अभिनेते रजनीकांत यांनी आपल्या दमदार अभिनय कौशल्यानं फक्त दाक्षिणात्य इंडस्ट्रीत नाही तर बॉलीवूडमध्येही आपली छाप उमटवली आहे. बॉलीवूडच्या रेखापासून ते बऱ्याच अभिनेत्रींबरोबर त्यांनी काम केलं आहे. त्यांचा आता चाहता वर्ग फक्त दक्षिणेत नसून उत्तरपर्यंत आहे. रजनीकांत हे नुकतेच आपली मुलगी ऐश्वर्या हीच्या ‘लाल सलाम’ या चित्रपटात झळकले. या चित्रपटाने फारशी चांगली कमाई बॉक्स ऑफिसवर केली नसली तरी रजनीकांत यांच्या चाहत्यांना मात्र यातील त्यांचा स्वॅग प्रचंड आवडला.
भारतात सर्वाधिक मानधन घेणारा हा सुपरस्टार सध्या चांगलाच चर्चेत आहे. पडद्यावर रजनीकांत ज्या स्वॅगमध्ये वावरतात, खऱ्या आयुष्यात ते तितकेच साधे आहेत याची प्रचिती बऱ्याच लोकांना आली आहे. नुकतंच आंध्र प्रदेशच्या कडापा येथून ईकोनॉमी क्लास मधून विमान प्रवास करणाऱ्या रजनीकांत यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : ‘दो पत्ती’, ‘हिरामंडी’ अन्…; २०२४ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार ‘या’ बहुचर्चित सीरिज आणि चित्रपट
रजनीकांत यांच्या चाहत्याने हा व्हिडीओ काढत सोशल मीडियावर शेअर केला अन् काहीच क्षणात तो व्हायरलही झाला आहे. रजनीकांत यांनी कोणत्याही प्रकारे स्वतःला लपवायचा, मास्क वापरुन चेहेरा झाकायचा प्रयत्न केलेला नाही. उलट ते अत्यंत सहजतेने ईकोनॉमी क्लासमधून आनंदाने प्रवास करत असताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. चाहत्यांनी हा व्हिडीओ शेअर करत रजनीकांत यांच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला ‘जगातील सर्वात नशीबवान माणूस’ असंदेखील म्हंटलं आहे.
चेन्नईची सेलिब्रिटी क्रिकेट टीम ‘ऱ्हायनोस’देखील या फ्लाइटमध्ये उपस्थित होती. या संपूर्ण टीमबरोबरही रजनीकांत यांनी फोटो काढला. अभिनेता जिवा याने हा फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला. विमानातून संपूर्ण क्रिकेट टीम खाली येईपर्यंत रजनीकांत त्यांच्यासाठी थांबले होते अन् मगच त्यांनी सगळ्यांबरोबर फोटो काढल्याचं अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये सांगितलं.
रजनीकांत सध्या त्यांच्या आगामी ‘वेट्टयान’ या चित्रपटावर काम करत आहेत. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासह अमिताभ बच्चन व फहाद फाजीलसारखे कसलेले कलाकारही झळकणार आहेत. यानंतर रजनीकांत लोकेश कनगराज याच्याबरोबर ‘थलाईवर १७१’ या चित्रपटावर काम सुरू करणार आहेत. इतकंच नव्हे तर रजनीकांत लवकरच निर्माते साजिद नाडियाडवाला याच्याबरोबर एका हिंदी चित्रपटासाठी काम करणार असल्याची चर्चा होत आहे.