आतापर्यंत विविध खेळांवर आधारित अनेक चित्रपट आपण पाहिलेत पण अस्सल मातीतला खेळ ‘कबड्डी’ तसा दुर्लक्षितच राहिला आहे. नेमकी हीच बाब हेरत जयंत लाडे यांनी ‘सूर सपाटा’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटामध्ये संजय जाधव आणि उपेंद्र लिमये यांसारखे कलाकार झळकणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
उनाड पण कुशल विद्यार्थ्यांभोवती गुंफलेली ‘सूर सपाटा’ची कथा प्रेक्षकांची उत्कंठा टप्प्या-टप्प्याने वाढवत राहते. जिल्हा परिषदेच्या शाळेतील काही सामान्य विद्यार्थ्यांतील असामान्य कौशल्य जाणून त्यांना स्पर्धेमध्ये उतरवू पाहणारे शिक्षक एकीकडे तर आपणही एखादं मैदान मारू शकतो याची जाणीव झालेले विद्यार्थी दुसरीकडे. या दोघांमधला सुवर्णमध्य साधणारा ‘सूर सपाटा’ प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची एक संधी मिळाली तर तो त्याचं कसं सोनं करू शकतो हे या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलं आहे.
दरम्यान, गावठी कबड्डीवर आधारित ‘सूर सपाटा’मध्ये हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील तब्बल २५ दिग्गज कलाकार झळकले आहेत. ‘सूर सपाटा’ २१ मार्चला होळीच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी कबड्डीपटू शकुंतला खटावकर,माया अकरे मेहेर आणि शिव छत्रपती पुरस्कार शैला रायकर, अभिजीत पानसे यांच्या हस्ते ‘सूर सपाटा’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.