विक्रम (रणदीप हुडा) हा केपटाऊनमध्ये फॅशन आणि वन्यजीव छायाचित्रणाच्या कामासाठी आलाय. परंतु, इथे त्याला फारसे काम मिळत नाही, पैशाची चणचण असते. तिथे काही मित्रमंडळींमध्ये त्याला रोशनी (अदिती राव हैदरी) भेटते. स्वत: एक उत्तम, देखणी मॉडेल असलेली रोशनी आणि विक्रम यांच्यात प्रेम जुळते. त्या दरम्यान विक्रमला भारतातून कामाची ऑफर मिळते. एक वर्षभरासाठी रोशनीला सोडून राहण्याचा विचार विक्रमला सहन होत नाही. परंतु, हवे तसे काम आणि योग्य तो मोबदला मिळेल म्हणून तो भारतात येण्यासाठी तयार असतो. रोशनीला हे पटवून कसे द्यायचे हा प्रश्न त्याला सतावत असतो. अखेर तो रोशनीला याबाबत सांगतो आणि विक्रमवर ‘बेहद’ प्रेम करणारी रोशनी आपले करिअर सोडून भारतात यायला सहजपणे तयार होते. दोघे मुंबईत येतात आणि विक्रम कामामध्ये गढून जातो.
फॅशन फोटोग्राफीचेच काम असल्यामुळे त्यानिमित्ताने नियोनी त्याच्या आयुष्यात येते. नियोनी आणि रोशनीचीही भेट होते. तेव्हापासून रोशनी-विक्रम यांच्या नात्यात काहीशी अढी निर्माण होते. दरम्यान, विक्रम तिला ‘सरप्राईज’ देतो आणि ते दोघे फिरायला गोव्याला जातात. रोशनी एका परदेशी व्यक्तीकडून एक छानसा बंगला खरेदी करते. रोशनी-विक्रम नव्या आलिशान, प्रशस्त बंगल्यात राहायला येतात. विक्रमच्या मोबाइलवर आलेल्या एसएमएसवरून रोशनीला संशय येतो. सगळे सोडून केवळ विक्रमच्या प्रेमाखातर आपण भारतात आलो आणि विक्रम मात्र दुसऱ्या तरुणीमध्ये गुरफटतोय की काय असा संशय तिला येतो. यातून मार्ग काढण्यासाठी, विक्रमच्या प्रेमाची परीक्षा पाहण्यासाठी रोशनीला बंगल्याची मूळ मालकीण एक उपाय सुचविते. पण त्याद्वारे विक्रमच्या आपल्यावरील प्रेमाची परीक्षा पाहण्याच्या प्रयत्नात रोशनी अशी काही गुरफटून जाते की तिचे आयुष्यच बदलते.
रोशनी अचानकपणे विक्रमच्या आयुष्यातून निघून जाते आणि निशा (सारा लॉरेन)चा विक्रमच्या आयुष्यात प्रवेश होतो. रेस्टॉरण्टमध्ये वेट्रेस असलेली निशा अति दारू प्यालेल्या विक्रमला आपल्या मैत्रिणीच्या मदतीने स्वत:च्या घरी आणते हे निमित्त दाखवून निशा-विक्रम यांचे प्रेम जुळलेले दाखवले आहे. रोशनी अचानक निघून गेल्यामुळे सैरभैर झालेला विक्रम लगेच निशाच्या प्रेमात पडतो असे दाखविले आहे जे पटत नाही.
मर्डर मालिकेतील या तिसऱ्या चित्रपटात इम्रान हाश्मीऐवजी रणदीप हुडाची निवड दिग्दर्शकाने केली आहे. याचे कारण बहुधा मूळ स्पॅनिश चित्रपटातील नायकाच्या व्यक्तिमत्त्वाशी असलेले साधम्र्य हे असू शकेल. सबंध चित्रपटात अदिती राव हैदरीने साकारलेली रोशनी लाजवाब. ती भाव खाऊन गेली आहे. सारा लॉरेन(या पाकिस्तानी अभिनेत्रीचे पूर्वीचे नाव मोना लिझा असे होते)ची संवादफेक भयंकर वाटते.
अभिनयाचा तिचा काहीच संबंध नाहीये हेही लक्षात येते. पोलीस अधिकाऱ्याची कबीर नावाची अतिशय छोटीशी व्यक्तिरेखा साकारत राजेश शृंगारपुरेला बॉलीवूडमध्ये प्रवेश मिळाला आहे. संगीताची बाजू भट कॅम्पच्या चित्रपटांमध्ये नेहमीच जमेची असते. परंतु, या चित्रपटाचे संगीत ऐकताना कंटाळा येतो, तेच तेच ऐकतो आहोत, यापूर्वी खूप वेळा ऐकून झाले आहे, असे वाटत राहते. त्यामुळे संगीताचा आनंदही प्रेक्षकांना घेता येत नाही. भयपटात सर्रास वापरले जाणारे ध्वनिसंयोजन या सिनेमात अति वापरल्यामुळे कर्कश झाले आहे.
छायालेखनाची कोणतीही कमाल नाही. परंतु, दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाद्वारे विशेष भटचे बॉलीवूड पदार्पण झाले आहे ही एक उल्लेखनीय बाब म्हणता येईल.
मर्डर थ्री
निर्माते – विशेष फिल्म्स, फॉक्स स्टार स्टुडिओज्
दिग्दर्शक – विशेष भट
लेखक – महेश भट, अमित मसुरकर
छायालेखक – सुनील पटेल
संकलक – देवेंद्र मुर्डेश्वर
संगीत – प्रीतम, रॉक्झेन बॅण्ड
कलावंत – रणदीप हुडा, राजेश शृंगारपुरे, अदिती राव हैदरी, सारा लॉरेन, शेखर शुक्ला, बग्स भार्गव व अन्य.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा