पाकिस्तानमधील तुरुंगात तब्बल २३ वर्षे खितपत पडलेल्या सरबजीत सिंगच्या सुटकेसाठी त्याची बहीण वणवण करीत होती. आपल्या भावाच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येणार असे तिला वाटत असतानाच २०१३ मध्ये सरबजीतच्या मृत्यूची वार्ता कुटुंबीयांच्या कानावर आली आणि या कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. सरबजीत सिंगच्या जीवनावर आणि त्याच्या बहिणीच्या त्याला सोडविण्याच्या धडपडीची कथा लवकरच मोठय़ा पडद्यावर येणार असून त्याची बहीण दलबीर कौरच्या नजरेतून ही गोष्ट सांगण्यात येणार आहे.
लाहोर आणि फैजलाबाद येथे १९९० मध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर सरबजीत सिंगला पाकिस्तानी सैन्याने अटक केली होती. तो या हल्ल्याचा मुख्य आरोपी मनजीत सिंग असल्याचा ठपका ठेवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण पुरेशा पुराव्यांच्या अभावी आपण निर्दोष असल्याचे न्यायालयासमोर सिद्ध करता आले नाही आणि १९९१ मध्ये त्याला फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली होती. त्याचदरम्यान त्याची बहीण दलबीर कौरला तो पाकिस्तानात असल्याची बातमी कळली आणि आपल्या भावाच्या सुटकेसाठी तिने प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांना यश मिळून २०१३ मध्ये पाकिस्तान सरकारने सरबजीतला सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यावेळी तुरुंगातील कैद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
सरबजीतच्या जीवनावर आणि त्याच्या सुटकेसाठी दलबीरने केलेल्या संघर्षांवर दिग्दर्शक उमंग कुमार चित्रपट तयार करणार असून ‘मेरी कॉम’नंतर त्यांचा हा दुसरा चरित्रात्मक चित्रपट आहे. ‘मेरी कॉम’नंतर मी तीन वेगळ्या विषयांवर काम करीत होतो, परंतु सरबजीतचा विषय मला भावला आणि त्यावर चित्रपट तयार करण्याचा मी निर्णय घेतला,’ असे उमंग कुमारने सांगितले. सध्या या चित्रपटाच्या कथेवर संशोधन सुरू आहे. येत्या ऑक्टोबरपासून चित्रीकरणाला सुरुवात होणार असून चित्रीकरण पंजाबमध्ये होणार आहे. सरबजीतच्या सुटकेसाठी अतोनात कष्ट घेणाऱ्या दलबीरची भूमिका या कथेमध्ये महत्त्वाची आहे. त्यावेळी तिच्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली होती आणि जगभरातून वेगवेगळ्या स्तरातून तिला लोकांचा पाठिंबा मिळत होता. त्यामुळे हा चित्रपट तिच्या नजरेतून उलगडला जाणार असून त्यासाठी नायिकेचा शोध सुरू आहे. यामध्ये कंगना रनावतचे नाव पुढे येत आहे. ‘क्वीन’मधील आपल्या सशक्त अभिनयाने कंगनाने सर्वाना तिची दखल घ्यायला भाग पाडले होते. आपणही कंगनासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहोत, पण अजूनही त्या संदर्भात आमची काहीही बोलणी झालेली नाहीत, असे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा