समीर जावळे
गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही..
या अजरामर ओळी लिहिल्या आहेत महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गझलकार आणि कवी सुरेश भट यांनी. सुरेश भट यांनी मराठी गझल हा प्रकार मराठी भाषेत नुसता रुजवला नाही तर त्याचा वटवृक्ष केला असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. आपल्या सिद्धहस्त लेखणीने काव्य अजरामर करणं काय असतं ते त्यांनी दाखवून दिलं.
सुरेश भट हे उत्तम बासरी वादक आणि गायकही होते
सुरेश भट यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ चा. वयाच्या अडीचाव्या वर्षी त्यांना पोलिओने ग्रासलं. त्यामुळे त्यांचा एक पाय अधू झाला. सुरेश भट यांचे वडील श्रीधर भट हे डॉक्टर होते. मात्र देखील यावर उपाय करु शकले नाहीत. परिणामी सुरेश भट यांचा उजवा पाय आयुष्यभरासाठी अधू झाला होता. सुरेश भट यांना त्यांच्या आईने संगीत ऐकण्याची गोडी लावली होती. त्या स्वतः हार्मोनियमही वाजवत असत. पाय अधू झाल्याने सुरेश भट मैदानी खेळ खेळू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी लाडक्या मुलाला पेटी आणली. त्यांच्या वडिलांनी मुलासाठी घरी ग्रामोफोन आणला. सुरेश भटांमधला कवी जन्माला येण्यास इथून सुरुवात झाली. सुरेश भट उत्तम बासरी वादक आणि उत्तम गायकही होते. एकदा आजारी असताना सुरेश भट अंथरुणावर बासरी वाजवत बसले होते असा किस्सा त्यांनीच एका मुलाखतीत सांगितला होता. सुरेश भट यांच्या कवितांना संगीतबद्ध करणारे एक संगीतकार म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी जयश्री गडकरांच्या चित्रपटासाठी लिहिलेल्या गाण्याचा त्यांनी एक किस्सा सांगितला होता.
सुरेश भटांचा कवितासंग्रह हृदयनाथ मंगेशकरांनी वाचला
नागपूरमधून रस्त्यावरून मी फिरत होतो. तिथे रुपगंधा नावाचा कवितासंग्रह मिळाला. रुपगंधा कवितासंग्रहातील पहिली कविता वाचली ती पूर्तता माझ्या माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी. मला वाटलं की हा चांगला गझलकार आहे. नाव वाचलं तर सुरेश भट. पहिलं गाणं मृत्यूवरचं करावं असं मला वाटलं नाही. मग मी मेंदीच्या पानावर गाणं हे केलं. सुरेश भट यांची कविता अंतर्मुख करते. अंतर्मुख करते ती खरी कविता. कविता वाचताना कळलं ते म्हणजे हे आई आणि मुलीचं गाणं. एका नाजूक नात्याची हळूवार गोष्ट या गाण्यात त्यांनी सांगितली आहे असं हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितलं होतं. याच हृदयनाथ मंगेशकरांनी सुरेश भटांची प्रतिभा कशी होती तो किस्सा सांगितला.
अमृतवेल चित्रपटाचा किस्सा
हृदयनाथ मंगेशकरांनी सांगितल्यानुसार जयश्री गडकर यांनी एका चित्रपटची निर्मिती केली होती त्या चित्रपटाचं नाव होतं अमृतवेल. तो चित्रपट पूर्ण झाला नाही मधेच बंद पडला. चित्रपटाला संगीत मी दिलं होतं. त्यावेळी मला जयश्री गडकर यांनी विचारलं की तुम्हाला कवी कोण हवं? तेव्हा हृदयनाथ मंगेशकरांनी सुरेश भट यांचं नाव सुचवलं होतं. ठरल्याप्रमाणे सुरेश भट नागपूरहून आले, दादरला एमिगो नावाचं हॉटेल होतं. दिवसाला २०० ते २५० रुपये असं भाडं त्या हॉटेलचं होतं. सुरेश भट यांना गाण्यांचे पैसे द्यायचे ठरले ते १५०० रुपये. हॉटेलचं दिवसाचं बिल २५० रुपये आहे. दोन दिवसांत गाणं लिहा. बिल साधारण ५ हजारांच्याही वर गेलं. हृदयनाथ मंगेशकरांनी सुरेश भट यांना विचारलं अहो भटसाहेब गाणं का लिहित नाही? त्यावर सुरेश भट म्हणाले, “क्या करूं बेटे आमद आती नहीं.” आमद म्हणजे प्रतिभा. “आमद कब आयेगी?” असं हृदयनाथ मंगेशकरांनी विचारलं तेव्हा सुरेश भट म्हणाले, “अब उसकी मर्जी. एक महिना भी लग सकता है या दोन दिन में भी आ सकती है.” यानंतर हृदयनाथ मंगेशकरांनी सुरेश भट यांना विचारलं की “महिना लागला तर हॉटेलचं काय करायचं?” त्यावर ते म्हणाले “देखेंगे.”
आमद बेचता नही, असं का म्हणाले होते सुरेश भट?
हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितल्यानुसार /यानंतर ते जयश्री गडकर यांना भेटले आणि म्हणाले चित्रपटात सहा गाणी आहेत एका गाण्याची ‘आमद’ यायला १० हजार रुपये गेले आहेत. आपण आता सुरेश भटांना सांगू की हॉटेल सोडा. त्याप्रमाणे सुरेश भटांना सांगण्यात आलं, सुरेश भट यांनी टॅक्सी बोलवली आणि म्हणाले “जा रहा हूँ” म्हणाले. त्यांना हृदयनाथ मंगेशकरांनी विचारलं आता कुठे जाणार? तर सुरेश भट म्हणाले “मी आमदार निवासात चाललो.” त्यावर सुरेश भट हृदयनाथ मंगेशकरांना म्हणाले, “जरा वो पेन लाना, कागज लाओ.” त्यांनी तिथेच एक गाणं लिहिलं ते जयश्रीबाईंना ते गाणं दिलं. जयश्रीबाईंनी ते गाणं वाचलं ते गाणं प्रसंगाला अत्यंत अनुरुप असं होतं. त्यांना रडायला येऊ लागलं. हे सगळं घडेपर्यंत हा वाद चालला होता की हॉटेलचं जे काही बिल झालं आहे ते कोण भरणार? हृदयनाथ मंगेशकर, सुरेश भट की जयश्री गडकर? गाणं पाहिल्यानंतर जयश्री गडकर यांनी बाळ धुरींना (अभिनेते आणि जयश्री गडकर यांचे पती) सांगितलं की यांना (सुरेश भट) १५ हजारांचा चेक द्या. त्यावर सुरेश भटांनी विचारलं “क्या कर रहे हो?” तर हृदयनाथ मंगेशकरांनी सांगितलं तुम्हाला चेक देत आहेत. त्यावर ते म्हणाले “मी प्रतिभा विकत नसतो, आमद बेचता नहीं, चलो.” याला म्हणतात प्रतिभा. असा किस्सा हृदयनाथ मंगेशकरांनी सांगितला होता. अशा सिद्धहस्त प्रतिभेची देणगी लाभलेला कवी म्हणजे सुरेश भट.
एल्गार कविता संग्रह ठरला चर्चेचा विषय
सुरेश भटांचा एल्गार हा कवितासंग्रह म्हणजे तर शब्दांची लयलूट आहे यात काहीही शंका नाही. एल्गार ही कविता कालातीत तर आहेच, शिवाय ती कविता आपल्याला अस्वस्थ करुन जाते. गझल या प्रकारात साधारण पाच ते पंधरा कडवी असतात. प्रत्येक कडवं म्हणजे दोन ओळींचा शेर असतो. केवळ दोन ओळींमध्येच नाट्यमय म्हणता येईल अशी रचना करायची असते. त्यासाठीची शब्दसंख्या मर्यादित असते. हे शिवधनुष्य सुरेश भटांनी पेललंच नाही तर तर ते आपण किती सहज करु शकतो हे त्यांच्या शब्दांमधून दाखवून दिलं. त्यामुळेच त्यांचे शब्द आजही अजरामर ठरले आहेत यात शंकाच नाही. त्यांच्या या ओळी याची साक्ष पटवून देतातच.
१) ऐकली आजन्म त्यांची मी शिळी रामायणे
शेवटी मी बोललो अन ते किती रागावले..
२) ओळखीचा निघे रोज मारेकरी
ओळखीचाच धोका मला यार हो..
३) घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते
४) भोगले जे दुःख मी त्याला सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगले की मज हसावे लागले
५) याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते
सिंधुताई सपकाळांना जगण्याची प्रेरणा मिळाली ती सुरेश भटांच्याच ओळींनी
सुरेश भट म्हणजे असामान्य प्रतिभा लाभलेले कवी यात शंकाच नाही. रुपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, काफला असे एकाहून एक सरस कवितासंग्रह त्यांनी लिहिले आहेत. त्यातल्या कविता, त्यांचे शब्द आपल्याला आजही प्रभावित करतात. सिंधूताई सपकाळ यांच्यावर जेव्हा घर सोडून स्मशानात राहण्याची वेळ आली होती तेव्हा त्यांनी सुरेश भटांच्याच ओळी आठवल्या होत्या. घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, पोळलेला प्राण माझा बोलण्याआधीच गेला, जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशानी, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसांनी. या सुरेश भटांच्या ओळींनी आपल्याला संघर्षाची प्रेरणा दिली असं सिंधुताई सपकाळ यांनी सांगितलं होतं.
गझल सम्राट हे बिरुद सुरेश भट यांच्या नावपुढे आजही कायम
सुरेश भट यांच्या नावापुढे गझल सम्राट हे बिरुद लागलं ते आजही कायम आहे. त्यांच्या गझल आणि कविता या हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले, लता मंगेशकर, सुरेश वाडकर यांनी गायल्या आहेत. सुरेश भट यांचं शिक्षण अमरावती या ठिकाणी झालं. बी.ए. ला सुरेश भट दोनदा नापास झाले होते, १९५५ मध्ये ते बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते शिक्षकही झाले होते. बी.ए.ला दोनदा अनुत्तीर्ण झालेल्या सुरेश भटांच्या कविता, गाणी इतकी अजरामर झाली आहेत की आज एम. ए. च्या अभ्यासक्रमात ती आहेत. एल्गार हा कविता संग्रह तर आजही चर्चेत असतो. त्यातल्या ओळी आजचे संदर्भ सांगतात. “साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही.” असं म्हणत सुरेश भट यांनी वास्तवावर शाब्दिक कोरडे ओढले होते. त्यांच्या प्रतिभेचे अनेक पदर त्यांनी उलगडून दाखवले. ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…’ लिहिणारे सुरेश भट किंवा इतकं वास्तवाशी नातं सांगणारे सुरेश भट हे प्रेमगीतही लिहित होते. ‘मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे’, ‘तरुण आहे रात्र अजूनी..’ ‘केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली’ ही गाणीही त्यांच्याच लेखणीतून त्यांनी जन्माला घातली आहेत. आयुष्यातील करुण रस, दुःख, मृत्यू यावर लिहिणाऱ्या कवीची ही प्रेमगीतंही आपल्याला ओढ लावतात. सुरेश भट यांच्या प्रतिभेची ओळख ही गाणी ठरली आहेत.त्यांनी लिहिलेली सगळीच गाणी गाजली पण सर्वाधिक गाजलेलं गाणं ठरलं ते म्हणजे उषःकाल होता होता काळरात्र झाली..
उषःकाल होता होता काळरात्र झाली हे गाणं सर्वाधिक गाजलं
‘उषःकाल होता होता काळरात्र झाली’ या गाण्याचा समावेश सिंहासन या चित्रपटात करण्यात आला होता. तसंच ‘ऋतू हिरवा’ या अल्बममध्येही या गाण्याचा समावेश करण्यात आला आहे. ‘उषःकाल’ म्हणजे सकाळ, जी एक नवीन सुरुवात आणि आशेचे प्रतीक आहे. ‘काळरात्र’ म्हणजे अंधारी रात्र, जी निराशा आणि दुःखाचे प्रतीक आहे. त्यामुळे, या ओळींचा अर्थ असा आहे की एक वेळ होती जेव्हा सर्व काही ठीक होईल असे वाटत होते, पण नंतर गोष्टी खूप वाईट झाल्या. महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करणारा सिंहासन हा चित्रपट होता. त्यातल्या घटनांनुरुप या गाण्यांची कडवी वापरली गेली. चित्रपटांतल्या प्रसंगाना ते अत्यंत अनुरुप ठरलेलं गाणं होतं. धुमसतात अजुनी विझत्या चिंताचे निखारे, अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे.. आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली. या ओळींमधून कवी सुरेश भट स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची वेदनाच मांडतात. या ओळी आणि हे गाणं कालातीत ठरलं आहे यातही शंका नाही.
एक सुंदर मैफल असावी आणि त्यातल्या भैरवीने मन भरुन जावं असं काहीसं सुरेश भट यांच्या कवितांचं स्वरुप होतं. जगण्यावर प्रेम करणारा, वास्तवाचं भान असलेले कवी सुरेश भट आपल्यात नाहीत. २००३ मध्ये त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वास्तवाची कठोर जाणीव करुन देणारा कवी काळाच्या पडद्याआड गेला आहे पण त्यांचं अस्तित्व त्यांच्या शब्दांतून, कवितांमधून आपल्याला कायमच जाणवत राहतं. सुरेश भट म्हणतात तसंच वाटून जातं की “ज्ञानदेव लिहुनी गेले ओळ ओळ भाळी, निमित्तास माझे गाणे, निमित्तास टाळी !”