Supriya Pilgaonkar : काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया देशभरात येत आहेत. महाराष्ट्रातले सहा पर्यटक या हल्ल्यात मारले गेले. डोंबिवलीतले तीन जण हल्ल्यात मारले गेले आहेत. याचा निषेध म्हणून आज डोंबिवली शहर बंद ठेवण्यात आलं आहे. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी पुण्यात आणले गेले. देशातले २६ पर्यटक या हल्ल्यात मारले गेले आहेत. या हल्ल्याचा जगभरातून निषेध होतो आहे. अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी एक पोस्ट लिहिली आहे. त्यांच्या पोस्टची चर्चा होते आहे.
सुप्रिया पिळगावकर यांची पोस्ट काय?
सुप्रिया पिळगावकर यांनी इन्स्टावर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, “शो मस्ट गो ऑन. मी ही दुःखद बातमी रेडीओवर ऐकली. आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर, आपण १३ दिवस दुखवटा पाळतो, शोक व्यक्त करतो. मी आता माझा शोक व्यक्त करणार आहे. मी पुढचे १३ दिवस माझ्या हाताला काळी पट्टी बांधून मला मनातून किती दुःख झालं आहे, हे सांगणार आहे. तुम्हीही माझ्यासोबत हाताला काळी पट्टी बांधून आपला शोक व्यक्त करू शकता.” अशी पोस्ट त्यांनी केली.
मी दिखावा करत नाही-सुप्रिया पिळगावकर
पुढच्या पोस्टमध्ये सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या की, “मी यातून दिखावा करतेय असं कृपया म्हणून नका. या कृतीतून मला माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत. यातून मला दुःख व्यक्त करत असल्याची भावना निर्माण होत आहे.” यासोबतच सुप्रिया पिळगावकर यांनी आपल्या हाताच्या दंडाला काळी पट्टी बांधलेला फोटो देखील शेअर केला आहे. मी आजवर कधीच कश्मीरला गेले नाही. पण, मी शब्द देते की, मी लवकरच कश्मीरला माझ्या कुटुंबासोबत जाणार आहे असंही सुप्रिया पिळगावकर यांनी म्हटलं आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर
जम्मू आणि काश्मीर सरकारने बुधवारी दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची मदत जाहीर केली. या हल्ल्यात गंभीर जखमींना २ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपये देण्याची घोषणाही करण्यात आली.
केंद्र सरकारने घेतले महत्त्वाचे निर्णय
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने कठोर पाऊल उचलत पाच मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांना पुढील ४८ तासांत भारत सोडावा लागणार आहे. याचबरोबर कोणत्याही पाकिस्तानी नागरिका भारतात प्रवेश मिळणार नाही. याचबरोबर केंद्र सरकारने १९६० चा सिंधू पाणी करारही स्थगित करण्यात आला आहे. पाकिस्तानने सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करणार नाही तोपर्यंत या करारावरील स्थगिती कामय राहणार आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी ही माहिती दिली.