झी मराठी वाहिनीवरील बस बाई बस या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात पाहुण्या म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांना राज्यातील सत्तांतर, दिल्लीतील राजकारण यांसह अनेक कौटुंबिक प्रश्न विचारण्यात आले. या सर्व प्रश्नांची त्यांनी फार हटके पद्धतीने उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे करत आहे.

या कार्यक्रमात सुबोध भावेने सुप्रिया सुळेंना विविध प्रश्न विचारले. या दरम्यान सुप्रिया सुळेंना शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कमतरता जाणवते का? असा प्रश्न विचारला होता. बाळासाहेबांनी टीका अगदी तीव्रपणे केली आणि प्रेमही तितक्याच तीव्रपणे केली, अशा माणसाची कमतरता आताच्या या राजकारण, समाजकारणात जाणवते का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला होता.

उद्धव ठाकरे कमी पडले की देवेंद्र फडणवीस भारी पडले? सुप्रिया सुळे म्हणतात “दिल्लीवाल्यांची यंत्रणा…”

त्यावर त्या म्हणाल्या, “एखादा एवढा मोठा माणूस जेव्हा जातो तेव्हा कमतरता ही राहते. पण शेवटी माझं याबाबत वेगळं मत आहे. बाळासाहेबांनी त्यांचा उत्तराधिकारी हा हयात असतानाच कोण आहे हे सांगितलं होतं. तेव्हा उद्धव ठाकरे सर्वांना मान्य होते, जवळपास दोन दशकांसाठी मग आता २० वर्षांनंतर त्या गोष्टीला चॅलेंज करणं हे माझ्या मनाला न पटण्यासारखं आहे. माझं मत असं आहे की एखाद्या आपण आपला नेता मानलं आणि त्या नेत्याशी आपलं पटलं नाही किंवा त्याने आपल्याला बाहेर काढलं तर गोष्ट वेगळी आहे.”

“पण वेगळी चूल करण्यापेक्षा त्याच्यावर न टीका करता महाराष्ट्राची संस्कृती लक्षात घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य जगा. मग वेगळा संसार करा, वेगळं घर करा, वेगळी चूल करा आणि सुखात जगा. नवीन पक्ष करुन नव्या उमेदीने महाराष्ट्राला काहातरी देणार असाल तर माझ्या त्यांना शुभेच्छा असतील. पण ज्या घरात आपण लहानाचे मोठे झालो, त्यांच्यावर वार करुन बाळासाहेबांचा वारसा यावरुन जे काही ओढाताण झाली आहे. ती महाराष्ट्रासाठी असं नाही तर कोणत्याही पक्षासाठी योग्य नाही.” असेही त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो पाहताच सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आता घरातही पवार विरुद्ध शिंदे होणार…”

दरम्यान बस बाई बस या कार्यक्रमाचा अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेक जण विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहे. सुबोध भावे याचा ‘बस बाई बस’हा कार्यक्रम काल २९ जुलैपासून प्रक्षेपित झाला आहे. हा कार्यक्रम खास स्त्रियांसाठी असणार आहे. यात सुबोध स्त्रियांसाठी राखीव अशी लेडीज स्पेशल बसचं नेतृत्व करताना दिसणार आहे.