सुनील शेट्टीचा आगामी चित्रपट ‘केसरी वीर : लेजेंड्स ऑफ सोमनाथ’ सध्या चर्चेत आहे. पण, सुनील शेट्टीचा हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार नाही. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चित्रपट निर्माते कानू चौहान यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. सुनील शेट्टीचा हा चित्रपट १६ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

“हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाही”

ऐतिहासिक ॲक्शन-ड्रामा, ज्यात सूरज पांचोली, विवेक ओबेरॉय आणि आकांक्षा शर्मा देखील आहेत. पाकिस्तान वगळता, ‘केसरी वीर’ हा चित्रपट भारत, अमेरिका, ब्रिटन आणि उत्तर अमेरिका यांसारख्या इतर आंतरराष्ट्रीय प्रदेशांमधील थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाचा ट्रेलर २९ एप्रिल रोजी मुंबईत लाँच होईल.

चित्रपटाचे निर्माते कानू चौहान यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे, “मी माझ्या फॉरेन डिस्ट्रीब्युटरला सांगितले आहे की, माझा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार नाही. माझा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित व्हावा, असे मला वाटत नाही. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. मी हा मोठा निर्णय घेतला आहे. आता ‘केसरी वीर’ पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाही. दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप मृतांना ही माझी श्रद्धांजली आहे. ही माझी भूमिका आहे”.

‘केसरी वीर : लेजेंड्स ऑफ सोमनाथ’ हा चित्रपट १४ व्या शतकात घुसखोरांपासून ऐतिहासिक सोमनाथ मंदिराचे रक्षण करण्यासाठी लढलेल्या आणि आपले प्राण अर्पण करणाऱ्या अनोळखी योद्ध्यांची कहाणी प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी सज्ज आहे.

या पीरियड ड्रामामध्ये सूरज पंचोली, विवेक ओबेरॉय, सुनील शेट्टी आणि आकांक्षा शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आकांक्षा ‘केसरी वीर: लेजेंड्स ऑफ सोमनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.

‘केसरी वीर : लेजेंड्स ऑफ सोमनाथ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रिन्स धीमान यांनी केले आहे आणि निर्मिती कानू चौहान यांनी चौहान स्टुडिओजच्या अंतर्गत केली आहे. ‘केसरी वीर : लेजेंड्स ऑफ सोमनाथ’ हा चित्रपट १६ मे २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.