गुगलच्या शोधयंत्रावर सध्या पोर्नपरी सनी लिओनी हिचे नाव आघाडीवर आहे. सलमान खान, कतरिना कैफ, सचिन तेंडुलकर यांनाही तिने मागे टाकले आहे. यंदाच्या वर्षी या शोधयंत्रावर सनी लिओनीचा शोध जास्तीत जास्त प्रमाणात घेतला गेला, असे गुगल इंडियाच्या कालमानस वार्षिकात म्हटले आहे.
गुगल इंडियाने वर्षांतील अनेक घटनांवर नजर ठेवत देशातील काही प्रवाहही टिपले आहेत. शोध घेतल्या गेलेल्या व्यक्तीत शाहरूख खान पाचवा असून त्याच्या खालोखाल हनी सिंग, तेलुगू व तामिळ अभिनेत्री काजल आगरवाल, करीना कपूर, सचिन तेंडुलकर व पूनम पांडे यांचा क्रमांक लागला आहे. बॉलिवूड हीट्स व इंडियन प्रीमिअर लीग यांचा क्रमांकही वरचा असून शाहरूख खानची भूमिका असलेला ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा चित्रपट जास्त शोधला गेला आहे.
इंडियन प्रीमिअर लीगनंतर बॉलिवूड चित्रपट आशिकी २, यूआयडीएआय, जॉनी वॉकर, जिया खान यांना पहिल्या दहांत स्थान मिळाले आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार हे सर्वात जास्त शोध घेतले गेलेले नेते असून, त्याखालोखाल ब्लॅकबेरी फोन, राहुल द्रविड, सायना नेहवाल, विजय मल्ल्या यांची नावे आहेत.  
ऑनलाइन शॉपिंग संकेतस्थळात ई-कॉमर्सशी संबंधित फ्लिपकार्ट व ओएलएक्स डॉट कॉम यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. शोधयंत्रात लोकांनी जे शोध घेतले आहेत त्यानुसार २०१३ हे केवळ करमणुकीचे वर्ष होते. ऑनलाइन शॉपिंग, बँकिंग व ई-कॉमर्स यांचीही कमान चढती राहिली, असे गुगल इंडियाचे उपाध्यक्ष राजन आनंदन यांनी सांगितले.
मोबाइलवरून शोध घेतलेल्यात रेस्टॉरंट, बार, चित्रपट, क्रिकेट स्कोअर यांचे प्रमाण अधिक होते. सहलीला जाण्यासाठी मकाव, मालदीव व मॉरिशस या ठिकाणांना जास्त शोधअंक मिळाले असून, त्याखालोखाल बोस्टन, दुबई, अ‍ॅमस्टरडॅम व सिंगापूर यांचा समावेश आहे.