‘भूत’, ‘कोई मिल गया’ ते ‘क्रिश ३’ सारख्या चित्रपटांमधून अभिनेत्री रेखाने आजही आपले अस्तित्व हिंदी चित्रपटांमधून जाणवून देण्याचे काम सुरू ठेवले आहे. मात्र, आपल्याला पुनरागमनासाठी एखादा चांगला, मध्यवर्ती आणि पूर्ण लांबीची भूमिका असणारा चित्रपट मिळावा, अशी रेखाची इच्छा होती. ती इंद्रकुमार यांच्या ‘सुपरनानी’ या चित्रपटाने पूर्ण होईल, असा अंदाज बांधून रेखाने या चित्रपटासाठी होकार दिला. खरेतर, शाहरूखच्या ‘हॅप्पी न्यू इअर’ चित्रपटाबरोबर ऐन दिवाळीत प्रदर्शित होणारा चित्रपट काही कारणास्तव दिवाळीच्या दुसऱ्या आठवडय़ात प्रदर्शित झाला. मात्र, या चित्रपटाच्या निमित्ताने निवडक माध्यमांमधून का होईना रेखाने आपल्या आयुष्याबद्दलचा दृष्टिकोनाबद्दल खुलेपणाने सांगितले. ‘सुपरनानी’ या चित्रपटाच्या निमित्ताने खासदार अभिनेत्री रेखा माध्यमांबरोबर गप्पा मारतील, असा अंदाज होता. मात्र, इथेही रेखाने ‘निवडक’चा हट्ट धरला आहे. दिवाळी सण हा आपल्यासाठी खास आणि जवळचा असल्याचे रेखा यांनी ९२.७ बिग एफएम वाहिनीवर गप्पा मारताना सांगितले. मिठाई आणि दिवाळी हे आपल्यासाठी घट्ट समीकरण आहे. अगदी रोजच्या जीवनातही थोडे का होईना गोड खाल्लेच पाहिजे. गोड खाणे हे आपल्याला श्वास घेण्याएवढे महत्वाचे असल्याचे रेखा यांनी सांगितले. दिवाळीत पारंपारिक रित्या मैसूर पाक, पायसम सारखे गोड पदार्थ घरी बनवले जात असत. आजही ते त्याचपध्दतीने घरी बनवण्याचा आपला आग्रह असतो. मिठाई खाणं, सण साजरा करणं या गोष्टी मनापासून आवडत असतानाही कुठल्याच पार्टीत त्यांचा सहभाग का नसतो?, असे विचारल्यावर मी दररोज पार्टी करते, असे रेखा यांनी सांगितले. माझ्यासाठी माझे आयुष्य हे एखाद्या पार्टीसारखे, मैफिलीसारखेच आहे. त्यामुळे आयुष्यातला प्रत्येक क्षण मी स्वत:बरोबरच एखाद्या मैफिलीत असल्यासारखा व्यतित करते, असे त्यांनी सांगितले. ‘सुपरनानी’ या चित्रपटात अभिनेता शर्मन जोशीबरोबर त्यांनी पहिल्यांदाच काम केले आहे. शर्मनचे वडिल अरविंद जोशी यांच्याबरोबर मी आधी चित्रपट केले होते. त्यामुळे शर्मनशी माझी आत्ताची ओळख नाही. शर्मन स्वत: रंगभूमीवर काम केलेला अभिनेता आहे त्यामुळे सहजअभिनय आणि शिस्त हे गुण त्याच्याकडे आहेत. म्हणूनच त्याच्याबरोबर काम करताना आपल्याला आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘सुपरनानी’ नंतर ‘फितूर’, ‘शमिताभ’ सारख्या वेगळ्या चित्रपटांमधून त्या दिसणार आहेत. या चित्रपटांबद्दल आपल्यालाही उत्सूकता असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Story img Loader