अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि श्रीदेवी यांची लेक खुशी कपूर लवकरच ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन झोया अख्तरनं केलं आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या सेटवरून अगस्त्य आणि सुहाना याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर बरीच उत्सुकता पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यामधील सुहाना, अगस्त्य आणि खुशी यांचा फर्स्ट लुकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
सुहाना खाननं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत तिच्या आगामी चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये चित्रपटाती सर्व स्टार पिकनिकला गेलेले दिसत आहेत. सर्व एन्जॉय करताना, खेळताना, सायकल चालवताना, फोटोज क्लिक करताना आणि एकमेकांसोबत मस्ती करताना दिसताहेत. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा आहे. विशेषतः या चित्रपटातील सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर यांचे लुक चर्चेत आहेत. हे सर्वजण रेट्रो लुकमध्ये दिसत आहेत.
आणखी वाचा- “मी त्याच्यावर नेहमीच प्रेम केलं…” जेव्हा सोहेल खानबद्दल बोलली होती सीमा सचदेवा
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करताना आशीर्वाद दिले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘आणखी एक सकाळ आणि माझा नातू. तुला माझा आशीर्वाद अगस्त्य. आठवणींमध्ये हरवून जाण्यासाठी तयार व्हा. झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.’
आणखी वाचा- बॉलिवूड कलाकारांवर संतापले ‘आश्रम 3’ चे दिग्दर्शक, म्हणाले “मला त्यांची चीड येते…”
प्रसिद्ध दिग्दर्शक झोया अख्तरच्या या चित्रपटात सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा या स्टार किड्ससोबतच अभिनेत्री डॉट, मिहिर आहूजा, वेदांग रैना, युवराज मेंडा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कॉमिक बुकमधील पात्र आर्ची एंड्रयूज आणि त्याचे मित्र यावर आधारित आहे. या चित्रपटात झोया अख्तरनं कॉमिक बुकमधील पात्रांना भारतीय लुक देण्याचा प्रयत्न केला आहे.