क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. दोघेही जानेवारी महिन्यात लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. दोघांच्या लग्नाच्या चर्चांना सुनील शेट्टी यांनी दुजोरा दिला होता. पण त्यांच्या लग्नाची तारीख नेमकी काय आणि खरंच जानेवारीमध्ये त्यांच्या लेकीचं लग्न आहे की नाही, याबद्दल त्यांनी भाष्य केलं नव्हतं. अशातच आता माध्यमांमध्ये असलेल्या लग्नाच्या तारखांबद्दल सुनील शेट्टी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे. आता या वृत्तांचे अथियाचे वडील सुनील शेट्टी यांनी खंडन केले आहे. लग्नाच्या तारखेबद्दल ‘ई टाइम्स’शी बोलताना ते म्हणाले, “जेव्हा तुमच्या तारखा निश्चित होतील, तेव्हा मलाही सांगा, जेणेकरून मी लग्नाला उपस्थित राहू शकेन,” असं त्यांनी म्हटलंय. म्हणजेच केएल राहुल आणि अथियाचे लग्न इतक्यात होणार नाहीये.
केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मोठ्या दक्षिण भारतीय पद्धतीच्या लग्नाचं नियोजन करण्यात आलं आहे. यामध्ये प्री-वेडिंग फंक्शन्स असतील आणि त्यात हळदी, मेहंदी आणि संगीत समारंभ असतील. हे लग्न २१ ते २३ जानेवारी दरम्यान शेट्टी यांच्या खंडाळा येथील निवासस्थानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण आता सुनिल शेट्टी यांनी लग्नाच्या तारखेबद्दल वक्तव्य केल्याने याच तारखांवर लग्न होणार की नाही, याबद्दल स्पष्टता नाही.
लग्नाची जय्यत तयारी सुरू असून दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नसोहळ्याची उत्सुकता असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलने जानेवारी २०२३ मध्ये वैयक्तिक रजेसाठी अर्ज केला आहे आणि बीसीसीआयने त्याची रजा मंजूर केली आहे, असंही म्हटलं जातंय.