मराठी सिनेसृष्टीत अनेक ऐतिहासिक चित्रपट बनत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिजीत देशपांडे दिग्दर्शित आणि झी स्टुडिओची निर्मिती असलेला ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात मराठीतील हरहुन्नरी आणि बहुआयामी अभिनेता अशी ओळख असलेला सुबोध भावे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे.
छत्रपती शिवरायांच्या कार्याची ख्याती आणि कीर्ती ही केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर पसरलेली आहे. देशभरातील लोकांसाठी आजही छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्रोत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपतींचं कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने हा भव्य दिव्य चित्रपट साकारला जात आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर लाँच करण्यात आले होते. त्यानंतर आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही ठरली आहे. अभिनेत्री सायली संजीवने याबाबत इन्स्टाग्राम पोस्ट करून माहिती दिली आहे.
VIDEO: …अन् भर कार्यक्रमात सोनाक्षीने परितोषला थोबाडीत मारली; रितेशही पाहतच राहिला
“आता अभिमानाने मोठ्या पडदयावर ‘हर हर महादेव’ ही शिवगर्जना घुमणार, पहिल्यांदाच मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून, येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरपासून संपूर्ण देशात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार,” असं सायलीने पोस्टमध्ये म्हटलंय. यावेळी तिने चित्रपटाचे विविध भाषांमधील पोस्टरदेखील शेअर केले आहेत.
हर हर महादेव चित्रपटात सुबोध भावे, सायली संजीवसह अनेक नामवंत आणि दिग्गज कलाकारांची मांदियाळी असणार आहे. सुनिल फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग आणि झी स्टुडिओजने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित शिरीष देशपांडे यांनी केले आहे.