गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अभिनेता सुबोध भावेने नाट्यरसिकांना खुशखबर दिली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि त्यात प्रामाणिक माणसांची व शिक्षणाची होणाची गळचेपी हा ज्वलंत विषय मांडणारे प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘अश्रुंती झाली फुले’ हे गाजलेले नाटक सुबोध पुन्हा एकदा रंगमंचावर आणत आहे. फेसबुक पोस्टद्वारे सुबोधने ही घोषणा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ज्यांनी हे नाटक घडवलं त्या सर्वांना अभिवादन करून रसिकांच्या हृदयातल्या या नाटकाला पुन्हा रंगमंचावर घेऊन येत आहोत..लवकरच,’ असं सुबोधने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. “आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतंय, इंटरव्ह्यू एकदम टॉप, एकदम….” अशारितीने या व्हिडिओची सुरुवात होते. या नाटकाचे ५१ प्रयोग सादर होणार आहेत.

प्रतिमा कुलकर्णी नाटकाचे दिग्दर्शन करणार असून नाटकात शैलेश दातार, सीमा देशमुख, उमेश जगताप यांच्या भूमिका असतील. पोस्टमध्ये या कलाकारांच्या नावासह आणि…. असंही नमूद करण्यात आलं असून सुबोधही भूमिका साकारणार आहे असं समजतंय. तसं झाल्यास सुबोध यामध्ये लाल्याची भूमिका साकारणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

‘या नाटकाचे मोजके प्रयोग महाराष्ट्रातल्या गावोगावी करण्याची इच्छा आहे. त्यामुळे पाच-सहा वर्षांनंतर रंगमंचावर काम करण्याचा आनंद मिळणार आहे. पाच-सहा वर्षे नाटकापासून खूप दूर होतो. कारण वेळच नव्हता त्याची तालीम करायला, प्रयोग करायला. आता या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रंगमंचावर पाऊल ठेवण्याचा विचार आहे. पन्नासच प्रयोग करणार आहे, खूप करणार नाही. एप्रिलमध्ये साधारणपणे नाटक येईल,’ अशी माहिती सुबोधने दिली होती.

‘अश्रूंची झाली फुले’ हे नाटक सर्वप्रथम ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांनी त्यांच्या नाट्यसंपदा संस्थेतर्फे १९६६ मध्ये रंगमंचावर आणले होते. स्वत: पणशीकरांनी २००२ पर्यंत या सदाबहार नाटकाचे ११११ प्रयोग सादर करून ते अजरामर केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subodh bhave bringing back marathi play ashroonchi zali phule