कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलंय. या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय. या मालिकेती सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. पण या मालिकेतील कलाकारांनी अभिनयासोबतच समाजाप्रती असलेल्या आपुलकीने सुद्धा प्रेक्षकांचं मन जिंकलंय. एकीकडे कोकणात पूराने थैमान घातलं. या पूरात अनेकांचे संसार उद्धस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेच्या कलाकार पुढे सरसावलेत.
या मालिकेतील अभिनेत्री गौरी किरण या मुळची कोकणातील आहे. त्यामुळे कोकणातील मुलगी छोट्या पडद्यावर झळकत असल्याने कोकणवासीयांचा या मालिकेसोबत खूपच आपुलकीचं नातं निर्माण झालंय. कोकणात मुसळधार पावसामुळे जी परीस्थिती उद्भवली आहे, अशा परिस्थितीत त्यांना आधार देण्यासाठी या मालिकेच्या कलाकार मंडळींनी येत नागरिकांना मदतीचे आवाहन केलंय. यासाठी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील सर्व कलाकारांनी एकत्र येत सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये त्यांनी कोकणवासियांसाठी जास्तित जास्त दिवस टिकतील असे अन्न पदार्थ, कुटुंबातील जीवनावश्यक वस्तू, महिला व पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची अंतर वस्त्रे, अंथरून-पांघरुण कोकणवासियांपर्यंत पोहोचवून त्यांना या संकटातून सावरण्यासाठी मदत करा, असं म्हटलंय.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेद्वारे ‘लतिका’ बनून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री अक्षया नायक. सध्या ती पूर परिस्थिती मदतीसंदर्भात योग्य ती माहिती पुरवण्यासाठी काम करतेय. ‘माणुसकीच्या नात्यानं प्रत्येकाला मदत करणं गरजेचं आहे. चाहत्यांचा एक मोठा वर्ग आपल्याला फॉलो करत असतो. त्यामुळे त्यांच्यापर्यंत गरजू लोकांची माहिती गेली आणि कोणाला मदत झाली तरी त्याचं समाधान आहे. या भावनेने सध्या मी माहिती पोहोचवतेय’, असं तिनं सांगितलं.
राजापूर, चिपळूण कोल्हापूरला या पूराचा सर्वाधिक तडाखा बसलाय. अजून बचावकार्य सुरु आहे. या परिस्थिती कोकणाची झालेली दयनीय अवस्था पहावेनाशी झालीय. सध्याच्या पूर संकटात आपल्या परीने शक्य तितकी कोकणवासीयांना मदत करा, तरंच कोकण पुन्हा नव्या उमेदीने उभं राहिल, या संकटातून स्वतःला सावरेल, या असं मालिकेतील अभिमन्यू म्हणजेच समीर परंजपे याने म्हटलंय.