अभिनेता शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी यांनी तिसऱ्या अपत्यप्राप्तीसाठी सरोगसी तंत्राचा वापर करताना ‘लिंगनिदान चाचणी बंदी कायद्या’चा भंग केल्याप्रकरणी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे दाखल तक्रारीची लवकर सुनावणी घेण्याबाबत करण्यात आलेली याचिका गुरुवारी मागे घेण्यात आली.
शाहरूखने तिसऱ्यांदा पिता होण्यासाठी सरोगसी तंत्राचा वापर करताना लिंगनिदान चाचणी बंदी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर पालिकेनेकोणतीच कारवाई केली नसल्याचा दावा अॅड. वर्षां देशपांडे यांनी केला होता. देशपांडे यांनी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे तक्रारही दाखल केली होती. न्यायालयाने या तक्रारीची दखल घेत पालिकेसह शाहरूख, जसलोक रुग्णालय आणि राज्य सरकारला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले व या प्रकरणाची पुढील सुनावणी सहा आठवडय़ांनी होईल, असे सांगितले. या निर्णयाला देशपांडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान देत सुनावणी लवकर घेण्याची मागणी केली होती. गुरुवारी याप्रकरणी न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासमोर सुनावणी झाली. त्या वेळेस शाहरूखविरुद्धच्या आरोपांच्या पालिकेने केलेल्या चौकशी अहवालाची प्रत देण्याची देशपांडे यांची मागणी महानगरदंडाधिकाऱ्यांनी बुधवारी फेटाळून लावली, अशी माहिती शाहरूखच्या वकिलांतर्फे देण्यात आली. तसेच महानगरदंडाधिकाऱ्यांनी प्रकरणाची सुनावणी १३ नोव्हेंबर रोजी ठेवली असून त्या वेळी देशपांडे यांचा जबाब नोंदविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे उच्च न्यायालयातील याचिका प्रलंबित ठेवण्यात काहीच अर्थ नसल्याचा दावाही केला. देशपांडे यांच्या वकिलांनीही त्याला दुजोरा देत याचिका मागे घेतली.
सरोगसी प्रकरण : शाहरूखविरुद्धची याचिका मागे
अभिनेता शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी यांनी तिसऱ्या अपत्यप्राप्तीसाठी सरोगसी तंत्राचा वापर करताना ‘लिंगनिदान चाचणी बंदी कायद्या’चा भंग
First published on: 26-10-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surrogacy case petition taken back against shah rukh khan