यंदा दिवाळीत अभिनेता सुबोध भावेचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ८ नोव्हेंबरला हा बायोपिक प्रदर्शित होत आहे. तर दुसरीकडे याच दिवशी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खानचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तर तुम्ही कोणता चित्रपट बघणार असा प्रश्न सुबोधने ट्विटरवर विचारला आहे.

ट्विटर पोलद्वारे सुबोध भावेनं हा प्रश्न विचारला आहे आणि विशेष म्हणजे नेटकऱ्यांची पसंती ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’लाच असल्याचं दिसून येत आहे. या पोलमध्ये ७८ टक्के लोकांनी ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला मत दिलं तर २२ टक्के लोकांनी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा पर्याय निवडला. आता बॉक्स ऑफीसवर सुबोध भावे आणि आमिर खान यांच्यात टक्कर होणार आहे. त्यामुळे सुबोधच्या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Video : ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’वरचा हा एकदम कडक व्हिडिओ

‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातून मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर रुपेरी पडद्यावर आपल्या भेटीला येणार आहेत. सुबोध भावे, सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. डॉ. श्रीराम लागू, मास्टर दत्ताराम, प्राध्यापक वसंत कानेटकर, भालजी पेंढारकर, सुलोचना दीदी, प्रभाकर पणशीकर अशा व्यक्तिरेखा चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. तर आमिरचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा बिग बजेट चित्रपट आहे. यामध्ये आमिरसोबत अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख आणि कतरिना कैफ यांच्या भूमिका आहेत.