मुंबई : मराठी मनोरंजन वाहिन्यांमध्ये १७ ऑक्टोबरपासून ‘सन मराठी’ ही नवी वाहिनी दाखल होत असून ‘सन टीव्ही नेटवर्क’ समूहाच्या या नव्या वाहिनीमुळे मराठी मनोरंजनविश्वाची बाजारपेठ विस्तारते आहे. ‘सन टीव्ही नेटवर्क’ समूहाच्या देशभरात ३३ वाहिन्या आहेत. २०१९ मध्ये ‘सन मराठी’ या नव्या वाहिनीची सुरुवात होणार होती, मात्र करोनामुळे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही वाहिनी दाखल होत आहे. नवीन वाहिनीच्या येण्याने प्रस्थापित वाहिन्यांमध्ये स्पर्धा वाढणार असली तरी त्यामुळे व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने वाटचाल होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

एका आर्थिक अहवालानुसार गेल्या वर्षी मराठी मनोरंजन वाहिन्यांना जाहिरातींतून मिळालेले उत्पन्न हे ९०० ते ११०० कोटींच्या आसपास होते. गेल्या वर्षी करोनामुळे सगळ्याच मनोरंजन वाहिन्यांना फटका बसला होता, तसा तो मराठी वाहिन्यांनाही बसला. दोन ते तीन महिने जाहिरातींचे उत्पन्न कमी झाले होते, मात्र जसे मालिकांचे प्रक्षेपण सुरळीत झाले तसा जाहिरातींचा ओघ वाढत गेला. मराठी मनोरंजन वाहिन्यांच्या प्रेक्षक पसंतीचे मूल्यांक १३०० (जीआरपी) एवढे आहे. ते आणखी वाढू शकते. वाहिन्यांची संख्या वाढेल, तशी प्रेक्षकसंख्या वाढेल, जाहिराती वाढतील, असे ‘कलर्स मराठी’ वाहिनीचे व्यवसाय प्रमुख जोशी यांनी स्पष्ट केले.

आशयनिर्मितीत बदल?

सध्या चार मोठय़ा समूहांच्या प्रस्थापित वाहिन्यांसह मराठी मनोरंजन वाहिन्यांची आर्थिक उलाढाल तब्बल ८०० ते ९०० कोटींच्या घरात पोहोचली आहे. नव्या वाहिनीमुळे ही बाजारपेठ आणखी वाढायला मदत होईल. वाहिन्यांमधील स्पर्धाही वाढेल, परिणामी दर्जेदार आशयनिर्मितीचा अनुभव प्रेक्षकांना घेता येईल, असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

वीस वर्षांतील वाढ..

२००३ मध्ये तीन मराठी वाहिन्या होत्या आणि जवळपास ७० कोटींची उलाढाल होती. २०१० मध्ये हीच उलाढाल ४०० ते ५०० कोटींच्या आसपास पोहोचली. गेल्या वीस वर्षांत मराठी मनोरंजन वाहिन्यांचे अर्थकारण जोमाने वाढले. त्यामुळे नवीन स्पर्धक आले तर अर्थकारणाबरोबरच आशयनिर्मितीच्या दृष्टीनेही वाहिन्या आणि निर्मात्यांना प्रयत्न करावे लागतील. याचा परिणाम म्हणून हे अर्थकारण अधिक गतिमान होईल, असे मत निर्माते नितीन वैद्य यांनी व्यक्त केले.

नवनवीन वाहिन्यांचे येणे हे वाढलेल्या प्रेक्षकसंख्येचे द्योतक आहे. नवीन मराठी मनोरंजन वाहिन्या बाजारपेठेत आल्या तर मराठी मनोरंजन विभागाचा विस्तार होईल आणि त्यामुळे जाहिरातींचा ओघही वाढेल. मराठी मनोरंजन वाहिन्यांचे अर्थकारण वाढण्यास अधिक मदत होईल.

अनिकेत जोशी, ‘कलर्स मराठीवाहिनीचे व्यवसायप्रमुख  

सहा नव्या मालिकांसह..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सन मराठी’ वाहिनी पाहण्यासाठी प्रेक्षकांना सध्या तरी कोणतेही शुल्क मोजावे लागणार नाही. या वाहिनीवर साडेसहा ते साडेनऊ या वेळेत सहा नवीन मालिका दाखवण्यात येणार आहेत. तीन तासांचा नवीन आशय सध्या वाहिनीकडे उपलब्ध आहे.  ‘नंदिनी’, ‘सुंदरी’, ‘जाऊ नको दूर..बाबा!’, ‘आभाळाची माया’, ‘कन्यादान’ आणि ‘संत गजानन शेगावीचे’ या नवीन मालिका प्रसारित होणार आहेत.