रवींद्र पाथरे

सत्तरच्या दशकात मराठी रंगभूमीवर कौटुंबिक जिव्हाळ्याच्या नाटकांची सद्दी होती. बाळ कोल्हटकर, कालेलकर यांची अशी नाटकं हाऊसफुल्ल गर्र्दीत प्रेक्षकांना रिझवीत असत. अर्थात त्याकाळचं वातावरणही तसं होतं. माणसांचं जगणं बाळबोध होतं. माणसं एकमेकांना धरून असत. कौटुंबिक नाती, सण-समारंभ, आलं-गेलं, पाहुणेरावळे यांनी माणसं जोडलेली असत. जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, परस्परांना मदत करणं हे सगळं शाबूत होतं. पुढे काळ बदलत गेला. माणसंही बदलत गेली. एकत्र कुटुंबं लयाला गेली. विभक्त कुटुंबांची फ्लॅट संस्कृती उदयाला आली. आपण आणि आपलं कुटुंब इतक्यापुरतंच जग सीमित झालं. ९१ च्या जागतिकीकरणानंतर तर कुटुंबातही व्यक्तिवादानं डोकं वर काढलं. आणि त्यातून ‘मी आणि माझं, मला’ यापुरतंच माणसांचं जग निर्माण झालं. तसा कौटुंबिक जिव्हाळ्याच्या नाटकांनी मराठी रंगभूमीवरून काढता पाय घेतला. हल्ली तर ही नाटकं बादच झालीयत.

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
bhagare guruji son Akhilesh bhagare will get marriage anagha atul share video
भगरे गुरुजींचा मुलगा लवकरच अडकणार लग्नबंधनात; लेकीने लग्नघराचा व्हिडीओ केला शेअर
savita malpekar bald look in kaksparsh praises Mahesh Manjrekar
“महेशने विचारलं टक्कल करशील का? मी लगेच…”, सविता मालपेकरांनी सांगितला ‘काकस्पर्श’चा किस्सा, म्हणाल्या…
Pranav Mohanlal is working on a farm in Spain for food
वडील सुपरस्टार, स्वतःही केले हिट चित्रपट; आता जग फिरतोय ‘हा’ अभिनेता, लोकांच्या शेतातही करतो काम
7 year old boy drew a picture of Dhananjay Powar on his hand
७ वर्षांच्या मुलाने धनंजय पोवारचं हातावर काढलं चित्र, आई डीपीला फोटो पाठवून म्हणाली, “दादा काय जादू केली…”
isha deol reveal dharmendra did not like short dress for daughters
“वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालायचो”, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेला खुलासा; म्हणालेली, “त्यांना मी १८ व्या वर्षी…”

या पार्श्वभूमीवर राजन मोहाडीकर लिखित आणि पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित ‘सुमी आणि आम्ही’ हे कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक यावं, हा एक दुर्मीळ योगच. आनंदराव आणि मेधा धडफळे या वृद्ध दाम्पत्याच्या आयुष्यात घडणाऱ्या एका वादळी संघर्षांचं चित्र त्यात रंगवलेलं आहे. चाळिशीत लग्न करणाऱ्या आनंदरावांनी त्यांच्या हयात नसलेल्या बहिणीची एकुलती मुलगी दत्तक घेतलीय. सुमी. तिचं संगोपन-संवर्धन यांतच हे जोडपं रमून गेलंय. यथावकाश ती मोठी होते. कॉम्प्युटर इंजिनीअर होऊन बंगलोरला एका कॉर्पोरेट कंपनीत नोकरीस लागते. तोवर आनंदराव निवृत्त झालेले असतात. सुमीला अमेरिकत जाऊन एमएस करायचंय. ती त्यादृष्टीनं प्रयत्न करते. तिनं त्यासाठी पाच लाख रुपयेही जमवलेत. पण या शिक्षणासाठी एकूण चाळीस लाख रुपयांचा खर्च येणार असल्याने ती आनंदरावांकडे पैसे मागते. तोवर कसाबसा तिचा शिक्षणाचा आणि संसाराचा खर्च भागवणारे आनंदराव आता निवृत्तीनंतर पार कफल्लक झालेले असतात. ते वस्तुस्थिती सुमीला सांगतात. पण ती आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा दृढनिश्चय करून बसलेली असते. वडलांच्या या परिस्थितीची तिला जाणीव नसते. ती हट्टच धरते- यू. एस.ला जाण्याचा. मेधा तिच्या वडलांची जमीन विकून तिच्यासाठी पैसे उभे करण्याचा प्रस्ताव आनंदरावांसमोर ठेवते. नाइलाजानं ते त्याला तयार होतात.

सुमीचा नोकरीतला एक सहकारी विल्सन तिथल्या युनिव्हर्सिटीत फॅकल्टी म्हणून जॉइन होणार असतो. ती त्याच्याबरोबर त्याच्या जागेत राहणार असते. आनंदराव आणि मेधाला हे काही मान्य नसतं. पण.. सुमीच्या हट्टापुढे त्यांचं काही चालत नाही. एवढय़ात सुमीचं पत्र येतं.. ती विल्सनबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार असते. आनंदरावांसाठी आणि मेधासाठी हा मोठाच धक्का असतो. आपले संस्कार नेमके कुठे कमी पडले असा त्यांना प्रश्न पडतो.

एव्हाना त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारींनीही उग्र रूप धारण करायला सुरुवात केलेली असते. त्याकडे दुर्लक्ष करून ती दोघं सुमीकरता पुन्हा एकदा नोकरीउद्योग बघायला लागतात. ज्या मुलीसाठी आपण हे सारं करतो आहोत ती आपल्याला पुढे आधार देईल याची काहीच शाश्वती आता उरलेली नसते. फक्त आपलं कर्म करत राहायचं.

अशा बिकट परिस्थितीनं ग्रासलेल्या आनंदरावांपुढे कोणता पर्याय उरतो? जे जे होईल ते ते पाहावे.. एवढाच. ते तेच करतात.

लेखक राजन मोहाडीकर यांनी हे एका कुटुंबात घडणारं समस्यानाटय़ उत्कटपणे चितारलं आहे. सगळी माणसं अस्सल उतरली आहेत. आनंदराव, मेधा, त्यांचे शेजारी गोवंडे, त्यांचे डॉक्टर.. आणि सुमीही! त्यांचे परस्परसंबंध इतक्या बारकाईनं त्यांनी रंगवले आहेत की प्रेक्षकही त्यांत नकळत गुंतून जातात. खरं तर ही आजच्या काळाचीही आणि कुणा निम्नवर्गीय व्यक्तीच्या आयुष्यात घडणारी समस्या होऊ शकते. सगळी माणसं आपापल्या परीनं योग्यच वागत असतात, पण त्यांच्यातला मूल्यात्मक संघर्ष जगण्याचे संदर्भ ठरवत असतो. एका वयोवृद्ध जोडप्याच्या वाटय़ाला आलेली परिस्थितीवश अगतिकता यात इतकी प्रभावीरीत्या व्यक्त होते की ज्याचं नाव ते. नाटकाचा शेवट सकारात्मक असला तरी तो तसा प्रत्येकाच्या बाबतीत होईलच असं नाही. याचं कारण आज घरीदारी बळावलेला व्यक्तिवाद. लेखकाने यातले घटना-प्रसंग यथार्थवादी शैलीत चितारले आहेत. त्यामुळे ते आजच्या काळातल्या माणसांचीही सहज पकड घेतात.

दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी हे कौटुंबिक नाटय़ तेवढय़ाच तरलतेनं प्रयोगान्वित केलं आहे. नाटकाची रचना सत्तरच्या दशकातली असली आणि त्यांनी ती तशीच ‘ट्रीट’ केली असली तरी एकूणच मानवी मूल्यं हा नाटकाचा गाभा असल्याने त्यातला मथितार्थ सर्वांपर्यंत नेमकेपणानं पोहोचतो. आपण आता कुठवर वाटचाल केलेली आहे हे आजच्या प्रेक्षकांनाही यातून कळतं. सगळी पात्रं वास्तवदर्शी उभी करण्यात दिग्दर्शकानं कुठंही कसूर सोडलेली नाही. मग ते मेधाचे वडील अण्णा असोत, बापट गुरुजी असोत, शेजारी गोवंडे असोत की डॉक्टर! खरं तर अण्णा, डॉक्टर किंवा गोवंडेंसारखी पात्रं आता कालबाह्य़ झालेली आहेत. नाटकात पण आणि प्रत्यक्षातही. तरीही संहितेबरहुकूम ती यात येतात. आपापली ‘भूमिका’ निभावतात. अर्थात ती पूरक म्हणूनच येतात. पण मराठी रंगभूमी आता कितीतरी पुढं गेली आहे. त्यात अशी पात्रं विजोड ठरतात. तर ते असो. बाकी परिस्थितीनं पिचलेले आनंदराव, त्यांची बाळबोध संस्कारांतली पत्नी मेधा आणि कॉर्पोरेट कल्चर अंगीकारलेली सुमी ही पात्रं यथातथ्य वाटतात. त्यांच्यातला संघर्ष कुठल्याही काळात अपील होणारा आहे. याचं कारण आपली भारतीय मानसिकता आणि संस्कार! दिग्दर्शकानं यातले भावनात्मक प्रसंग अति न ताणता त्यातलं गांभीर्य नीटसपणे अधोरेखित केलेलं आहे.

नाटकाचं संगीत, नेपथ्य आणि वेशभूषा या बाजूही नाटकाची मागणी पुरवीत पुरुषोत्तम बेर्डे यांनीच उत्तमरीत्या सांभाळल्या आहेत. शीतल तळपदे यांनी यातले भावनात्मक प्रसंग आपल्या छायाप्रकाशाच्या खेळानं ठळक, गहिरे केले आहेत. उदयराज तांगडी यांनी रंगभूषेची जबाबदारी पेलली आहे. गीतकार सुवर्णा गोडसे यांच्या गीतांना गायक ऋषिकेश कामेरकर, मोहन जोशी आणि श्रद्धा पोखरणकर यांनी श्रवणीय आवाज दिला आहे.

आनंद धडफळेंच्या भूमिकेत मोहन जोशी यांनी आपल्या सहजत्स्फूर्त अभिनयानं चार चांद लावले आहेत. चारेक वर्षांच्या खंडानंतर त्यांचं रंगभूमीवर झालेलं हे पुनरागमन निश्चितच सुखद आहे. वयानुरूप त्यांच्या वावरण्याला मर्यादा आल्या असल्या तरी आनंदरावांच्या भूमिकेत ते फिट्ट बसले आहेत. त्यांचं बोलतानाचं अडखळणं आनंदरावांच्या मन:स्थितीत भर टाकणारं आहे. सविता मालपेकर यांनी त्यांना सुयोग्य साथ दिली आहे. त्यांच्या लक्षवेधी भूमिकांमध्ये या भूमिकेचा समावेश करायला हरकत नाही. मेधाच्या निरनिराळ्या भावस्थिती त्यांनी अचूक टिपल्या आहेत. तिचं बाळबोध वागणं-बोलणं तत्कालीनतेशी मेळ खाणारं आहे. सुमीच्या भूमिकेला श्रद्धा पोखरणकर यांनी अत्यंत विश्वासार्हता प्राप्त करून दिली आहे. त्यांचं कॉर्पोरेट कल्चरमधलं वागणं-बोलणं, त्यातले गंड वगैरे त्यांनी नेमकेपणाने व्यक्त केले आहेत. राजेश चिटणीस यांचे गोवंडे जुन्या काळातील लोभस पात्रांची आठवण करून देतात. प्रदीप जोशी (बापट गुरुजी), उदय लागू (डॉ. पानसे) चंद्रशेखर भागवत (अण्णा) यांनीही आपापल्या पात्रांना न्याय दिला आहे. एकुणात, हे आजच्या काळातलं ‘कौटुंबिक जिव्हाळ्या’चं नाटक रसिकांना जखडून ठेवतं, हे खरंय.