पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर बंदी घालण्यात आली; तर सुनील शेट्टीच्या ‘केसरी वीर’ चित्रपटाच्या निर्मात्यांनीही तो पाकिस्तानात प्रदर्शित करण्यास नकार दिला.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे बॉलीवूड सेलिब्रिटीही दुःखी आहेत. अलीकडेच सुनील शेट्टीने चाहत्यांना घाबरू नका, असा सल्ला दिला आहे. तसेच सुनील शेट्टीने लोकांना तो त्याची पुढील सुट्टी काश्मीरमध्ये साजरी करेल, असे देखील सांगितले आहे.
सुनील शेट्टीची पुढील सुट्टी काश्मीरमध्ये…
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२५ सोहळ्यामध्ये आपण पुढील सुट्टी काश्मीरमध्ये व्यतीत करणार असल्याचे सुनील शेट्टीने सांगितले. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील प्रत्येक नागरिक संतापला आहे आणि त्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला जात आहे. या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा बिघडले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला होता.
सुनील शेट्टी म्हणाला, “माझी पुढील सुट्टी काश्मीरमध्ये असेल, त्यांना दाखवून देऊ की, आपण घाबरत नाही… सुनील शेट्टीने पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर संताप व्यक्त केला आणि देशातील नागरिकांना आवाहन केले, “आपल्याला ठरवायचे आहे की आजपासून आपली पुढील सुट्टी फक्त काश्मीरमध्येच असेल; इतर कुठेही नाही. आपण त्यांना दाखवून द्यायचे आहे की, आपण घाबरत नाही”.
“जर मला शूटिंगसाठी काश्मीरला जावे लागले तर मी जाईन”
सुनील शेट्टी पुढे म्हणाला, “मी स्वतः फोन करून सांगितले आहे की, जर उद्या तुम्हाला वाटत असेल की, आपल्याला तिथे जावे लागेल, टुरिस्ट म्हणून किंवा कलाकार म्हणून, आपल्याला तिथे शूटिंग करायची असेल किंवा तिथे फिरायला जायचं असेल, तर आपण जाऊ.”
त्यानंतर सुनील शेट्टीने सर्वांना एकजूट राखण्याचे आणि एकता टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. तो म्हणाला, “आता आपल्याला एकजूट राहण्याची गरज आहे. आपण एकत्र येऊन, त्यांना दाखवून दिले पाहिजे की, काश्मीर आपला होता, आपला आहे आणि नेहमीच आपला राहील”.
सुनील शेट्टीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच ‘केसरी वीर’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १६ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. त्याशिवाय तो ‘वेलकम टू द जंगल’, ‘हेरा फेरी ३’ व ‘सन ऑफ सरदार २’मध्येही दिसणार आहे.