लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.या चित्रपटाने बॉक्स ऑफीवर कमाईचे अनेक विक्रम केले आहेत. या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्नासारख्या बॉलीवूड कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या. तसंच अनेक मराठी कलाकारही या चित्रपटात पाहायला मिळाले. चित्रपटाच्या यशानंतर संतोष जुवेकरने (Santosh Juvekar) अनेक मुलाखती दिल्या. या मुलाखतीमध्ये त्याने अभिनय करत असताना अक्षय खन्नाला औरंगजेब समजून त्याच्याशी संवाद साधला नसल्याचे वक्तव्य केलं.

यानंतर संतोषला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. हे ट्रोलिंग अजूनही सुरूचा आहे. या ट्रोलिंगबद्दल स्वतः संतोषने भाष्य केलं आहे. त्यानंतर काही कलाकारही त्याच्यावरील ट्रोलिंगवर व्यक्त झाले आहेत. गायक, संगीतकार अवधूत गुप्ते, ‘बिग बॉस मराठी ५’ फेम धनंजय पोवार आणि अभिनेत्री रुचिरा जाधव यांनी संतोषच्या ट्रोलिंगवर भाष्य केलं. त्यानंतर आता अभिनेता सुशांत शेलारनेसुद्धा (Sushant Shelar) संतोषच्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सुशांतने आपल्या सोशल मीडियावर संतोषबरोबरचा फोटो शेअर करत ट्रोल करण्यांबद्दल भाष्य केलं आहे. या पोस्टमध्ये सुशांतने असं म्हटलं आहे की, “खरं सांगायचं तर, आजकाल एखाद्याने प्रामाणिकपणे आपली मतं मांडली, की लगेच काही लोक ट्रोलिंगच्या मागे लागतात आणि जेव्हा आपला एखादा खास मित्र अशा गोष्टींचा सामना करत असतो. तेव्हा मन हेलावून जातं.”

यापुढे सुशांतने असं म्हटलं आहे की, “संतोष जुवेकर हा फक्त एक अभिनेता नाही, तर आपल्या भूमिकांमधून जनतेच्या मनात घर करणारा संवेदनशील कलाकार आहे. त्याने समाजप्रवाहात झोकून दिलेलं योगदान आणि त्याची स्पष्टवक्तेपणा हीच त्याची खरी ताकद आहे. पण दुर्दैवाने काही लोक ही ताकद दुर्बलता समजतात आणि जाणीवपूर्वक त्याला लक्ष्य करत आहेत. मित्रा संतोष, हे सगळं तू पाहूनसुद्धा शांत आहेस, कारण तुला माहीत आहे. वेळच खरं उत्तर देते.”

पुढे या पोस्टमध्ये सुशांतने म्हटलं आहे की, “तरीही, एक खरा मित्र म्हणून मला आज तुला एक गोष्ट सांगावीशी वाटते. या ट्रोलिंगमागे आहे तो द्वेष आणि असुरक्षितता. पण तुझ्यामागे आहे प्रेम, आदर आणि माणुसकी. तू केलेल्या अशा कितीतरी भूमिकेतून तू लोकांना प्रेरणा दिलीस. त्यांची साथ आज तुझ्याबरोबर आहेच आणि आम्हीसुद्धा पूर्ण ताकदीनं, मनापासून आहोत. दुरून आवाज करणाऱ्यांना सोडून दे, कारण ते कधीच आपल्या जवळ येत नसतात. संतोष, तू खंबीर उभा राहा. तू एकटाच नाहीस. आम्ही तुमच्याबरोबर आहोतच.”