दाक्षिणात्य अभिनेता कार्तीच्या (Actor Karthi) चित्रपटाच्या सेटवरून एक वाईट बातमी समोर आली आहे. कार्ती आणि दिग्दर्शक पीएस मिथ्रन यांच्या सेटवर मंगळवारी (१६ जुलै रोजी) एलुमलाई नावाच्या ५४ वर्षीय स्टंटमॅनचा मृत्यू झाला. ‘सरदार २’ च्या सेटवर चित्रपटासाठी ॲक्शन सिक्वेन्स शूट करताना ही दुर्दैवी घटना घडली.
मृत एलुमलाई यांनी रजनीकांत, कमल हासन, विजय, अजित कुमार यांच्या अनेक सिनेमांमध्ये स्टंटमॅन म्हणून काम केलं होतं. ‘सरदार २’ चे शूटिंग १५ जुलै रोजी चेन्नईच्या सालिग्रामम येथील एलव्ही प्रसाद स्टुडिओमध्ये सुरू झाले. शूटिंगदरम्यान एलुमलाई २० फूट उंचावरून खाली पडले. ‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, एलुमलाई खाली पडल्यानंतर गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे रात्री ११.३० वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर ‘सरदार २’चे शूटिंग थांबवण्यात आले आहे. या अपघाताची माहिती विरुगंबक्कम पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली असून सध्या तपास सुरू आहे.
प्रिन्स पिक्चर्स या प्रॉडक्शन हाऊसने एलुमलाई यांच्या निधनाबद्दल एक निवेदन शेअर केले आहे. “आमच्या सरदार २ चित्रपटाच्या सेटवर स्टंट रिग मॅन म्हणून काम करणारे स्टंट युनियनचे सदस्य एलुमलाई यांच्या निधनाची बातमी सांगताना आम्हाला दुःख होतं आहे. १६ जुलैला मंगळवारी संध्याकाळी स्टंट शूट झाल्यानंतर आम्ही पॅकअप करत होतो, पण याच दरम्यान एलुमलाई चुकून २० फूट उंचीच्या रोस्ट्रमवरून खाली पडले आणि त्यांना दुखापत झाली. त्यांना लगेच जवळच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तिथे डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले. पण रात्री साडेअकरा वाजता त्यांचे निधन झाले,” असं या निवेदनात लिहिलं आहे.
निर्मात्यांनी शेअर केलं निवेदन
या घटनेमुळे एलुमलाई यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ‘सरदार २’ चित्रपटाच्या सेटवर शोककळा पसरली आहे. चित्रपटाचे शूटिंग सध्या थांबवण्यात आले असून सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
‘सरदार २’ चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास या चित्रपटात कार्तीशिवाय इतर कोणते कलाकार असतील त्याबाबत निर्मात्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. या चित्रपटाचा पहिला भाग २०२२ मध्ये रिलीज झाला होता. हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट होता. ज्यामध्ये कार्ती दुहेरी भूमिकेत होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.