मराठी चित्रपटांमध्ये विषयांचे वैविध्य आणि चांगली कलावंत मंडळी येत आहेत. ‘सुराज्य’ हा चित्रपटही वेगळ्या गहन विषयावरचा असून या चित्रपटाने नवी कलावंत जोडी प्रेक्षकांसमोर आणली आहे. मोठमोठाली मंदिरे, त्यांचे ट्रस्ट तसेच वेगवेगळ्या स्वामी-बाबांचे मोठमोठाले मठ, त्यांच्याकडे जमणारा निधी याचा सदुपयोग व्हायला हवा हे चित्रपट अधोरेखित करतो.
ओमकार प्रभू हा मुंबईत नोकरी करणारा आजच्या पिढीचा तरुण आहे. त्याचे वडील रामदास प्रभू आणि त्याची आई सावंतवाडीला राहातात. यांचा सुदर्शन स्वामी यांच्यावरचा गाढ विश्वास आहे. ते नियमितपणे सावंतवाडीच्या स्वामींच्या मठात सेवेसाठी जात असतात. स्वत:चा फारसा विश्वास नसताना केवळ आई-वडील सांगतात म्हणून पालखीचा मान घेण्यासाठी ओमकार मुंबईहून सावंतवाडीच्या मठात जातो. वास्तविक डॉ. स्वप्ना भोसले या फेसबुक मैत्रिणीला भेटण्यासाठी गोव्याला जायचे ओमकारचे ठरलेले असते. दरम्यानच्या काळात तो मठात जाऊन पालखीचा भोई होण्याचा मान केवळ आई-वडिलांच्या सांगण्यावरून मिळवतो. काही दिवस सावंतवाडीलाच राहून नंतर गोव्यात ऑफिसला जाण्याचे ओमकारचे निश्चित झालेले असते. प्रवासात त्याला रस्त्यावर एका तरुणाचा अपघात झालेला दिसतो. त्या तरुणाला तो अचानक भेटलेल्या डॉ. स्वप्नाच्या मदतीने रुग्णालयात दाखल करतो. त्यानंतर सुदर्शन स्वामींचा छोटय़ा गावातील भलामोठा मठ, आणखी भलामोठा करण्यासाठी निधी गोळा केला जात असतो. देवभोळी गरीब जनता परवडत नसतानाही देवाच्या कामात हातभार म्हणून भरभरून पैसे देते. परंतु मठामधील काही स्वामी महाराज यांचे वर्तन, तिथला गैरकारभार ओमकारला समजतो आणि मग ओमकार आपला मित्र बंडय़ा आणि मैत्रीण डॉ. स्वप्ना यांच्या मदतीने मठाचा कारभार सुधारण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी लढा देतात.
गोष्ट लहानशी, कथानकाचा जीव लहान असला तरी गहन विषयाला वाचा फोडणारा आहे. चित्रपटकर्त्यांनी निवडलेला विषय प्रामाणिकपणे आणि थेट पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न चित्रपटातून केला आहे. कोणत्याही प्रकारची फिल्मी फोडणी न देता सरळसोट पद्धतीने चित्रपटाचा नायक त्याला पडलेल्या प्रश्नांची उकल करतो. आपल्याकडील मोठमोठाले श्रीमंत मठ, मोठमोठी मंदिरे, त्यांचे ट्रस्ट यांच्याजवळ भरपूर निधी दानरूपाने जमा होतो. त्याचे व्यवस्थित नियोजन करून लोकांचा पैसा सत्कार्यासाठी वापरला जावा हा संदेश देण्याचा थेट प्रयत्न दिग्दर्शकाने चित्रपटातून केला आहे. एकीकडे गावातील मठासाठी निधी गोळा केला जात असताना एका घरामधील महिला रुग्णालयाच्या उपचाराविना मरण पावते. प्रचंड पैसा असूनही तथाकथित स्वामी, बाबा, महाराज हे लोकांच्या देवभोळ्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन निधी गोळा करीत बसतात आणि गावाचा विकास, मूलभूत सोयीसुविधा सरकारने देण्याच्या अपेक्षेने लोकांची वर्षांनुवर्षे गैरसोय होत राहते. त्याऐवजी श्रीमंत देवळांचा, ट्रस्टचा निधी लोकोपयोगी कामासाठी वापरला तर खऱ्या अर्थाने मठांना, स्वामींना किंवा बाबा लोकांच्या धार्मिक कार्याला लोकाश्रय लाभू शकतो हा विचार लेखक-दिग्दर्शक-संवाद लेखक सर्वानीच थेटपणे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे. चित्रपटाचा प्रेक्षकांवर अपेक्षित परिणाम साधता यावा म्हणून नायक ओमकारला लढा देण्याची तीव्र इच्छा व्हावी यासाठी आणखी काही ठळक भिडणाऱ्या प्रसंगांची आवश्यकता होती असे चित्रपट पाहताना सतत जाणवत राहते.
वैभव तत्त्ववादी आणि मृणाल ठाकूर ही नवी जोडी प्रथमच पडद्यावर आली आहे. दिग्दर्शकाने जे सांगायचे ते थेट आणि सरळसोट पद्धतीने मांडल्यामुळे चित्रपट रंजकतेच्या पातळीवर कमी पडतो. पडद्यावर मांडलेले वास्तव अधिक भिडण्यासाठी आणखी प्रसंग घातले असते तर अपेक्षित परिणाम साधता आला असता. स्वामींचे काम करणारे माधव अभ्यंकर, स्वामींचे परमभक्त म्हणून काम करणारे रामदास प्रभू यांच्या भूमिकेतील शरद पोंक्षे यांनी भूमिकेबरहुकूम काम उत्तम केले आहे. दोन गाणीही सुश्राव्य आहेत.
सुराज्य
व्हेक्टर प्रोजक्ट्स प्रस्तुत
निर्माता – उमेश राव
कार्यकारी निर्माता – विनायक प्रभू
दिग्दर्शक – संतोष मांजरेकर
कथा – विनायक प्रभू
पटकथा-संवाद – सौरभ भावे
संगीत – पंकज पडघन
छायालेखन – विक्रम अमलादी
कलावंत – वैभव तत्त्ववादी, मृणाल ठाकूर, शरद पोंक्षे, माधव अभ्यंकर, डॉ. श्रीराम पत्की, रवी संगवई, पौर्णिमा मनोहर, रीना सुळे, नंदकुमार पाटील, विनायक भावे, शहाजी काळे.

Story img Loader