‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे. या कार्यक्रमाची थीम महिलांवर आधारित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड प्रसारित झाला. या एपिसोडमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. त्यांनी सुबोध भावेसोबत, राजकारणासह इतर वेगवेगळ्या विषयांवर धम्माल गप्पा मारल्या. याच एपिसोडमध्ये त्यांनी चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या घरी काम करण्याच्या सल्ल्यावरही मजेदार प्रतिक्रिया दिली.
सुबोध भावेनं या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांना त्यांच्या व्हायरल झालेल्या भाकरी भाजतानाच्या व्हिडीओची आणि यासोबत त्या व्हिडीओनंतर चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांनी ‘घरी काम करा’ असा सल्ला दिला होता अशी आठवण करून देत, याबद्दल काय वाटतं? असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना सुप्रिया सुळेंनी मजेदार प्रतिक्रिया दिली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला खरं तर त्यांच्या या सल्ल्याचं फार काही वाईट वाटलं नाही कारण मी एक महिला आहे आणि एक गृहिणी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. घरात स्वयंपाक करण्याला मी कमीपणा समजतच नाही. कारण दिवसभर तुम्ही कितीही काम केलं तरीही जेव्हा घरी जाता तेव्हा तुम्हाला घरचंच जेवण लागतं. इथे सेटवर जेव्हा तुम्ही जेवता तेव्हाही पहिला घास घेतल्यानंतर तुम्हाला घरच्या जेवणाची आठवण येते. त्यामुळे घरच्या जेवणाला पर्याय नाही.”
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “विरोधक जे बोलतात ते मी फार काही मनाला लावून घेत नाही. एवढं तर चालतं. त्यांनी थोडी आमच्यावर टीका करायची आम्ही थोडी त्यांच्यावर टीका करतो.” याशिवाय जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की चंद्रकांत पाटील यांना या कार्यक्रातून काय सांगाल तेव्हा त्या म्हणाल्या, “केंद्राचा निधी आजकाल मिळत नाही. मोदी साहेबांनी कट लावलाय. जरा तुम्ही सांगा त्यांना आमचा निधी लवकर द्यायला. लोक म्हणतात तुमचे आणि अमित शाहा यांचे चांगले संबंध आहेत. माझेही चांगले संबंध आहेत. बाकी वहिनींना सांगा मी विचारलं म्हणून आणि लवकरच घरी जेवायला या तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल डीश बनवते.”
दरम्यान ‘बस बाई बस’चा सुप्रिया सुळे स्पेशल एपिसोड सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. या एपिसोडमध्ये सुप्रिया सुळे चंद्रकांत पाटील यांच्या व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलही बोलल्या.