आपल्या फिल्मी करिअरमध्ये हे दोन्ही अभिनेते आघाडीवर आहेत. गेल्या काही वर्षात या दोघांनी मराठी चित्रपटसृष्टीला एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले आहेत. अभिनयाव्यतिरिक्तही त्यांनी जे काही काम केले त्यात त्यांना यश मिळालेयं. आम्ही बोलतोय मराठीतील दोन आघाडीचे कलाकार स्वप्निल जोशी आणि सुबोध भावे यांच्याविषयी.
‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य एक युगपुरुष’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारखे हिट चित्रपट सुबोधने चित्रपटसृष्टीला दिले. तर दुसरीकडे स्वप्निलनेही ‘दुनियादारी’, ‘मितवा’, ‘तु ही रे’, ‘मुंबई पुणे मुंबई २’ या चित्रपटांद्वारे त्याच्या कारकिर्दीचा आलेख उंचावला. मात्र, अभिनयापुरते मर्यादित न राहता सुबोधने दिग्दर्शनाकडे आपले पाऊल वळविले. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याने केले होते. तर, स्वप्निलनेही स्वतःचा फॅशन ब्रॅण्ड सुरु केला आहे.
विचार करा जर विविध कौशल्य असलेल्या या दोन व्यक्ती जर एकत्र आल्या तर काय होईल? या दोघांच्याही चाहत्यांचे हे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. आगामी फुगे या चित्रपटाद्वारे आपल्याला ही जोडी एकत्र पाहावयास मिळणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच या दोघांनी मिळून चित्रपटाची कथादेखील लिहिली आहे. त्यामुळे स्वप्निल आणि सुबोधला आता अभिनेता म्हणायचे की लेखक असा प्रश्न नक्कीच सर्वांना पडेल. असो, पण चित्रपटाचे नाव बघता त्याच्याबद्दलची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे. ‘फुगे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना जोशी करणार असून, निर्माते गिरीश मोहिते आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा