महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील प्रत्येक पान मराठयांच्या अतुलनीय शौर्याने भरलेले आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम या इतिहासातील एक महत्त्वाची सुवर्णगाथा आहे. ही सुवर्णगाथा २५ ऑगस्टला दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटातून प्रेकक्षकांसमोर उलगडणार आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टका’तील हा पाचवा चित्रपट आहे.

दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ चित्रपट श्रुंखलेतील ‘र्फजद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनिखड’, ‘शेर शिवराज’ हे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहे. आता ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. राज्यातील अनेक चित्रपटगृहांसह, देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये तसेच ६ विविध देशांमध्ये ‘सुभेदार’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘सुभेदार’ चित्रपटामध्ये, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, दिग्पाल लांजेकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अजिंक्य ननावरे, रिषी सक्सेना, नूपुर दैठणकर, अर्णव पेंढारकर आदी मराठीतील दिग्गज कलाकार दिसणार आहेत.

सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमासोबतच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचे पदर, कुटुंबाने दिलेली मोलाची साथ याचे दर्शन ‘सुभेदार’ चित्रपटात होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील ‘मावळं जागं झालं रं’, ‘आले मराठे’, ‘हळद लागली रायबाला’ या तिन्ही गाण्यांना सध्या प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.