अगदी दशकभरापर्यंत फॅशनशून्य असलेल्या मराठी चित्रपटसृष्टीने अल्पावधीत आपले रंगरुपडे बदलून टाकले, त्याबरोबर येथल्या कलाकारांनीही आपल्या जुन्या ‘अवतारा’ची कात टाकून ‘फोटू’सुलभ बनण्यावर भर दिला आहे. चकचकीत वृत्तपत्रांच्या पृष्ठांवर लुकलुकणाऱ्या बॉलीवूडी कलाकारांप्रमाणेच मराठी तारकामंडळ समारंभ आणि पाटर्य़ा गाजवू लागले आहे. त्यामुळे अनुकरणप्रेमी तरुणाईसमोर फॅशन आदर्शाचा नवा मराठी पाठ यानिमित्ताने खुला झाला आहे.
‘चित्रपटामध्येच नाही, तर नेहमी वावरताना सुद्धा मी काय घालतोय किंवा माझा लूक काय आहे हा विचार घराबाहेर पडताना मी नक्कीच करतो. कारण आज आम्ही सतत प्रसिद्धीझोतात असतो. त्यामुळे लोकांचे प्रत्येकक्षणी आमच्या कपडय़ांवर, लूक्सवर लक्ष असते’, असे मराठीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी सांगतो. आज स्वप्नीलकडे चित्रपटाखेरीज त्याचे दिसणे खुलविणारी  ४-५ स्टायलिस्टची फळी आहे. जी प्रत्येक समारंभ किंवा पार्टीनुसार त्याचा लूक तयार करते.
वैयक्तिक ‘स्टायलिस्ट’ ठेवणारा स्वप्नील हा एकटा अभिनेता नाही. मुक्ता बर्वेसुद्धा कोणत्याही कार्यक्रमाला जाताना कार्यक्रमाच्या वातावरणाचा अंदाज घेऊन स्टायलिस्टकडून कपडे डिझाईन करून घेते. सतत बदलणाऱ्या फॅशन ट्रेंड्सवर लक्ष ठेवणे, हा आपला आवडता छंद असल्याचे, आदिनाथ कोठारे सांगतो. त्यामुळे कोणत्याही समारंभासाठी तयार होताना स्टायलिस्टवर अवलंबून राहण्याऐवजी तो स्वत:चा लूक स्वत:च डिझाईन करतो. त्याची पत्नी उर्मिला कानेटकर-कोठारे मात्र कपडय़ांच्या बाबतीत डिझायनर्सचे मत विचारात घेते, असे त्याने  सांगितले. ‘उर्मिलाला फॅशनची छान जाण आहे. त्यामुळे तिच्या कपडय़ांच्या बाबतीत ती नेहमी डिझायनर्स आणि स्टायलिस्टच्या संपर्कात असते. कित्येकदा स्वत:साठी खास डिझायनर ड्रेस शिवूनसुद्धा घेते. फॅशनच्या बाबतीत तो स्वत: डिझायनर मनीष मल्होत्राला तर उर्मिला डिझायनर मसाबा गुप्ताला फॉलो करत असल्याचे तो सांगतो. मराठीतील आघाडीची नायिका सई ताम्हणकर स्टाईलच्या बाबतीत बॉलिवूड डिझायनर स्वप्नील िशदेची लाडकी आहे. मध्यंतरी त्याने खास तिला डोळ्यासमोर ठेऊन एक कलेक्शन बनवले होते. ‘सईला फॅशन आणि तिच्यावर काय सूट होतं याबद्दल उत्तम जाण आहे. त्यामुळे तिच्यासाठी कपडे डिझाईन करायला मजा येते’, असे तो सांगतो. चित्रपटातील लूक्सवर स्टायलिस्टचे लक्ष असतेच. पण काळाची पावले लक्षात घेऊन एरवी वावरताना सुद्धा आपण कसे दिसतोय याकडे लक्ष देण्यास हे तारकामंडळ सुरवात करू लागलंय हे नक्की.  

Story img Loader