बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार आणि अभिनेता आमिर खान हे दोघेही सध्या त्यांच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमारचा रक्षाबंधन तर आमिर खानचा लाल सिंग चड्ढा हे दोन्हीही चित्रपट आज (११ ऑगस्ट) चित्रपटगृहात प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन्हीही चित्रपटांची तगडी टक्कर पाहायला मिळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नेटकरी या चित्रपटांना विरोध करताना दिसत आहे. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ बॉयकॉट रक्षाबंधन असे ट्रेंड सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतंच अभिनेता सुनील शेट्टीने चित्रपटांना विरोध करण्याच्या आणि बहिष्कार टाकण्याच्या ट्रेंडवर खुलेपणाने भाष्य केले आहे.
अभिनेता सुनील शेट्टीने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत आवाहन केले आहे. यावेळी सुनील शेट्टी म्हणाला, “आमिर खान आणि अक्षय कुमार या दोघांनीही त्यांच्या या चित्रपटांसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. याचा आपण आदर केला पाहिजे. त्यामुळे आपण आपला चित्रपट उद्योग उद्धवस्त होईल, अशाप्रकारचे काहीही करु नये.”
“तुमची इच्छा नसेल तर चित्रपट बघू नका, बहिष्कार कशाला?” अक्षय कुमारचा सवाल
“आमिर खानची इच्छा असली तर तो एका वर्षात ५ चित्रपट करु शकतो. पण तो त्याच्या अभिनयाबद्दल इतका विचार जोडलेला आहे की तो ५ वर्षात केवळ एकच चित्रपट करतो. त्यामुळे त्याच्या भूमिकेचा आदर केला पाहिजे”, अशा शब्दात सुनील शेट्टीने आमिर खानचे कौतुक केले. तर अक्षय कुमारबद्दल बोलताना तो म्हणाला, “अक्षय कुमारनेही आपल्याला एकापेक्षा एक यशस्वी आणि मनोरंजक चित्रपट दिले आहेत. यामुळे तो जनतेचे प्रेम आणि सहकार्यासाठी पात्र आहेत. या दोन्हीही सुपरस्टारच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याबद्दल सुरु असलेला तो ट्रेंड दुर्देवी आहे.”
“चित्रपट उद्योगात एकापेक्षा एक उत्तम कलाकारांनी काम केले आहे. त्याला मोठा वारसा आहे, अशा उद्योगाला आपण उद्धवस्त करु नये. चुका या कोणत्याही व्यक्तीकडून होऊ शकतात. मग तो कोणीही असो. चित्रपट उद्योगाशी जोडलेली लोक माणसे नाहीत का? त्यामुळे त्यांनाही एक संधी दिली पाहिजे. तसेच चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची मोहीम पूर्णपणे चुकीची आहे. असे कृत्य करणाऱ्या लोकांना देव बुद्धी देवो आणि त्यांनी चित्रपटांवर बहिष्कार टाकू नये, अशीच प्रार्थना आपण करु शकतो. ‘लाल सिंग चड्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’ या दोन्ही चित्रपटांना प्रचंड यश मिळावे, अशी माझी इच्छा आहे”, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमिर खानला धक्का, ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शित होताच ऑनलाइन वेबसाइटवर झाला लीक
दरम्यान आनंद एल राय दिग्दर्शित रक्षाबंधन या चित्रपटात अक्षय कुमार, भूमी पेडणेकर, सादिया खतीब, सहजीन कौर, स्मृती श्रीकांत आणि दीपिका खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर अद्वैत चंदन दिग्दर्शित लाल सिंग चड्ढा या चित्रपटाद्वारे तब्बल चार वर्षांनंतर आमिर खान मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. हे दोन्ही चित्रपट आज ११ ऑगस्टला प्रदर्शित झाले आहेत.