाली गुहा यांचा हा पहिला मराठी चित्रपट आहे. नवीन दिग्दर्शकाला संधी द्यायची हे त्यांनी आधीच ठरवलं होतं. या नाटकाच्या इंग्रजी अनुवादाचं बाड घेऊन सगळ्यात पहिले गुहा द्वय यांनी गुरू ठाकूर यांच्याशी संपर्क साधला. आणि पटकथा लेखक म्हणून गुरू ठाकूर यांनी काम सुरू केलं. मराठी दिग्दर्शकांपैकी चार-पाच जणांची भेट घेतल्यानंतर त्यापैकी आदित्य सरपोतदार यांची निवड करण्यात आली आणि चित्रपटाच्या टीममध्ये आदित्य सरपोतदार दाखल झाले.
सुरुवातीला आमच्या मनात मूळ बंगाली नाटकाचा व्हिडीओ पाहण्याचा विचार होता; परंतु गुरू ठाकूरशी चर्चा केल्यानंतर आम्हाला मराठीत सिनेमा करायचा आहे, बंगालीऐवजी मराठी संस्कृती त्यात आणायची आहे तर नाटक पाहण्यापेक्षा इंग्रजी अनुवाद वाचून त्यातून आम्ही निर्मात्यांशी चर्चा करून पटकथा तयार केली, असं सरपोतदार म्हणाले.
वाचिक अभिनयाचा आणखी एक प्रयोग
या चित्रपटात आपण वयाच्या साठीपासून ते नव्वदीपर्यंत वृद्धापकाळातील तीन अवस्था दाखविल्या आहेत. नारबाच्या वाडीचा मालक असलो तरी पिढय़ान्पिढय़ा गावच्या खोताची दहशत, त्याला नारबाची वाडी गिळंकृत करायची असल्यामुळे खोताचे दडपण दाखवितानाच कोकणी हेल काढून बोलणे, बोलण्या-वागण्यातला इरसालपणा, इबलिसपणा, खवचटपणा अशा छटा दाखविल्या आहेत. संपूर्ण चित्रीकरण मुणगी गावात एका शेडय़ुलमध्ये पूर्ण केले. त्यामुळे कोकणातल्या इतक्या अंतर्गत भागात राहण्याची, तिथला निसर्ग अनुभवण्याची, तिथल्या लोकांचे व्यवहार पाहून अस्सल नारबा साकारण्यासाठी खूप उपयोग झाल्याचे दिलीप प्रभावळकर यांनी नमूद केले. हा चित्रपट विनोदी नाही. पण कथानकात अनेक प्रसंगनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ अशी विनोदनिर्मिती या नारबाने केली आहे. खास मुणगी गाव आणि तिथल्या परिसरात वापरल्या जाणाऱ्या म्हणी गुरू ठाकूरने पेरल्या आहेत. मुख्य म्हणजे एरवी पटकथा-संवाद लेखक चित्रीकरणाच्या वेळी उपस्थित असतोच असे नाही. परंतु गुरू ठाकूर संपूर्ण चित्रीकरणाच्या वेळी उपस्थित होता. त्यामुळे वैशिष्टय़पूर्ण म्हणी किंवा स्थानिक लोकांची वागण्याची पद्धत, काही लकबी याविषयीच्या शंकांचे निराकरण लगेच करून घेता येत होते. वृद्ध व्यक्तिरेखा काही साकारल्या असल्या तरी प्रत्येक भूमिकेचे वैशिष्टय़, छटा, वेगवेगळी असते. एक नट म्हणून वाचिक अभिनयाचे प्रयोग करणं आवश्यक असतं. त्या त्या भागातल्या व्यक्तिरेखा साकारताना वाचिक अभिनयाचे प्रयोग करण्यासाठी तिथल्या वातावरणात राहून लोकांशी गप्पा करणं, अप्रत्यक्षपणे त्यांना न्याहाळणं, त्यांचे आपापसातील व्यवहार कसे केले जातात, त्याचे निरीक्षण करणे हे सगळे खूप दिवस मुणगी गावातील वातावरणात राहिल्याने शक्य झाले. वाचिक अभिनयाचा आणखी एक प्रयोग करता आला, याचे समाधान निश्चित आहे, असेही दिलीप प्रभावळकरांनी आवर्जून नमूद केले.
मी आणि गुरू आमच्या दोघांच्याही मनात सिनेमा व्हिज्युअलाईज करताना ‘मालगुडी डेज’ ही मालिका एकसारखी झळकून जात होती. अशाच पद्धतीने १९४०-७० चा काळ आपल्याला पडद्यावर साकारायचाय हे मनात पक्कं होत गेलं. आणि पहिल्या प्रथम नारबाच्या ६० र्वष वयापासून ते ९० र्वष वयापर्यंतचा काळ सामर्थ्यांने दाखवू शकतील असं एकमेव नाव म्हणजे दिलीप प्रभावळकर हेही आम्ही पक्कं केलं. पटकथेचा खर्डा तयार होत होता. सगळ्यात मोठं आव्हान होतं ते ‘व्हर्जिन लोकेशन’. कोकणात नारबाची वाडी उभी करायची म्हणून आम्ही अलिबागपासून ते थेट रत्नागिरीपर्यंत गावं शोधली. रत्नागिरीला गेल्यानंतर काही लोकांनी आम्हाला अभिप्रेत असलेली नारबाची वाडी कुडाळजवळ सापडू शकेल असं सांगितलं. जुना काळ दाखवायचा तर आजच्या कोकणात विजेचे खांब, आधुनिकीकरण बऱ्यापैकी झालं आहे. त्यामुळे लोकप्रिय ठिकाणांपासून पूर्णपणे वेगळं आणि अंतर्गत भागातीलच एखादं गाव असलं पाहिजे हेही जाणवत गेलं. अखेर बऱ्याच शोधानंतर कुडाळजवळ नारबाची वाडी आम्हाला सापडली. नारबाची वाडी आम्हाला अभिप्रेत होती अगदी तशी सापडली आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला, असं आदित्य सरपोतदार यांनी नमूद केलं.
‘नारबाची वाडी’ हा चित्रपट म्हणजे एका वृद्ध माणसाचा झगडा पण आहे आणि त्याला तिरकस, उपहासात्मक विनोदाची हलकीशी फोडणी दिली आहे. गुरू ठाकूर यांनी लिहिलेल्या पटकथा-संवादांना राहुल जाधव यांनी आपल्या छायालेखनाने तर मंगेश धाकडे यांनी संगीत दिग्दर्शनाने पडद्यावर साकारलंय. दिलीप प्रभावळकर आणि खोताच्या भूमिकेतील मनोज जोशी हे प्रमुख कलावंत असून विकास कदम, निखिल रत्नपारखी, अतुल परचुरे, भालचंद्र कदम, किशोरी शहाणे, कमलाकर सातपुते, अंबरीश देशपांडे, सुहास शिरसाट, शशिकांत केरकर आदींच्या छोटय़ा छोटय़ा पण महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘नारबाची वाडी’ हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.