‘झी स्टुडिओज’च्या ‘हर हर महादेव’ या भव्य-दिव्य चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा कोण साकारणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सूकता होती. नुकतंच या चित्रपटाचं डिजिटल पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून मराठीतील हरहुन्नरी आणि बहुआयामी अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे. छत्रपती शिवरायांच्या कार्याची ख्याती आणि कीर्ती ही केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर पसरलेली आहे. देशभरातील लोकांसाठी आजही शिवाजी महाराज हे प्रेरणास्रोत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपतींचं कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने हा भव्य-दिव्य चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड अशा पाच भाषेतून प्रदर्शित करण्याचा निर्णय झी स्टुडिओजने घेतला आहे. येत्या दिवाळीत पाच भारतीय भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हर हर महादेव’ चित्रपटात अनेक नामवंत कलाकारांची मांदियाळी असणार आहे. त्यात आता सुबोध भावे शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार हे जाहीर झाल्यानंतर इतर व्यक्तिरेखाही कोण कोण साकारणार?, याबद्दल लोकांच्या मनात कुतूहल जागले आहे. ‘‘छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की मनात आपसूकच आदराची आणि अभिमानाची भावना निर्माण होते. केवळ मराठी माणूसच नव्हे तर इतर भाषिकांसाठीही अखंड प्रेरणेचे ऊर्जास्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा या रयतेच्या राजाची भूमिका साकारायला मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे असे मी मानतो. एक अभिनेता म्हणून आपल्याला कायम काही तरी आव्हानत्मक भूमिका करायला मिळाव्यात अशी इच्छा असते. माझ्यासाठी ही भूमिका केवळ आव्हानात्मकच नाही तर एक फार मोठी जबाबदारी आहे. हे शिवधनुष्य पेलण्याचा मी इमानेइतबारे प्रयत्न केलेला आहे. दिवसाअंती आनंद आणि समाधान देणा-या काही भूमिका असतात. या भूमिकेने मला तो आनंद ते समाधान आणि जगण्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला आहे,’’ अशी भावना सुबोध भावे यांनी व्यक्त केली. अभिजित देशपांडेचं कौशल्यपूर्ण दिग्दर्शन, अतिशय बंदिस्त पटकथा आणि झी स्टुडिओजमुळे लाभलेलं दर्जेदार निर्मितीमूल्य यांनी सज्ज झालेला ‘हर हर महादेव’ हा चित्रपट मराठीसह इतर भाषांमधूनही प्रदर्शित होणार असल्याने आनंद द्विगुणित झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

तर या चित्रपटाच्या भव्यतेचे वर्णन करताना झी स्टुडिओजचे व्यवसायप्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणाले की, ‘‘यंदाची दिवाळी ही आपल्या प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी ठरावी अशी मनात इच्छा होती. ‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या निमित्ताने इच्छापूर्तीची संधी मिळाली आहे. आभाळाएवढं कर्तृत्व असलेल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास, त्यांची गोष्ट सादर होताना ती त्याच भव्यतेच्या तोलामोलाची असावी असा विचार कायम मनात होता. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचं कार्य अशाच भव्य-दिव्य स्वरूपात आपण आणणार आहोत याचा विशेष आनंद आहे. हॉलीवुड चित्रपटांवर काम केलेले नामांकित असे चारशेहून अधिक व्हीएफएक्स तंत्रज्ञ या चित्रपटावर काम करत आहेत हे विशेष.’’ सुनिल फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित शिरीष देशपांडे यांनी केले आहे.