‘रागिणी एमएमएस’नंतर बॉलिवूडमध्ये काहीशा स्थिरावलेल्या सनी लिऑनला आता अभिनयाला महत्व असणाऱ्या भूमिका करायच्या आहेत. तिच्या दुर्दैवाने तशी संधी अजून तिला सापडत नसली तरी तिच्याकडे चित्रपटांच्या ऑफर्स आहेत हे महत्वाचे आहे. सनी लिऑन सध्या दोन चित्रपटांच्या निमित्ताने चर्चेत आहे आणि या दोन्ही चित्रपटात ती मराठीशी जोडली गेली आहे. आगामी ‘मस्तीजादे’ या चित्रपटात सनी ‘लैला लेले’ अशा मराठमोळ्या आडनावाची भूमिका करते आहे तर तिचा दुसरा चित्रपट चक्क मराठी भाषेतला आहे.
 ‘मस्तीजादें’ हा चित्रपट पुन्हा सेक्स कॉमेडीवर आधारित आहे. त्यामुळे सनीची भूमिकाही फार वेगळी नाही. प्रीतिश नंदी कम्युनिकेशन्स निर्मित आणि मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘मस्तीजादें’ या चित्रपटात एकच गोष्ट वेगळी आहे ते म्हणजे सनी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचे नाव. सनीला ‘लैला लेले’ असे नाव का देण्यात आले आहे हे अजून तरी गुलदस्त्यात आहे. मात्र, ‘लैला लेले’ नावानेच सनी चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसते आहे. ही लैला मराठीत बोलणार का?, हेही अजून कळलेले नाही. सनीचा दुसरा चित्रपट तर चक्क मराठीत आहे आणि त्याचे दिग्दर्शनही सुजय डहाकेचे आहे. सुजयच्या ‘व्हल्गर अ‍ॅक्टिव्हिटीज इनकॉर्पोरेटेड’ म्हणजेच ‘अश्लील उद्योग मित्रमंडळ’ नावाच्या लांबलचक चित्रपटात सनी लिऑन मुख्य भूमिकेत काम करते आहे. हा चित्रपट पुण्यातील सत्य घटनेवर आधारित असल्याचे बोलले जाते. सत्य घटना म्हणजे सनी लिऑन दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी पुण्यात हजेरी लावणार होती. पण, तिच्या येण्यावरून बराच वादंग उठला. हीच घटना केंद्रस्थानी ठेवून सुजयने चित्रपट करायचे ठरवले आहे. यात सनी लिऑन तिच्या खऱ्या आयुष्यातल्या भूमिकेतच आहे. सनी या चित्रपटात पॉर्न स्टारची भूमिका करते आहे. एक तरूण मुलगा या पॉर्न स्टारच्या प्रेमात पडतो. आणि त्या वाढत्या प्रेमातूनच सोसायटीतील एका सोहळ्याला प्रमुख पाहूणी म्हणून तिला आणण्याचा घाट ही मंडळी घालतात. मग त्यावर सोसायटीतील तथाकथित पांढरपेशी, सभ्य मंडळी काय नाटक करतात, असे या चित्रपटाचे कथानक आहे. साधारण ऑगस्टमध्ये सनी या मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात करणार असल्याचे समजते.

Story img Loader