अभिनेता सुबोध भावेचा बहुचर्चित ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षक- समीक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या पडद्यावर चित्रपट, छोट्या पडद्यावरील मालिका असं सगळीकडून सुबोधला यश मिळत आहे. पण हे यश मिळण्यापूर्वी सुबोधने अपयशसुद्धा पचवलं आहे. फार क्वचित लोकांना हे माहीत असेल की सुबोध बारावीत नापास झाला होता. पण तेव्हा जर मी नापास झालो नसतो तर आज मी इथं नसतो असं तो अभिमानानं सांगतो.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुबोध म्हणाला, ‘मी जर बारावीत नापास झालो नसतो तर कदाचित बीएससी, बीई करत राहिलो असतो. कुठेतरी नोकरी करत राहिलो असतो. माझं नापास होणं माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे आता मला नापास होण्याची भीती नाहीये. आता प्रयोग करून बघण्यातली भीती नाहीये. फार फार तर काय होईल, नापासच होईन ना. ते आधीच झालोय मी.’
वाचा : ‘काशिनाथ घाणेकरांना जीवंतपणे समोर उभं केलंस’, सुबोधवर कौतुकाचा वर्षाव
आयुष्यात आता नापास होण्याची भीती राहिली नाही असं सुबोध म्हणतो. करिअरमध्ये साकारलेल्या बायोपिक्सच्या व्यक्तिरेखांमधून खूप काही शिकायला मिळालं असंही तो सांगतो. ‘माझ्यातली नापास होण्याची भीती तिथेच मेली आहे. ती मेली, मी नापास झालो म्हणून मला काठावर पास करणारी ही मंडळी माझ्या आयुष्यात आली,’ असं त्याने सांगितलं.