आशय प्रॉडक्शनच्या अनुराधा वाघ यांची निर्मिती असलेल्या आणि महेश घाटपांडे लिखित ‘ग्रेसफुल’ या नव्या नाटकात प्रेमाचा विचित्र त्रिकोण पाहायला मिळणार आहे. १५ ऑगस्ट रोजी पुण्यात नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. या नाटकात अभिनेत्री आदिती सारंगधर आणि आशा शेलार (‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील जान्हवीची आई) या प्रमुख कलाकार आहेत.
व्यावसायिक लेखक-दिग्दर्शक, महाविद्यालयातील प्राध्यापिका आणि रंगभूमीवरील एक अभिनेत्री यांच्या प्रेमाचा त्रिकोण नाटकात पाहायला मिळणार आहे. नाटकाचे दिग्दर्शन अभिनेते राजन ताम्हाणे यांनी केले असून नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे आहे. नाटकाचे संगीत परीक्षित भातखंडे यांचे तर मंगेश कांबळी नाटकाच्या सूत्रधाराच्या भूमिकेत आहेत.
‘ग्रेसफुल’बाबत बोलताना दिग्दर्शक राजन ताम्हाणे म्हणाले, नाटकात फक्त दोन स्त्री पात्रे असून आदिती सारंगधर ‘अभिनेत्री’चे तर आशा शेलार महाविद्यालयातील प्राध्यापिकेच्या भूमिकेत आहेत. प्रेमातला तिसरा त्रिकोण नाटकात फक्त आवाजाच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. ही अभिनेत्री आणि तो व्यावसायिक लेखक-दिग्दर्शक यांच्यात प्रेमसंबंध असतात याची कल्पना त्या लेखक व दिग्दर्शकाच्या बायकोला असते. एके दिवशी हा लेखक-दिग्दर्शक काही कामानिमित्त परदेशी जातो. विमानतळावर त्याला सोडून या दोघी एकत्र निघतात. लेखकाची पत्नी त्या अभिनेत्रीला घरी चल म्हणून सांगते. घरी गेल्यावर आपला पती आणि तुझे जे काही प्रेम संबंध आहेत, त्याबाबत मला सगळे माहिती असल्याचे सांगते. त्यावर ती अभिनेत्री त्याचा कोणताही इन्कार न करता किंवा ते लपविण्याचा प्रयत्न न करता सर्व मान्य करते आणि यातून जे काही धक्के बसतात, त्या लेखकाच्या पत्नीची जी काही मानसिक अवस्था होते, ते यात पाहायला मिळेल.
‘ग्रेसफुल’च्या निमित्ताने मराठी रंगभूमीवर एक वेगळ्या ढंगाचे आणि धाटणीचे नाटक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नाटकातील ‘त्या’ दोघींच्या गप्पांमधून हे नाटक उलगडत जाते. आशा शेलार ही एक ताकदीची अभिनेत्री आहे. यापूर्वी तिने ‘कबड्डी कबड्डी’ या व्यावसायिक नाटकात काम केले होते. आशा ‘बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरी करते. एकांकिका स्पर्धेत बँकेकडून सादर झालेल्या नाटकातून तिने वेळोवेळी भाग घेतला असून अभिनयासाठी पारितोषिकेही मिळविली आहेत. आता ‘होणार सून मी’ मालिकेतील तिचे काम पाहतो आहेच. ‘ग्रेसफुल’मधील ‘त्या’ व्यक्तिरेखेला ती योग्य न्याय देईल याची खात्री असल्यानेच तिची निवड केल्याचेही ताम्हाणे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा