अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या आगामी छपाक या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये दीपिकाने अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालची भूमिका वठविली आहे. प्रदर्शित झालेल्या फर्स्ट लूकमध्ये दीपिका हुबेहूब लक्ष्मीप्रमाणे दिसत असल्यामुळे सध्या तिचीच चर्चा सुरु आहे. या चर्चेंमध्ये अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोलीने तिची प्रतिक्रिया दिली होती. तिच्या प्रतिक्रियेनंतर दीपिकाचा पती रणवीर सिंगनेही प्रतिक्रिया देत दीपिकाचं कौतुक केलं आहे.

चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर रणवीरच्या प्रतिक्रियेची साऱ्यांनाच उत्सुकता होती. अशातच रणवीरने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
“छपाकसाठी दीपिका तू करत असलेले प्रयत्न या लूकमधून दिसून येत आहेत. तुझा हा नवा लूक थक्क करणारा आहे. मी लूक पाहून मी खरंच आश्चर्यचकीत झालो आहे. आज मला तूझा अभिमान वाटतोय”, अशी कमेंट रणवीरने दीपिकाला दिली आहे. विशेष म्हणजे रणवीर कायमच दीपिकाला तिच्या करिअरमध्ये सपोर्ट करताना पाहायला मिळतो. यापूर्वी अनेक वेळा त्याने गर्वाने दीपिकाची पाठ थोपटली आहे.

दरम्यान, रणवीरपूर्वी रंगोलीनेदेखील दीपिकाचं कौतुक केलं होतं. ‘हे जग कितीही अन्यायकारण आणि अप्रामाणिक असलं तरी आपल्याला ज्याचा द्वेष आहे ते कधीच आपल्या वागण्यातून दाखवू नये. मी स्वत: एक अॅसिड हल्ला पीडित असल्याने दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या बाजूने खंबीरपणे उभी राहीन,’ असं तिने ट्विट केलं होतं.

 

Story img Loader