एखाद्या लोकप्रिय गाण्यावर लोकप्रिय अभिनेत्रीने केलेले नृत्य काही वर्षांनंतर वेगळ्या स्वरूपात आणि वेगळ्या अभिनेत्रीच्या पदन्यासावर पाहायला मिळाले तर बॉलीवूडसाठी ती नक्कीच आगळी गोष्ट ठरू शकते. असाच एक प्रयोग प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार असून सनी लिओन ही अभिनेत्री काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील गाजलेल्या गाण्यावर नृत्य करताना पाहायला मिळणार आहे.
‘एक पहेली लिला’ या आगामी चित्रपटात सनी लिओन ऐश्वर्या राय हिने लोकप्रिय केलेल्या आणि गाजलेल्या ‘ढोली तारों’ या गाण्यावर आपले नृत्यकौशल्य पणाला लावणार आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील हे गाणे व त्यावरील ऐश्वर्याचे नृत्य अद्यापही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या गाण्याची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. महाविद्यालयातील स्नेहसंमेलनात या गाण्यावर हमखास रेकॉर्ड डान्स केला जातो आणि उपस्थितांकडून गाण्याला व नृत्याला जोरदार प्रतिसादही मिळतो. गाण्याच्या लोकप्रियतेचा फायदा ‘एक पहेली लिला’ या चित्रपटासाठी करून घेण्यात येणार आहे. चित्रपटात या गाण्याचे रिमिक्स स्वरूपातील सादरीकरण पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील गाण्याचे सादरीकरण राजस्थानी शैलीतील असल्याचे सांगण्यात येते.
‘ढोली तारों’ हे गाणे आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर सनी लिओनच्या नृत्यशैलीत पाहायला मिळणार असल्याने त्याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.