बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचं आज निधन झालंय.त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्या प्रदीर्घ काळापासून आजारी होत्या. २०१८ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तसंच २०२० साली ब्रेन स्ट्रोकचा त्रासही त्यांना झाला होता. सुरेखा सीकरी यांनी दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली होती. भारदस्त आवाज आणि करडी नजर या त्यांच्या भूमिकांचं वैशिष्ट्य. असं असलं तरी सुरेखा यांनी मालिका किंवा सिनेसृष्टीत करिअर घडवण्याचा कधी विचारही केला नव्हता.

सुरेखा यांचा जन्म १९ एप्रिल १९४५ साली दिल्लीत झाला होता. सुरुवातीपासूनच सुरेखा यांना पत्रकार किंवा लेखिका व्हायचं होतं. अभ्यासात देखील सुरेखा हुशार होत्या. जेव्हा सुरेखा अलीगढ़ मुस्लिम युनिवर्सिटी शिक्षण घेत होत्या तेव्हा अब्राहम अलकाजी यांचं एक नाटक कॉलेजमध्ये सादर करण्यात आलं होतं. या नाटकाचं नाव ‘द किंग लियर’ असं होतं. हे नाटक सुरेखा यांच्या बहिणीला प्रचंड आवडलं. त्यानंतर सुरेखा यांनी देखील अभिनयाचे धडे घ्यावे यासाठी त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा फॉर्म आणला. मात्र फॉर्म आणुनही सुरेखा यांनी तो भरला नव्हता. कारण पत्रकार बनण्याचं स्वप्न त्यांच्या डोक्यात कायम होतं.

पहा फोटो: ‘बालिका वधू’ ते ‘बधाई हो’ सुरेखा सीकरींच्या ‘दादी’च्या भूमिकेने प्रेक्षकांची जिंकली मनं

त्यानंतर सुरेखा यांच्या आईने त्यांना अजून फॉर्म का भरला नाही? असा सवाल देखील केला होता. त्यानंतर आईच्या सांगण्यावरून सुरेखा यांनी एनएसडीचा फॉर्म भरला. यात त्यांची निवड देखील झाली. त्यानंतर त्यांनी बराच काळ रंगमंचावर काम केलं. सिनेमांसोबतच त्यांनी अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. ‘परदेस में है मेरा दिल’, ‘एक था राजा एक थी रानी’, ‘केसर’, ‘कभी कभी’ आणि ‘जस्ट मोहब्बत’ यांसारख्या मालिकांमधून त्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये झळकल्या. मात्र ‘बालिका वधू’ मालिकेतील त्यांची ‘दादीसा’ ही भूमिका विशेष गाजली.

surekha-s
(Photo-You Tube/colors tv)

तर दिल्लगी’, ‘नजर’, ‘जुबेदा’, ‘रेन कोट’, ‘तुमसा नहीं देखा’, ‘हमको दीवाना कर गए’, आणि ‘घोस्ट स्टोरीज’ अशा अनेक सिनेमांमध्ये त्या झळकल्या. २०१८ सालात आलेल्या ‘बधाई हो’ या सिनेमातील सुरेखा यांची दादीची भूमिका लक्षवेधी ठरली. यासाठी त्यांना सहाय्यक अभिनेत्राचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.