‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ शोमधील ‘गुत्थी’ या पात्रामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला छोट्या पडद्यावरील अभिनेता सुनील ग्रोव्हरच्या गाडीला शुक्रवारी अपघात झाला. या अपघातानंतर सुनीलची चौकशी करणारे अनेक संदेश त्याच्या चाहत्यांकडून पाठविण्यात आले. चाहत्यांनी दाखविलेल्या या काळजीपोटी सुनीलने त्यांचे आभार मानले आहेत.
सुनील आणि त्याची आई त्यांच्या बीएमडब्ल्यू गाडीतून मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करत असताना गाडीचा टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि ती दुसऱ्या गाडीवर आदळल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले होते. यानंतर सुनीलची चौकशी करणारे अनेक संदेश त्याच्या चाहत्यांकडून पाठविण्यात आले. सुनीलने आपल्या चाहत्यांचे आभार मानत टि्वटरवर पोस्ट केलेल्या संदेशात म्हटले आहे, तुम्ही दाखविलेल्या प्रेमासाठी आणि काळजीसाठी तुमचे सर्वांचे आभार. आता तुम्हाला हसवण्यासाठी आणि तुमचे मनोरंजन करण्यासाठी मी रस्त्याचासुद्धा अवलंब करत आहे. येणाऱ्या रविवारी रात्री ९ वाजता भेटू.
या अपघातात तीन जण जखमी झाले होते. परंतु, सुनिल आणि त्याची आई सुखरूप बचावले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागच्या वर्षी ‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ शोमधून मानधनाच्या प्रश्नावरून बाहेर पडलेला सुनील या आठवड्याच्या अखेरीला ‘मॅड इन इंडिया’ हा नवीन कॉमेडी शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Story img Loader