प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेन यांना श्वसनमार्गातील संसर्गामुळे त्रास सुरू झाल्यानंतर २३ डिसेंबरला सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सेन यांच्या प्रकृतीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
बेली व्हय़ू रुग्णालयाच्या निवेदनानुसार सुचित्रा सेन यांचा श्वासोच्छ्वास आता सुधारला असून, सेन यांचे हृदय व्यवस्थित काम करत आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या फिजिओथेरपीमुळे ही सुधारणा धाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना पूर्णपणे वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवले आहे. डॉक्टरांच्या मते त्यांच्या श्वसनमार्गातील जंतुसंसर्ग आटोक्यात असून, त्यांना प्रतिजैविक औषधे देण्यात आली आहेत. डॉक्टरांनी त्यांना अगोदर हृदयविकार विभागात दाखल केले होते. हृदयविकारतज्ज्ञ डॉ. सुब्रता मोईत्रा यांच्यासह पाच डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
सुचित्रा सेन यांनी ‘शेष कोथाय’ या चित्रपटातून १९५२ मध्ये पदार्पण केले. नंतर बिमल रॉय यांच्या १९५५मधील ‘देवदास’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.  ‘आँधी’ या राजकीय नाटय़ावर आधारित चित्रपटात त्यांनी संजीवकुमार यांच्यासमेवत भूमिका केली होती.

Story img Loader