‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ला जितके प्रेक्षकांचे प्रेम मिळाले तितकाच तो शो सातत्याने नवनवीन वादांमध्येही सापडत राहिला. आता कपिल शर्माचा ‘यशराज’शी झालेला करार संपुष्टात आल्यावर शो पूर्ववत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कपिलला सुनीलच्या रूपाने एक आशेचा किरण मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वी शोमधून बाहेर पडलेला सुनील ग्रोव्हर कपिलच्या सासऱ्याच्या भूमिकेत शोमध्ये परतला आहे.
कपिलचा शो सुरुवातीला टीआरपीच्या स्पर्धेत आघाडीवर होता. पण त्याचवेळी शोमधील सर्वात गाजलेले पात्र ‘गुत्थी’ने शोला रामराम केला होता. ही भूमिका साकारणाऱ्या सुनील ग्रोव्हरने आपल्या भूमिकेची लोकप्रियता पाहता ज्यादा मानधनाची मागणी केली होती. त्या मागणीला कपिलने स्पष्टपणे नकार दिला होता. परिणामी सुनीलने त्याच धर्तीवर दुसरा शो सुरू केला. पण सुनीलच्या शोला अल्पावधीच गाशा गुंडाळावा लागला होता.
पण आता सुनील गुत्थीच्या भूमिकेत नव्हे तर, कपिलच्या सासऱ्याच्या भूमिकेत अवतरतो आहे. आतापर्यंत शोमध्ये कपिलने आपल्या बायकोसमोर तिच्या वडीलांची बरीच खिल्ली उडवलेली आहे. त्यामुळे चिडून तिने आपल्या वडिलांना बोलावून घेतले आहे. हा सासरा कपिलला कधी चप्पल फेकून मारतो, तर कधी त्याच्या टोमण्यांना सडेतोड उत्तर देतो. यामुळे कपिलची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यात वडील येताच त्याच्या बायकोने ‘तुम्ही सतत त्यांच्याबद्दल बोलत असता, त्यामुळे त्यांना उचक्या येत होत्या. म्हणून शेवटी मी त्यांना बोलावून घेतलं,’ असं बोलून कपिलच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. याशिवाय शोदरम्यान सुनील इतरही वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
कपिलचा शो सोडण्याचा परिणाम जितका सुनीलला झाला तितकाच शोवरही झाला. मध्यंतरीच्या काळात गुत्थीच्या जाण्याने शोचा टीआरपी बराच घसरला होता. त्यामुळेच या आधीही कपिलने सुनीलने शोमध्ये परतावे अशी इच्छा बोलून दाखवली होती. सध्याचे वातावरण पाहता सुनीलचा शोमधील प्रवेश कपिलसाठी नक्कीच मदतीचा हात ठरणार आहे.

Story img Loader